Top Post Ad

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ते बाळकूम 'डेटा सेंटर प्रकल्प...अनिल काकोडकरांची बनेलगिरी! - rajanraje

जैतापूर अणुऊर्जेचे एक 'हितसंबंधी' समर्थक राजा पटवर्धन लिखित 'जैतापूरचे अणुमंथन' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डाॅ. अनिल काकोडकर पान क्र.११ वर म्हणाले होते, "एका विशिष्ट मर्यादेखाली, आण्विक-विविकरणाचे स्वास्थ्यविषयक धोके संभवत नाहीत"... तर, पान क्र.१३ वरील त्यांचं वाक्ताडन होतं,"...तसे पाहिले तर, जैतापूर प्रकल्पाची जागा सर्वदृष्टींनी आदर्श ठरावी." जेव्हा, आंतराष्ट्रीय-मानके आणि चक्रवर्ती-समितीच्या निर्देशानुसार, भूभ्रंशापासून ५ कि. मी. च्या त्रिज्येत अणुभट्टीचं बांधकाम करताच कामा नये. शिवाय, वर्ष-२००२च्या चतुर्वेदी-समितीच्या अहवालानुसार, माडबनच्या सड्यातूनच भूभ्रंश (भूकवचातील भेग...Fault Line) जाते; याव्यतिरिक्त, प्रकल्प-स्थळापासून ५ कि. मी. अंतराच्या आत, आणखी दोन भूभ्रंश असताना...या तथाकथित अणुशास्त्रज्ञ महाशयांनी, वरील धक्कादायक व धोकादायक प्रतिपादन केलेलं दिसतं. १९८५ ते २००५ या वीस वर्षांच्या कालावधीत, याच प्रकल्पस्थळाला मध्यम व मोठ्या स्वरुपाचे एकूण ९३ भूकंपाचे धक्के बसल्याची सरकार-दफ्तरी नोंद आहे. "His master's voice" असलेले काकोडकर, सरड्यासारखे रंग बदलत निर्मम-व्यवस्थेच्या पाशवी बळावर... निसर्ग-पर्यावरणाला विपरीत व 'व्यवस्थे'च्या सोयीची* अशी आपली मतं मांडताना, कायम दृष्टोत्पत्तीस आलेले आहेत.

...फक्त, "अणुवीजेच्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या प्रक्रियेत कार्बन-ऊत्सर्जन होत नसल्याने; अणुवीज, ही स्वच्छ व पर्यावरणस्नेही असल्याचा", धादांत खोटा व आम जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा दावा...NPCILचे तत्कालीन प्रमुख म्हणून ते करत होते. प्रत्यक्षात, ज्वलनशील दगडी कोळसा, तेल व वायू हे अणुइंधनाच्या तुलनेत सहजी उपलब्ध होतात. परंतु, भंजनशील अणुइंधन मिळवणे व त्यातून, पुढे वीज बनवणे व त्यात अनुस्यूत असलेले इतर आनुषंगिक टप्पे, हे अनेक 'ऊर्जाग्राही वा ऊर्जासघन' प्रक्रियांद्वारेच साध्य होण्याजोगे असतात. युरेनियमच्या खाणीपासून प्रारंभ केला; तर, अत्यल्प मात्रा असलेल्या या युरेनियम मूलद्रव्यासंदर्भातल्या उत्खननापासून अ) खनिज दळणे ब) केक बनवणे क) इंधन समृद्ध करणे (Enrichment) ड) वहातूक करणे इ) अणुभट्टी व तिचा गाभा बांधणे ई) वापरलेल्या अणुइंधनावर पुनर्प्रक्रिया करणे उ) अणुकचर्‍याची व यथावकाश अणुभट्टीची विल्हेवाट लावणे...अशा अनेक क्लिष्ट टप्प्यांवर, प्रचंड 'कार्बन-ऊत्सर्जन' करणारी खनिज-ऊर्जाच वापरली जाते. वर्ष-२००५ मधील युरोपियन संसदेच्या डाॅ. स्टाॅर्म व डाॅ. स्मिथ यांच्या सखोल अभ्यासातून, सर्वसाधारण दर्जाचे युरेनियम खनिज वापरल्यास...त्यातून अणुवीज मिळवताना होणारे 'कार्बन-ऊत्सर्जन', खनिज-इंधनातून वीज मिळवताना होणाऱ्या कार्बन-ऊत्सर्जनाएवढेच जवळपास असते, हे निर्विवाद सिद्ध झालंय.

