.
..
*'पार्टिसिपेट मुंबई' प्रकल्प..... मुंबईच्या विकासात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच उद्योगजगत आणि समाजाच्या सहभागाला अधिक संघटित, पारदर्शक आणि परिणामाभिमुख स्वरूप देणे हा पार्टिसिपेट मुंबई उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत 'पार्टिसिपेट मुंबई' उपक्रमांतर्गत नोंदविलेल्या नागरी प्रकल्पांचे एकूण मूल्य तब्बल ₹१८० हून कोटी रूपयांहून अधिक आहे. सध्या ४५० हून अधिक थेट खुले प्रकल्प सहभागासाठी उपलब्ध असून, खूप कमी कालावधीत उद्योगजगतातील २७ सीएसआर भागीदारांसह २३ स्वयंसेवी संस्था, ५६ सक्षम अंमलबजावणी भागीदार तसेच ५०० हुन अधिक स्वयंसेवक या नागरी परिवर्तनाच्या उपक्रमाशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.
‘पार्टिसिपेट मुंबई’ हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नागरी गरजा आणि समाज व उद्योग क्षेत्राकडे उपलब्ध असलेल्या ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान, साहित्य, सेवा, मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना यांना जोडणारे डिजिटल एकखिडकी व्यासपीठ आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, उद्याने, पर्यावरण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नागरी पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये असलेल्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध सामाजिक व कॉर्पोरेट क्षमतांचा योग्य वापर करून घेण्याची व्यवस्था या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रातील आवश्यक प्रकल्प, नागरी गरजा आणि विकासात्मक संधी पोर्टलवर उपलब्ध करून देतील. कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, तज्ज्ञ आणि इतर इच्छुक भागीदार हे प्रकल्प पाहून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांनुसार, तांत्रिक क्षमता, अनुभव किंवा उपलब्ध संसाधनांनुसार संबंधित प्रकल्पासाठी सहभाग नोंदवू शकतील. त्यामुळे गरज असलेल्या नागरी प्रकल्पांपर्यंत योग्य भागीदार पोहोचण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक होणार आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’ची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या माध्यमातून केवळ महानगरपालिकेने सुचविलेल्या प्रकल्पांमध्येच सहभाग घेता येणार नसून, सहभागी संस्था मुंबईच्या नागरी विकासासाठी स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाधारित उपाय, सामाजिक उपक्रम किंवा नवीन प्रकल्प संकल्पनाही प्रस्तावित करू शकतील. अशा प्रस्तावांचे संबंधित BMC विभागाकडून तांत्रिक व प्रशासकीय परीक्षण करून त्यांची उपयुक्तता, व्यवहार्यता आणि मुंबईच्या नागरी गरजांशी असलेला संबंध तपासण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल.
या उपक्रमांतर्गत काही नामांकित कॉर्पोरेट संस्थांनी यापूर्वीच मुंबईच्या विविध नागरी गरजांशी संबंधित नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रस्ताव मांडले आहेत. HUL, RPG, CMS, Narayana यांसह विविध संस्थांनी त्यांच्या तज्ज्ञतेनुसार प्रकल्प सुचविले असून, संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागांकडून या प्रस्तावांचे परीक्षण करून पुढील कार्यवाही सुरू आहे. यामुळे ‘पार्टिसिपेट मुंबई’ हे केवळ प्रकल्प स्वीकारण्याचे व्यासपीठ न राहता, महानगरपालिका आणि उद्योग क्षेत्र यांच्या संयुक्त विचारातून नवीन नागरी उपाय निर्माण करण्याचे माध्यम म्हणूनही विकसित होत आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’मध्ये कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे स्वीकारला किंवा हस्तांतरित केला जाणार नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष वस्तू, साहित्य, उपकरणे, तंत्रज्ञान, सेवा, तज्ज्ञ ज्ञान, कौशल्य, पायाभूत सुविधा, प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक सेवा आणि स्वयंसेवी सहभाग अशा स्वरूपातील योगदानाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांनुसार प्रत्यक्ष नागरी परिणाम निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल आणि महानगरपालिकेलाही उपलब्ध असलेल्या अतिरिक्त तांत्रिक व सामाजिक क्षमतांचा उपयोग नागरी सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी करता येईल.
या माध्यमातून मुंबईतील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रकल्प संधींचे एकत्रित डिजिटल संकलन तयार होत असून, शिक्षण, आरोग्य, उद्याने, पर्यावरण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी क्षेत्रांतील प्रकल्प टप्प्याटप्प्याने पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या एकूण प्रकल्पांचे अंदाजित मूल्य सुमारे ₹२८० हून कोटी असून, त्याद्वारे मुंबईच्या विविध भागांमध्ये स्थानिक गरजेनुसार प्रत्यक्ष परिणाम घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत.
