: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी मुंबई प्रेस क्लब येथे केली. हे आंदोलन मुंबईपासून सुरू करून देशातील विविध शहरांमध्ये नेण्यात येणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणात ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत आरोप केले. “ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार असून ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, “जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असे दिपके यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास कमी झाल्याचा दावा करत दिपके म्हणाले की, लोकशाहीमध्ये नागरिक मतदान करून सरकार निवडतात; मात्र सध्याच्या परिस्थितीत “सरकार मतदार निवडत आहे की काय?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका करत ज्ञानेश कुमार हे त्यांचे “पपेट” असल्याचा आरोप केला.दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया आणि त्यातून मतदारांच्या नावांमध्ये झालेल्या बदलांवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये २०२५ ची मतदार यादी गोठवून त्याच आधारावर निवडणुका घेणे, SIR प्रक्रियेत झालेल्या बदलांबाबत पुनर्विचार करणे आणि भविष्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व स्वतंत्र करण्याचा समावेश आहे. “मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत नागरी समाजाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा,” अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या निवड प्रक्रियेच्या संदर्भात केंद्र सरकारकडून वेगळी भूमिका घेतली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
मतदार यादीतील बदलांबाबत दिपके यांनी २०२४ पासून सुमारे १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा दावा केला. मात्र उपलब्ध वृत्तांनुसार SIR अंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मसुदा मतदार याद्यांमधून १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळली गेल्याचे वृत्त आहे; अंतिम मतदार यादी आणि अपील प्रक्रियेनंतरची स्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. दरम्यान, मतदार यादीतील बदलांबाबत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत प्रक्रियेवरूनही प्रश्न उपस्थित झाले आहेत. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दोन निवडणूक आयुक्तांनी मागील दहा महिन्यांत काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धती आणि SIR संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.
मुंबईतून आंदोलनाला सुरुवात-अजिंक्य शिंदे यांनी आंदोलनाचा पुढील कार्यक्रम जाहीर करताना सांगितले की, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील गेट क्रमांक ६ पासून आंदोलनाला सुरुवात होईल. त्यानंतर गोवा, बंगळुरू, कोलकाता, पटना, उत्तर प्रदेश आणि रांची या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित आंदोलनांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतर येथे सिटिंग प्रोटेस्ट आयोजित करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी भारतीय राष्ट्रध्वज घेऊन यावे, तसेच गांधीजींच्या विचारांशी संबंधित टी-शर्ट परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना, हे आंदोलन “देशाची लोकशाही वाचवण्यासाठी” असल्याचा दावा दिपके यांनी केला.संघटनेची टीम जाहीर-यावेळी दिपके यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचीही ओळख करून दिली. अजिंक्य शिंदे हे नॅशनल ऑर्गनायझेशन इनचार्ज, मेहेर हे नॅशनल स्पोक्सपर्सन व पॉलिसी कामकाजाशी संबंधित जबाबदारी सांभाळत असल्याचे, आफ्रिन या नॅशनल सेक्रेटरी असल्याचे आणि गडे हे मुंबई कोऑर्डिनेटर असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपके यांनी आंदोलन देशभर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या प्रक्रियेबाबत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे SIR, मतदार यादीतील बदल आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरून सध्या राजकीय व सार्वजनिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू आहे.

0 टिप्पण्या