साध्या ५५० मेगावॅट क्षमतेच्या तारापूर-अणुप्रकल्प परिसरात आण्विक-विविकरणाचा (Atomic Radiation) परिणाम म्हणून रक्तक्षय, हाडे ठिसूळ होणे, अपस्मार, कायमस्वरुपी अंग व डोकेदुखी, कापरे भरणे इ. इतर अनेकोनेक व्याधी व शारीरिक विकृतींसह, अनेकांच्या अंगावर उठलेले 'कोड'सदृश चमकणारे लोकांच्या चेहर्‍यावरचे डाग, प्रत्यक्ष तो परिसर पिंजून काढताना आम्ही पाहिलेले आहेत (जे सहजी दिसू शकणारं आण्विक-विविकरणजन्य 'कोड', मिस्टर का'कोड'करांच्या अधू नजरेला कधि दिसू शकलं नाही)... आणि, त्यावरच बेतलेली, "HIGH POWER", ही जनजागृती करणारी प्रत्ययकारी चित्रफीत (Documentory) आम्ही जीव धोक्यात घालून तेव्हा बनवली होती.

सरकारी 'अणुऊर्जा-धोरणा'चा पुरस्कार करताना; तेव्हा, नवोन्मेषाने पुढे येऊ पहाणार्‍या 'सौरऊर्जा-संकल्पने'वर एकच टीकेची झोड, काकोडकर वारंवार उठवत होते व "अणुऊर्जा, ही कशी अधिक किफायतशीर, स्वच्छ व सोयीची ऊर्जा आहे"...हे जनमानसात दामटून रुजवण्यासाठी अगदी घोटून घोटून सांगत होते...पण, त्यानंतर, जसं सरकारने त्यांना 'सौरऊर्जा-मोहिमे'चं (Solar Mission) प्रचारक बनवलं; तसं, 'बनावट हिंदुत्वा'चं गरळ ओकणाऱ्या व धर्मविद्वेषाचा विखार पसरवणार्‍या 'संघीय-प्रचारका'सारखे (नरेंद्र मोदी, हे त्याचं अस्खलित उदाहरण) अणुतज्ज्ञ डाॅक्टरसाहेब, 'अबाऊट टर्न' करत अणूऊर्जेला मागे टाकून सौरऊर्जेची नको तेवढी भलामण करत सुटले.

...बरं, काही वर्षांपूर्वी हे सद्गृहस्थ ठाण्यात, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत भाषण करण्यासाठी आले; तेच कार्बाईनधारी अंगरक्षकाच्या कोंडाळ्यात, इतःपर ठीक...पण, 'काकदृष्टी' अशी की, आम्हाला प्रेक्षकांमध्ये अणुऊर्जेविरोधात 'शास्त्रीय-सत्यकथन' करणारी पत्रके वाटताना पहाताच...भाषणापश्चात, प्रेक्षकांना प्रश्न विचारण्याला पूर्ण बंदी घालूनच त्यांनी भाषणाचा प्रारंभ व इतिश्री केली (इथेही, एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देणाऱ्या, नरेंद्र मोदींच्याच पावलावर 'काकोडकरी' पाऊल ठेवणं झालं म्हणायचं); अशी ही एकूणच, 'कोकोडकरी-काकवृत्ती'ची, स॔क्षेपानं रंजक कहाणी! ...तेव्हा, त्यांच्याकडून प्रस्तावित बाळकुममधील 'डेटा सेंटर प्रकल्पविषयक तज्ज्ञ-समिती अध्यक्ष म्हणून, काय अहवाल येईल...याचा आगाऊ अंदाज वाचकांनी व संबंधितांनी बांधावा, म्हणून हा सगळा लेखनप्रपंच; जेणेकरुन, आशाळभूतासारखी समितीच्या अहवालावर नजर लावून कुणी बसायचे आणि पदरी, *जगभरातल्या सुविद्य व जाणकार-जागृत जनतेनं लाथाडलेल्या 'डेटा सेंटर'चे निखारे* पडून, त्यांचा अवसानघात व्हायचा...धन्यवाद!

  • राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
  • (संकलन सहाय्य > ॲड. गिरीश राऊत, आयोजक : भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com