Top Post Ad

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आयोजित ‘व्हिजन फॉर मुंबई सिटी

*मुंबईतील नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कटिबद्ध आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सोयी-सुविधांची व्याप्ती वाढवण्याच्या अनुषंगाने तसेच विकसित आणि सक्षम मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आदी विविध अंगांनी पायाभूत सुविधांची पायाभरणी केली जात आहे. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांप्रमाणेच मुंबईचादेखील विकास सुरू आहे, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले. 


रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या वतीने ‘व्हिजन फॉर मुंबई सिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. गगराणी यांनी मुंबईच्या पायाभूत विकासाबाबत आज (दिनांक ०९ सप्टेंबर २०२५) मांडणी केली. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. बिमल मेहता, सचिव श्री. फरहत जमाल, श्रीमती रिना देवरा आदी पदाधिकारी तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. 

गगराणी पुढे म्हणाले, मुंबईकर नागरिकांना विविध प्रकारच्या आणि दर्जेदार नागरी सोयी-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अविरतपणे प्रयत्न सुरू असतात. मागील काही वर्षांमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांवर एकूण भांडवली अर्थसंकल्पाच्या सुमारे ५२ टक्के इतकी गुंतवणूक केली आहे. मुंबई महानगराच्या जमिनीखाली अनेक पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. या सुविधा प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे नागरिकांना ते जाणवत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील अशा अग्रणी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे जी स्वत:च्या अखत्यारितील पाच धरणांच्या माध्यमातून नागरिकांना वर्षाचे ३६५ दिवस अखंडपणे रोज सुमारे ४ हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करते. विशेष म्हणजे, नागरिकांच्या घराच्या नळापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अव्याहतपणे पुरवठा करते. सध्या मुंबईत महानगरपालिकेकडून सात मलजल प्रक्रिया केंद्रांच्या (एसटीपी) रुपात अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. सन २०२८ पर्यंत या सात मलजल केंद्रांच्या माध्यमातून मलजलावर प्रक्रिया करुन पिण्यायोग्य स्वरुपातील पाणी समुद्रात सोडले जाईल. यातून मलजलाच्या समस्येवर तोडगा निघेल पर्यायाने मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांलगत स्वच्छ पाणी आपल्याला पाहता येईल. मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांच्या बळावर मुंबई महानगर हे आगामी काळात ‘जुन्या चैतन्यासह नवे शहर’ (न्यू सिटी विथ ओल्ड स्पिरीट) या संकल्पनेप्रमाणे भासू लागेल, असा आशावादही श्री. गगराणी यांनी यावेळी व्यक्त केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com