सत्यनारायणाची पूजा म्हटलं की जे डोळ्यापुढे येतं, त्यापेक्षा एक वेगळा सत्यनारायण मुंबईत होत होता. त्याचं नाव होतं झुणकाभाकर सत्यनारायण. ऐंशी वर्षांपूर्वीचा काळ आहे हा. स्वातंत्र्य हातातोंडाशी आलं होतं. पण देशातील जातपात आणि धर्माचा कडवटपणा वाढत होता. अशा वेळी माणसामाणसात समता यावी, यासाठी दलित जोडप्यांकडून सत्यनारायण करून घेणारे हे ब्राह्मण होते, अनंत हरी गद्रे.... त्या काळातही ‘ॲडव्हर्टायझिंग गुरू’ अशी त्यांची ख्याती होती. आज आपण जो हाऊसफुल्ल हा शब्द सर्रास वापरतो. तो त्यांनी दिलेला शब्द. त्या शब्दाची गोष्ट पुढे सांगतोच. पण जिथून ही पोस्ट सुरू केली तो विषय, झुणकाभाकर सत्यनारायणाचा. महाराष्ट्राच्या जातीअंताच्या लढाईतला हा एक अद्भुत प्रयोग होता. स्वतः गाडगेबाबांच्या डोळ्यात हा प्रयोग पाहून पाणी आलं होतं. गाडगेबाबांचा अत्यंत जवळचा स्नेही असलेल्या या अनंत हरी गद्रे यांची आज जयंती. त्यानिमित्त ही नोंद.
११ जानेवारी १९५४. अनंत हरी गद्रे यांच्या झुणकाभाकर सत्यनारायणाच्या प्रयोगाला संत गाडगेबाबा भेट द्यायला आले होते. पूजेचा विधी सुरू होता. दलित जोडपं यजमान म्हणून बसलं होतं. पूजा संपली. प्रसादाचा शिरा सर्वांना परवडणारा नाही, म्हणून झुणकाभाकर प्रसाद म्हणून वाटला गेला. त्यानंतर जे घडलं ते पाहून गाडगेबाबाही गहिवरले. ज्या दलित जोडप्यानं पूजा केली, त्यांचे पाय गद्रेकाका आणि त्यांच्या पत्नी सत्यभामाबाईंनी धुतले. त्याचं तीर्थ त्यांनी आपल्या ओंजळीत घेऊन ते प्राशन केलं. ही फक्त प्रतीकात्मक कृती नव्हती. ज्या समाजाला शतकानुशतकं अस्पृश्य मानलं गेलं, त्या समाजाची मागितलेली ती माफी होती. हे सगळं पाहून गाडगेबाबांनी गद्रे यांना जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते म्हणाले, “गद्रेकाका, तुम्ही छान! तुमचा झुणका-भाकर सत्यनारायण छान! तुम्ही महाराष्ट्रभर फिरा आणि सत्यनारायण करून हे शिवाशिवीचं भूत कायमचं काढून टाका. मी शंभर कीर्तनं करून जे साध्य करू शकत नाही, ते तुम्ही एका सत्यनारायणात करता!” बाबांच्या या शब्दांत गद्रे यांच्या प्रयोगाची ताकद काय होती, ते आपल्याला समजतं. दलित कुटुंबाचा असा सन्मान करणं, हा जातिभेदाच्या मानसिकतेला दिलेला थेट धक्का होता. गद्रे यांनी धार्मिक विधीचाच वापर करून हा धक्का दिला होता.
