Top Post Ad

घोडबंदर सेवारस्त्याच्या विलीनीकरणाचा ‘वादग्रस्त प्रकल्प’ रद्द न झाल्यास, ठाणेकरांचा जनउद्रेक

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील, घोडबंदर रस्त्यावर असणाऱ्या, कापुरबावडी ते गायमुखपर्यंतच्या महामार्गावरील सेवारस्ता (सर्व्हिस रोड) मुख्य रस्त्यात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतलेला असून, या विलीनीकरणाच्या माध्यमातून सेवारस्ता (सर्व्हिस रोड) आणि मुख्य रस्त्यामधील पदपथ कायमस्वरुपी काढले जाणार आहेत. अशाप्रकारे पदपथ काढून टाकणे म्हणजे, सर्वसामान्य करदात्या पादचाऱ्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे होय. पदपथ हे, नागरिकांना चालण्यासाठी असतात, तेच काढून टाकल्यावर, नागरिकांचे जीवित धोक्यात येऊ शकते. याबाबत ठाणेकर नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, यासंदर्भात ठाणेकर नागरिकांचा उद्रेक झाल्यास, त्याला सर्वस्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा इशारा 'धर्मराज्य पक्षा'ने दिला आहे. 

याच पार्श्वभूमीवर, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. १६/०७/२०२४ रोजी, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, आणि ठाणे वाहतूक शाखेचे तत्कालीन उप-आयुक्त विनयकुमार राठोड यांना, पत्रव्यवहार करुन (पत्राचा संदर्भ क्र. धराप/मुमं/मरा/मंमुं/२०२४/५०) “नागरिकांच्या वित्तहानी आणि जीवितहानीस कारणीभूत ठरणारा, घोडबंदर सेवारस्त्याच्या (सर्व्हिस रोड) विलीनीकरणाचा वादग्रस्त प्रकल्प रद्द करणेबाबत...” अशा आशयाची आग्रही मागणी करण्यात आली होती. याच अनुषंगाने पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत, कासारवडवली वाहतूक उप-विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांची स्वाक्षरी असलेले, दि. १९/१२/२०२४ रोजीचे पत्र (जावक क्र. पोनि/वा.उपविभाग.कासारवडवली/८८१/२०२४) 'धर्मराज्य पक्षा'स तब्बल सहा महिन्यांनी प्राप्त झाले असून, सदर पत्रात, जितेंद्र राठोड साहेब, कासारवडवली वाहतूक उप-विभागाच्या हद्दीतील सेवारस्त्यावर (सर्व्हिस रोड) पार्क केलेल्या वाहनांवर, वाहतूक विभागाकडून, प्रचलित कायद्यानुसार केलेल्या कारवाईची आकडेवारी नमूद केलेली आहे; 

मात्र, मुख्य रस्ता आणि सेवारस्ता (सर्व्हिस रोड) यांच्या विलीनीकरणामुळे, पदपथ काढले जाणार असल्याने, अपघातांचा संभाव्य धोका निर्माण होणार आहे, त्याबद्दल वाहतूक विभागाने हात वर केलेले आहेत. महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्यावर (सर्व्हिस रोड) अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात, त्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई होणे हे, क्रमप्राप्त आहे... परंतु, त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पदपथ हे अत्यंत महत्त्वपूर्ण असताना, तेच काढले जाणार असतील आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवत असल्यास, ठाणे वाहतूक शाखा आपली जबाबदारी टाळत असल्याचेच, कासारवडवली वाहतूक उप-विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या उत्तरादाखल प्राप्त झालेल्या पत्रातून अधोरेखित होत आहे. 

मुळात, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-१९६६ नुसार, इमारत रेषा आणि नियंत्रण रेषा यांमधील अंतरे कलम-१५४ नुसार, सेवारस्ता (सर्व्हिस रोड) व महामार्ग एकत्र करणे हे, कायद्याचे उल्लंघन असतानादेखील, खुद्द राज्य शासनाकडून सुरक्षिततेसंबंधीचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचा 'धर्मराज्य पक्षा'ने पत्रातून प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. मध्यंतरीच्या काळात, हा “वादग्रस्त प्रकल्प” रद्द करण्यात यावा, अशी मागणी घोडबंदरवासियांकडून करण्यात आली होती. असे असतानाही, नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी असणारे पदपथ विलीनीकरणाच्या नावाखाली तोडले जाणे हे, अत्यंत धोकादायक असून, घोडबंदर सेवारस्त्याच्या (सर्व्हिस रोड) विलीनीकरणाचा ‘वादग्रस्त प्रकल्प’ ठाणेकर नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडून, जनभावनेचा तीव्र उद्रेक होण्यापूर्वीच तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करीत, यासंदर्भात ठाणेकर नागरिकांचा उद्रेक झाल्यास, त्यास सर्वस्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा निर्वाणीचा इशारादेखील पत्राद्वारे दिला असल्याची माहिती पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख. संजय दळवी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com