राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा केली. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या आशा वर्कर्सनाही प्रत्येकी 6 हजार रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
*) :
या पत्रकार परिषदेस सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी.जी. गोदेपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिपक शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत नुकतीच महापौर दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 24 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यामध्ये वाढ करून 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
या निर्णयाचा लाभ ठाणे महापालिकेचे 6 हजार 294 कर्मचारी, परिवहन सेवेचे 1 हजार 285 कायम कर्मचारी तसेच महापालिकेतील थेट कंत्राटी, *कोविड अंतर्गत कार्यरत* व इतर 368 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या सानुग्रह अनुदानापोटी ठाणे महानगरपालिकेवर सुमारे 20 कोटी 11 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
महापालिकेचे कर्मचारी वर्षभर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू रहावी यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या सणाच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्सच्या योगदानाची दखल घेत त्यांनाही दिवाळीनिमित्त प्रत्येकी 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीपासून ते माता-बाल आरोग्य, लसीकरण, आरोग्य सर्वेक्षण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत आशा वर्कर्स महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्यांनाही दिवाळी भेट देण्यात आली असल्याचे महापौरांनी नमूद केले.
0 टिप्पण्या