ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी ठाणे कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु यापैकी एका मार्गिकेवर तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा पूल भविष्यात धोकादायक ठरू शकतो. सुरुवातीलाच पुलाला तडे गेल्याने यावर वाहनांची ये-जा सुरु झाल्यास तो कधीही कोसळू शकतो ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणून दिली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पुलाचे चार लेनचे बांधकाम पूर्णत्वास येत असून यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. याच पुलावरून रोज हजारो वाहने विशेषतः अवजड वाहने ये-जा करणार आहेत. या पुलाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे कळते. या नव्या कोऱ्या लेनवर आडवे मोठे तडे गेले असून पुलाला असलेल्या काँक्रीटच्या अँटी क्रॅश बॅरिअरलाही तडे गेले आहेत. विशेष म्हणजे पुलाखाली असलेले कपस्टोनही तुटलेले दिसत असून हा भाग कमकुवत झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करणार असून अवजड वाहनेही यावरून जाणार आहेत. पुलाची दैना पाहता आम्ही हे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला असून आयआयटीमार्फत या पुलाच्या बांधकामाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या