गद्रेकाका आणि गाडगेबाबा यांच्यातलं हे नातं विलक्षणच आहे. गाडगेबाबांना सरकारनं दिलेली गाडी ज्यांनी बाबांच्या अखेरपर्यंत चालवली, त्या भाऊराव काळे यांनी आम्हाला गद्रेकाकांच्या आठवणी सांगितल्या होत्या. बाबा आणि गद्रेकाका यांच्यातलं नातं भावाभावांपेक्षा कमी नव्हतं. गद्रेकाका बाबांना गुरुस्थानी मानत. अर्थात बाबांना गुरूशिष्य हे नातंच मान्य नव्हतं. ते म्हणायचे, मी कोणाचा गुरू नाही आणि कोणी माझा शिष्य नाही. आपण सगळे सारखेच आहोत. पण गाडगेबाबा आणि गद्रेकाका अखेरपर्यंत एकत्र होते. गिरगावातील गोरेगावकर लेनमध्ये गद्रेकाका राहायचे. त्या गोरेगावकर लेनच्या नाक्यावर असलेल्या, पोर्तुगीज चर्चच्या मोठ्या चौकाला समतानंद अनंत हरी गद्रे असं नावही दिलंय. अर्थात तिथं कुणाला आज विचारलं की, हे गद्रे कोण तर फार कोणाला सांगता येईल, अशी परिस्थिती नाही. आपण एवढ्या मोठ्या माणसांचं अल्पचरित्र तिथं का लिहीत नाही, हा प्रश्न मला कायम पडतो. केव्हा तरी आपल्याला आपल्या माणसांची किंमत कळावी, एवढीच त्या सत्यनारायणाला प्रार्थना.
असो, तर मुद्दा होता भाऊरावांनी सांगितलेल्या गद्रेकाकांच्या आठवणीचा. भाऊराव म्हणाले की, गोरेगावकर लेनमध्ये गद्रेकाकांना भेटायला गाडगेबाबा यायचे. तिथल्या चाळींमधले रस्ते, गल्ल्या, एवढंच काय, तर संडासही गाडगेबाबा आणि गद्रेकाका मिळून साफ करायचे. गोरेगावकर लेनमध्ये अशी सफाई करतानाचा एक फोटोही उपलब्ध आहे. पुढे गाडगेबाबांच्या आजारपणातही गद्रेकाका चोवीस तास त्यांच्यासोबत राहिले. गद्रेकाकांच्या या झुणकाभाकर सत्यनारायणाच्या प्रयोगामागे प्रेरणा होती, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि सहभोजनाच्या प्रयोगांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. वेगवेगळ्या जातींचे लोक एकत्र बसून जेवतात, ही गोष्ट त्या काळातच मोठं सामाजिक आव्हान होती. गद्रे यांनीही स्पृश्य-अस्पृश्य सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले. पुढे त्यांनी एक वेगळीच वाट निवडली. ज्या धार्मिक परंपरेच्या नावाखाली समाजात जातिभेद आणि अस्पृश्यतेला आधार दिला जात होता, त्याच परंपरेत जाऊन त्यांनी हा झुणकाभाकर सत्यनारायणाचा प्रयोग सुरू केला.
गद्रे यांचा हा प्रयोग सर्वांनाच मान्य होणार नव्हता, हे उघडच होतं. शेवटी व्हायचं तेच झालं. समाजातील सनातनी मंडळींनी त्यांना जोरदार विरोध केला. असाच एक विरोधाचा प्रसंग १२ सप्टेंबर १९५७ रोजी घडला. या कर्मठ सनातन्यांसमोर गद्रेकाका कडाडले. म्हणाले, ‘माझी चौकशी करा आणि माझी कृती समाजाचे अकल्याण करणारी आहे, असे सिद्ध करून दाखवा. जर हे सिद्ध झालं तर तुमच्या दारासमोर तुमच्या शुभहस्ते मला फटके मारा!’ पण सिद्ध करण्याच्या भानगडीत सनातनी पडत नाहीत, ते वेगवेगळ्या मार्गांनी हल्ले करत राहतात.
असाच एक प्रसंग घडला होता तो मुंबईतील सरदार हायस्कूलमधील झुणकाभाकर सत्यनारायणाच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमात आर. जी. सरदेसाई यांनी नव्या विवेकवादी कथावाचनाची जबाबदारी घेतली होती, तर राम मराठे यांनी भजन सादर केलं. अण्णासाहेब कर्वेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र त्या काळात रेशनिंगचे नियम लागू होते. एका कार्यक्रमात चाळीसपेक्षा अधिक लोकांना जेवण देण्यावर निर्बंध होते.