‘पार्टिसिपेट मुंबई’चा लाभ केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका आणि कॉर्पोरेट संस्थांपुरता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट फायदा मुंबईतील नागरिकांना आणि स्थानिक समुदायांना होणार आहे. शाळा, आरोग्य सुविधा, उद्याने, सार्वजनिक जागा, स्वच्छता व्यवस्था, पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सेवांमध्ये तंत्रज्ञान, आधुनिक साधने, तज्ज्ञ ज्ञान आणि अतिरिक्त संसाधनांचा वापर झाल्यामुळे सेवांची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे. स्थानिक गरजांवर आधारित प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांच्या जीवनमानात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणण्याची क्षमता या उपक्रमात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठीही या उपक्रमामुळे अनेक सकारात्मक परिणाम साध्य होणार आहेत. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय व तांत्रिक संसाधनांना पूरक म्हणून उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य, तज्ज्ञ मनुष्यबळ, नाविन्यपूर्ण उपाय आणि सेवा उपलब्ध करून घेता येणार आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ संस्था आणि कॉर्पोरेट भागीदारांच्या अनुभवाचा उपयोग करून नागरी प्रकल्प अधिक कार्यक्षम, नाविन्यपूर्ण आणि परिणामाभिमुख पद्धतीने राबविण्यास मदत होणार आहे.
कॉर्पोरेट संस्थांसाठी ‘पार्टिसिपेट मुंबई’ हे त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांना मुंबईच्या प्रत्यक्ष नागरी गरजांशी जोडणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. आपल्या संस्थेच्या तज्ज्ञतेनुसार किंवा उपलब्ध संसाधनांनुसार योग्य प्रकल्प निवडणे, स्वतःची कल्पना मांडणे, तांत्रिक अथवा वस्तुरूप योगदान देणे आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक परिणामाशी थेट जोडले जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे CSR आणि सामाजिक योगदान अधिक गरजाधारित, पारदर्शक आणि परिणामाभिमुख करण्यास मदत होईल.
या उपक्रमात स्वयंसेवी सहभागालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मुंबईच्या विकासासाठी आपला वेळ, ज्ञान, कौशल्य किंवा अनुभव देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि तज्ज्ञांना स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, जनजागृती, कौशल्य विकास, स्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांचा सहभाग घेता येईल. अशा सहभागामुळे महानगरपालिकेला अतिरिक्त कौशल्य व मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांमध्ये शहराशी असलेली आपली जबाबदारी आणि सहभागाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.
स्वयंसेवी सहभागाचा लाभ सहभागी व्यक्तींनाही होणार असून, त्यांना आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा प्रत्यक्ष सामाजिक उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः तरुण, व्यावसायिक, तज्ज्ञ, विद्यार्थी, निवृत्त अधिकारी आणि विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार मुंबईच्या विकासात योगदान देऊ शकतील. या सहभागातून नागरिक आणि महानगरपालिका यांच्यातील संवाद अधिक मजबूत होऊन शहराच्या विकासात ‘मी’ ऐवजी ‘आपण’ या भावनेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’ च्या माध्यमातून प्रकल्पाची गरज ओळखणे, ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, इच्छुक भागीदारांकडून सहभाग नोंदवून घेणे, संबंधित विभागाकडून प्रस्तावाचे परीक्षण करणे, अंमलबजावणीसाठी योग्य भागीदार निश्चित करणे आणि त्यानंतर झालेल्या योगदानाचा परिणाम नोंदविणे अशी अधिक सुव्यवस्थित प्रक्रिया निर्माण होत आहे.
यशस्वीरीत्या योगदान देणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि स्वयंसेवकांच्या सहभागाची योग्य दखल घेण्यासाठी प्रमाणपत्र, ‘वॉल ऑफ फेम’ तसेच अन्य योग्य स्वरूपातील मान्यतेच्या माध्यमातून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मुंबईच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक भागीदाराला त्याच्या सहभागाची सार्वजनिक ओळख मिळावी आणि इतर संस्था व नागरिकांनाही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’ ही केवळ कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) सुलभ करणारी व्यवस्था नसून मुंबईच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध क्षमतांना एकत्र आणण्याचा व्यापक प्रयत्न आहे. महानगरपालिकेकडे शहराच्या गरजा आणि सार्वजनिक हिताची जबाबदारी आहे, तर उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था, तज्ज्ञ आणि नागरिकांकडे ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान, अनुभव आणि संसाधने आहेत. या दोन्हींचा योग्य समन्वय साधून अधिक चांगले नागरी परिणाम निर्माण करण्याची क्षमता या उपक्रमात आहे.
