अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित जुहू येथील गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छोट्या हॉटेल व्यावसायिकांसह डॉरमेट्री आणि पेइंग गेस्ट (पीजी) सुविधा पुरवणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण लक्ष्य करू नये, अशी मागणी सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी केली आहे. या व्यावसायिकांना प्रशासनाकडून अनावश्यक त्रास दिल्यास संबंधित उद्योजक, कर्मचारी आणि नागरिकांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबईतील छोटी हॉटेल्स, डॉरमेट्री आणि पेइंग गेस्ट सुविधा या सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय नोकरदार, विद्यार्थी तसेच पर्यटकांसाठी परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध करून देतात. या व्यवसायांमुळे हजारो व्यावसायिकांसह लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न जोडलेला आहे. त्यामुळे एखाद्या गुन्हेगारी घटनेच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण व्यवसाय क्षेत्राकडे संशयाच्या नजरेने पाहणे अन्यायकारक ठरेल, असे प्रा. जाधव यांनी स्पष्ट केले.जुहू येथील गोळीबाराच्या घटनेशी कोणताही संबंध नसलेल्या हॉटेल, डॉरमेट्री आणि पीजी व्यावसायिकांना केवळ संशयाच्या आधारे त्रास देऊ नये. कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस आणि महापालिका प्रशासनाने सहकार्य व संरक्षण द्यावे. नियमांचे पालन करणारे व्यवसाय बंद पाडण्याऐवजी आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एकीकडे बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन रोजगारनिर्मितीवर भर दिला जात असताना दुसरीकडे सुरू असलेले छोटे व्यवसाय बंद पाडणे योग्य नाही. छोटे हॉटेल आणि निवास सुविधा अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतात. अशा व्यवसायांमुळे तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासह त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर ठेवण्यासही मदत होते. त्यामुळे प्रशासनाने या व्यवसायांकडे सकारात्मक आणि सहकार्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन छोट्या हॉटेल व्यावसायिकांसह डॉरमेट्री आणि पीजी चालकांना संरक्षण व सहकार्य द्यावे. अन्यथा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रूपेशशेठ हेमंतजी गुगळे पाटील यांच्या नेतृत्वासह पक्षाच्या वतीने संबंधित व्यावसायिकांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा ठाम इशारा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रूपेशशेठ हेमंतजी गुगळे पाटील यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या