गद्रे यांच्या कार्यक्रमाला शंभराहून अधिक लोक जमले. प्रत्येकाला झुणकाभाकरीचा अगदी छोटा तुकडा प्रसाद म्हणून देण्यात आला. भाकरीचा छोटासा तुकडा आणि वाटाण्याएवढा झुणका, एवढाच तो प्रसाद होता. पण विरोधकांनी सरकारकडे तक्रार केली की, गद्रे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेशनिंगच्या नियमांना बगल देऊन लोकांना जेवण दिलं. परिणामी, त्यांच्यावर नियमभंगाचा खटला दाखल झाला. सामाजिक समतेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं प्रकरण आता सरकारी कारवाईपर्यंत पोहोचलं होतं.
गद्रे यांनी न्यायालयीन लढा दिला. खटला सुमारे दोन वर्षं चालला. कनिष्ठ न्यायालयानं त्यांना शंभर रुपयांचा दंड ठोठावला. त्या काळात शंभर रुपयांत तोळाभर सोनं येत होतं. गद्रे यांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केलं. न्यायमूर्ती छागला आणि न्यायमूर्ती गजेंद्रगडकर यांच्यासमोर हे प्रकरण आलं. उच्च न्यायालयानं दंडाची रक्कम शंभर रुपयांवरून दहा रुपये केली. न्यायालयानं नियमाचा तांत्रिक भंग झाल्याचं मान्य केलं, पण गद्रे यांचा हेतू चांगला असल्याचंही नमूद केलं. समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी चालवलेल्या चळवळीला प्रसादाच्या एका छोट्याशा तुकड्यावरून न्यायालयीन लढा द्यावा लागला, हे आज आपण विसरलोय.
गद्रे यांनी हा प्रयोग केवळ काही ठिकाणी करून थांबवला नाही. १९४१ पासून पुढे अनेक वर्षं त्यांनी महाराष्ट्रभर सार्वजनिक झुणकाभाकर सत्यनारायण आयोजित केले. भानु काळे यांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. त्यानुसार त्यांनी सुमारे साडेतीन हजार असे कार्यक्रम केले. या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांत पोहोचण्याचा संकल्प केला. त्यासाठी सरकारकडून त्यांना एक व्हॅन आणि एक लाख रुपयांची मदत मिळाल्याची नोंद आहे. या दौऱ्यात केवळ पूजा नसायची. स्वच्छतेचे कार्यक्रम, संतांच्या छायाचित्रांसह मिरवणुका, नाट्यप्रयोग, नकला आणि कीर्तनं अशा विविध माध्यमांतून अस्पृश्यतेविरुद्ध जनजागृती केली जायची.
बाबासाहेबांनीही गद्रेकाकांसोबत चर्चा केल्याची नोंद आहे. बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग यात कसा आणता येईल, याबद्दल गद्रे यांच्यासोबत चर्चा केली होती. गद्रे यांच्या कार्याची दखल करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी घेतली आणि त्यांना ‘समतानंद’ ही उपाधी दिली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता. धार्मिक परंपरेच्या चौकटीत राहूनही त्या परंपरेतील भेदभावाला आव्हान देता येऊ शकतं, हे आपल्या कृतीतून दाखवणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या कामाची ती पावती होती.
तर असे हे अनंत हरी गद्रे. ते स्वतःला अनेक ‘भानगडी’ करणारे म्हणायचे. त्यांचा हा झुणकाभाकर सत्यनारायणाचा प्रयोग आणि हाऊसफुल्ल हा शब्द ही त्यांची ओळख बनली. पण कोण होते हे अनंत हरी गद्रे, हे समजून घ्यायला हवं. फक्त समाजसुधारणा नव्हे, तर जाहिरात, भाषासुधारणा, नाटक, पत्रकारिता, साहित्यनिर्मिती यातही त्यांचं मोठं योगदान आहे.