मुंबईच्या विकासासाठी शासन, महानगरपालिका, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि नागरिक यांनी एकत्रितपणे समस्या ओळखून त्यावर उपाय निर्माण करण्याची ‘सह निर्मिती’ ची नवी संस्कृती विकसित करणे हे ‘पार्टिसिपेट मुंबई’चे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. शहराच्या प्रत्येक गरजेकडे केवळ महानगरपालिकेची जबाबदारी म्हणून न पाहता, मुंबईच्या विकासात योगदान देण्याची संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन या उपक्रमातून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
‘मुंबई शहराच्या अनेक गरजा आहेत तसेच समाजाकडे अनेक क्षमता आहेत आणि या दोन्हींना जोडण्यासाठी एका सक्षम व्यासपीठाची गरज आहे’, या मूलभूत विचारातून ‘पार्टिसिपेट मुंबई’ ची संकल्पना आकाराला आली आहे. उद्योगजगताची क्षमता, सामाजिक संस्थांची बांधिलकी, तज्ज्ञांचे ज्ञान, स्वयंसेवकांचा वेळ आणि नागरिकांचा सहभाग यांना मुंबईच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडून शहराच्या विकासाला अधिक व्यापक आणि लोकसहभागी दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’च्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि समाजातील विविध घटक यांच्यातील सहकार्याला संस्थात्मक स्वरूप मिळणार असून, मुंबईच्या वर्तमान गरजा पूर्ण करण्याबरोबरच भविष्यातील नागरी आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय विकसित करण्यासही चालना मिळणार आहे. सहभागातून योगदान, योगदानातून परिवर्तन आणि परिवर्तनातून अधिक सक्षम, स्वच्छ, हरित, निरोगी आणि समावेशक मुंबई घडविण्याच्या दिशेने ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा एक महत्त्वपूर्ण पुढाकार ठरणार आहे.
*Samagra या संस्थेसोबत महानगरपालिकेच्या कराराच्या अनुषंगाने अपेक्षित प्रशासकीय सुधारणांबाबत माहिती* -- समग्र मुंबईतील १.३ कोटींहून अधिक नागरिकांना नागरी सेवा पुरविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा वितरण अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी व्यापक सुधारणा राबवत आहे. त्या अनुषंगाने शासन व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवा सुधारणा क्षेत्रात कार्यरत Samagra या संस्थेसोबत महानगरपालिकेने सामंजस्य करार करण्यात येणार आहे. सेवा वितरणातील प्रक्रिया, कार्यपद्धती आणि व्यवस्थापन प्रणालींचे परीक्षण करून आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. या प्रक्रियेची मालकी, प्रशासकीय जबाबदारी आणि अंतिम निर्णयक्षमता महानगरपालिकेकडेच राहणार आहे.
अधिक प्रतिसाद क्षम BMC या उद्दिष्टांतर्गत नागरिकांच्या तक्रारी आणि मदतीच्या मागण्यांवर वेळेत व समन्वयित कार्यवाही करण्यावर भर आहे. आग, पूर, वैद्यकीय आपत्ती किंवा अन्य नागरी धोक्यांच्या वेळी विविध यंत्रणांमधील समन्वय बळकट केला जात आहे. तक्रार नोंदणीपासून निराकरणापर्यंतची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी एकात्मिक तक्रार व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली विकसित केली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत व्यवहार करणे अधिक सुलभ करण्यासाठी नागरिक आणि व्यवसायांशी संबंधित सेवांच्या प्रक्रियांचे पुनर्रचना व सुलभीकरण करण्यात येत आहे. अनावश्यक कागदपत्रे, कार्यालयीन फेऱ्या, प्रक्रियेतील टप्पे आणि प्रतीक्षा कालावधी कमी करून शक्य तिथे सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर भर आहे.
नागरिक (G2C) आणि व्यवसाय (G2B) सेवांचे परीक्षण करून नागरिकांचा सेवा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या अभिप्रायाच्या आधारे अनावश्यक कागदपत्रे, कार्यालयीन भेटी आणि प्रतीक्षा कमी करून सेवा प्रक्रिया अधिक स्पष्ट व सुलभ करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष वेळेतील माहिती देणाऱ्या डॅशबोर्डद्वारे प्रभाग स्तरापासून महानगरपालिका नेतृत्वापर्यंत कार्यप्रदर्शनाचा आढावा घेऊन आवश्यक सुधारात्मक उपाययोजना केल्या जातील.
