ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्या माध्यमातून खारीगांव येथे सुरू असलेल्या सीबीएसई शाळेच्या धर्तीवर नवीन शाळा कावेसर येथे सुरू करण्याबाबतचा सामंजस्य करार आज ठाणे महानगरपालिका आणि अमेरिकेतील नामांकित क्रिस्टल हाऊस इंडिया इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने सामंजस्य करार (MOU) आज करण्यात आला आहे. या माध्यमातून गरजू व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.
खारीगांव येथे सुरू करण्यात आलेल्या सीबीएसई शाळेत आज ही महत्त्वपूर्ण बैठक ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (1) प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त (2) मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांच्यासह 'क्रिस्टल हाऊस'चे आंतरराष्ट्रीय संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये क्रिस्टल हाऊस इंडियाचे संचालक मंडळाच्या अध्यक्षा सुश्री मार्था लॅमकिन, अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड हॅरिस, संचालक मंडळाचे उपाध्यक्ष डोनाल्ड नेबेल, क्रिस्टल हाऊस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन सी. मॅथ्यू तसेच जागतिक रुग्णदूत व माजी जागतिक क्रमांक १ टेनिसपटू राजीव राम यांचा समावेश होता. कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांनी शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभागात किमान एक तरी आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक शाळा सुरू करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या नवीन उपक्रमाची सुरुवात मुंब्रा आणि दिवा या भागांतून करण्यात येणार असून लवकरच येथे नवीन शाळा उभारण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.
या शैक्षणिक प्रकल्पाला राज्य सरकारचाही पूर्ण पाठिंबा मिळाला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले असल्याचे आयुक्त सौरभ यांनी यावेळी नमूद केले. शहरातील आधुनिक व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणव्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत, या प्रकल्पासाठी आवश्यक तो सर्व शासकीय निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

0 टिप्पण्या