अनंत हरी गद्रे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८९० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे झाला. लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीचा दौरा ‘संदेश’मध्ये कव्हर करणारा पत्रकार ही त्यांच्या करिअरची सुरुवात. पुढे त्यांनी ‘मौज’ हे साप्ताहिक सुरू केलं. आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ आणि वि. स. खांडेकर यांच्या ‘दोन ध्रुव’च्या प्रकाशनप्रक्रियेतही ते होते. नाटकं लिहिणं, त्यांच्या कल्पक जाहिराती करणं, हा त्यांचा हातखंडा. आचार्य अत्रे त्यांना ‘जाहिरातजनार्दन’ म्हणत.
याच आचार्य अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ या नाटकाचे मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सलग प्रयोग सुरू होते. नाटक इतकं लोकप्रिय झालं की प्रयोगाच्या दोन दिवस आधीच तिकिटं संपत असत. तिकीटखिडकी बंद दिसली की, प्रेक्षकांना नाट्यगृह भरल्याचं कसं कळणार? पूर्वी ‘तिकिटं सोल्ड’ असा बोर्ड लावायचे. पण गद्रे यांनी यावर भन्नाट उपाय शोधला. त्यांनी जाहिरातीत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधलं हाऊस आणि प्रेक्षागृह पूर्ण भरल्याचं सांगणारं फुल्ल हे शब्द जोडून ‘हाऊसफुल्ल’ हा शब्द वापरला. आज हा शब्द नाटक, सिनेमामधला मानाचा शब्द झाला. ‘हाऊसफुल्ल’ असाही एक सिनेमा येऊन गेला. पण हा शब्द देणारा अवलिया विस्मृतीत गेलाय.
गद्रेकाका हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. पण अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते त्यांचे मित्र होते. गांधीजींबद्दल त्यांच्या मनात आदर होता. गांधीजींनी हरिजनांसाठी केलेलं काम त्यांच्यासाठी आदर्श होतं. गोंदवले येथे त्यांनी गांधीजींच्या प्रेरणेवरून पाच दिवसांचा उपवास केला आणि मुस्लिम डॉक्टर तांबोळी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन सोडला. नंतर याच मुस्लिम डॉक्टरांकडून झुणकाभाकर सत्यनारायणाची पूजाही केली.
असाच आणखी एक किस्सा, १९४२च्या हिंदू-मुस्लिम दंगलीतला. वातावरण तापलेलं होतं. सोहराब मोदी यांच्या मिनर्व्हा मूव्हीटोनमध्ये काम करणाऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. गद्रेकाकांना मात्र तो निर्दोष असल्याची खात्री होती. गद्रे स्वतः हिंदू महासभेचे उपाध्यक्ष होते; तरीही त्यांनी धार्मिक ओळखीचा विचार न करता त्या मुस्लिम कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी पोलिसांकडे धाव घेतली. त्याचा जामीन घेतला. हिंदुत्व म्हणजे काय, हे त्यांना नीटच कळलं होतं.
त्यांच्या या भानगडींमध्ये त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई सोबत होत्या. त्यांनीही स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांपेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देताना आर्थिक अडचणी सोसल्या. आयुष्याच्या उत्तरार्धात गद्रेकाका आजारी पडले आणि काहीसे आर्थिक विवंचनेतही राहिले. ४ सप्टेंबर १९६७ रोजी कोल्हापूर येथे त्यांचं निधन झालं.
आज अनंत हरी गद्रे यांचं नाव फारसं लोकप्रिय नाही. तरी त्यांनी केलेल्या प्रयोगाचा विचार आज जास्त महत्त्वाचा आहे. जातिधर्माचं अवडंबर न माजवता, त्या धर्माचा वापर करूनच त्याला खिंडार कसं पाडायचं, यासाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं. आज १७ ऑक्टोबर, समतानंद अनंत हरी गद्रे यांची जयंती. आपल्या आयुष्यात स्वतःचं घर रिकामं करून, समाजाचं ‘हाऊसफुल्ल’ करणाऱ्या या महान समाजसुधारकाला विनम्र अभिवादन!
नीलेश बने
0 टिप्पण्या