या उद्दिष्टांना आधार देण्यासाठी शिस्तबद्ध बदल व्यवस्थापन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कार्यपद्धतीतील बदल, विभागीय समन्वय, जबाबदाऱ्यांची स्पष्टता, तंत्रज्ञानाचा वापर आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करणे यांचा एकत्रित विचार केला जात आहे.हा उपक्रम ‘मिशन मोड’ पद्धतीने राबविण्यात येत असून, अल्प आणि मध्यम कालावधीत ठोस, मापनयोग्य आणि नागरिकांना जाणवतील असे परिणाम साध्य करण्यावर भर आहे. नियमित पाहणी, कार्यप्रदर्शन मापन आणि वेळेत अडचणींचे निराकरण यामुळे सुधारणा प्रक्रियेला सातत्यपूर्ण गती दिली जाईल.
या उपक्रमाचा केंद्रबिंदू नागरिकांचा अनुभव हा आहे. जलद तक्रार निवारण, आपत्कालीन परिस्थितींमध्ये त्वरित प्रतिसाद, कमी कागदपत्रे व कार्यालयीन फेऱ्या, कमी प्रतीक्षा कालावधी, सुसूत्र डिजिटल सेवा आणि कार्यप्रदर्शनाबाबत अधिक स्पष्टता हे या प्रक्रियेचे अपेक्षित परिणाम आहेत. या उपक्रमाचा उद्देश केवळ अंतर्गत कार्यपद्धती बदलणे नसून, नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिकेच्या कार्यसंस्कृतीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. अधिक प्रतिसादक्षम, सुलभ आणि उत्तरदायी महानगरपालिका निर्माण करून मुंबईतील नागरिकांना अधिक चांगला, जलद आणि विश्वासार्ह नागरी सेवा अनुभव देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
'Participate Mumbai' या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महानगरपालिकेच्या नागरी गरजा आणि उद्योग, CSR संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांमधील उपलब्ध क्षमता यांच्यामध्ये एक सुसूत्र आणि परिणामकारक दुवा निर्माण करणे आहे. त्यासोबतच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्याने, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि इतर नागरी क्षेत्रामध्ये अनेक विकासात्मक गरजा आहेत. उद्योग क्षेत्राकडे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योगदान देण्याची मोठी क्षमता उपलब्ध आहे. पार्टिसिपेट मुंबई व्यासपीठ एकात्मिक व्यासपीठ (वन स्टॉप प्लॅटफॉर्म) म्हणून कार्य करेल. महानगरपालिकेच्या ४५० हून अधिक प्रकल्पाची आणि गरजाची माहिती येथे उपलब्ध असेल आणि इच्छुक भागीदारांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार योग्य उपक्रमाशी जोडण्याची संधी मिळेल. या सहभागाचे स्वरूप केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञान, तज्ज्ञ ज्ञान, कौशल्य, साहित्य, उपकरणे, सेवा, स्वयंसेवी सहभाग आणि अंमलबजावणी सहकार्य अशा अनेक स्वरूपात असू शकेल.
महानगराच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक प्रकारच्या क्षमतेला योग्य दिशा मिळणे हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिक, संस्था, कंपन्या, कॉर्पोरेट क्षेत्राने आपले योगदान देण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा म्हणाल्या की, एखाद्या संस्थेकडील तंत्रज्ञान, एखाद्या कंपनीचे कौशल्य, एखाद्या तज्ज्ञाचे ज्ञान किंवा नागरिकांचा स्वयंसेवी सहभाग, या प्रत्येक गोष्टीचे योग्य नागरी गरजेशी जोडलेले योगदान मुंबईच्या विकासाला नवी गती देऊ शकते. नागरिकांना अधिक दर्जेदार, जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आम्ही Samagra संस्थेसोबत सामजस्य करार देखील करत आहोत.
अधिक प्रतिसादक्षमता, व्यवहारात अधिक सुलभता, दृश्यमान, मोजता येण्याजोगे आणि प्रत्येक स्तरावर उत्तरदायी या तिन्ही बाबींना आधार देण्यासाठी शिस्तबद्ध बदल व्यवस्थापन (Change Management) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध विभाग व प्रभागांमधील समन्वय आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या अधिकारी व कर्मचाऱयांची क्षमता बांधणी यांचा समावेश आहे. समग्र उपक्रम मिशन मोडमध्ये राबविला जात असून, दर काही महिन्यांनी ठोस आणि मोजता येण्याजोगे परिणाम साध्य करण्यावर भर दिला जात आहे.तक्रारींचे जलद निराकरण, आपत्कालीन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद, अधिक सोप्या व सुसूत्र सेवा आणि नागरिकांप्रती मोजता येण्याजोगी अधिक उत्तरदायी महानगरपालिकेचे कामकाज करण्याचा मानस आहे

0 टिप्पण्या