Top Post Ad

तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज पर्यंतचा अद्भूत प्रवास शक्य झाला !

 ' जिजाऊ मातेनं बाळ शिवबाला बळीराजापासून सम्राट अशोकापर्यंतचे आदर्श घालून दिलेत, तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज पर्यंतचा अद्भूत प्रवास शक्य झाला ! '

कुणबी - मराठा समाजातल्या पावण्यारावळ्यांनो, बागायत शेती आणि राजकारण या बळावर पैशापाण्यानं गब्बर झालेले 'सरंजामदार' म्हणजे अख्खा मराठा समाज, हा लोकांचा गैरसमज दूर करा... मराठा समाजातल्या कोरडवाहू, गोरगरीब, शोषितपिडीतांची संख्या त्या धनदांडग्या मराठ्यांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. परजातीला शिव्या घालणारे आणि मनुवाद्यांना बळ देणारे हे 'झागीरदार' आपल्या समाजाचे प्रतिनिधी नाहीत. त्यांचं नेतृत्व झुगारुन द्या.
आंदोलनाच्या निमित्तानं आपल्यातल्या दीनदुबळ्या, कमकुवत वर्गाचं जे संघटन झालंय त्याचा उपयोग आता आपला समाजाचा मेंदू विकसित करण्यासाठी करूया, तरच आपण उन्नत होऊ, समृद्ध होऊ. आंबेडकरी समाजाची प्रगती फक्त आरक्षणामुळे नाही, तर शिवरायांपासून भीमरायांपर्यन्त आणि फुलेंपासून राजर्षी शाहूंपर्यन्त महामानवांचे विचार मनामेंदूत मुरवून वाटचाल केल्यामुळे झाली आहे ! आपणही आंबेडकरी समाजाचा आदर्श घेऊन अशी बौद्धिक आव्हानं पेलण्यासाठी समर्थ होऊया. आपल्या गांवात तरूण मुलांना धर्माच्या नांवाखाली भडकवण्यासाठी कुणी येत असेल तर वेळीच सावध व्हा. त्या मार्गानं मराठ्यांचं कधीही भलं होणार नाही. आपला हिंदू धर्म हा नामदेव, ज्ञानोबांपासून संत तुकाराम महाराजांनी सांगीतलेला मानवतेचा धर्म आहे. आपला अभिमान असलेल्या छत्रपती घराण्याचा खरा इतिहास आणि छत्रपतींचे खरे शत्रू समजण्यासाठी वाचन वाढवूया. कुणब्यांनो, शेती करताना पिकाला वेळच्या वेळी खतपाणी घालता ना? तसं आपल्या पोरांच्या मेंदूत योग्य 'खतपाणी' जातंय का, यावर नीट लक्ष ठेवा.
मराठा भगिनींनो, कुठल्यातरी भोंदू बुवाबापूंच्या भक्तीत अडकून, स्वत:ची अधोगती करून घेण्यापेक्षा नवनविन तंत्रज्ञानाला गवसणी घालून जगभरातल्या महिलांशी बरोबरी करा. खरा इतिहास वाचा. बहुजनांमधल्या सुविचारी, विवेकी महीलांनीच क्रांतीचा पाया घातलाय. जिजाऊमातेनं बाळ शिवबाला बळीराजापासून सम्राट अशोकापर्यन्तचे आदर्श घालून दिले, तेव्हा कुठे शिवबाचा छत्रपती शिवाजी महाराज पर्यन्त अद्भूत प्रवास शक्य झाला !
तरण्याबांड मराठा बछड्यांनो, आपली खरी परंपरा समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया ऐकून रक्त सळसळतं ना? आता शिवरायांना 'माणूस' म्हणून समजून घ्या. या लढाया त्यांनी कुणासाठी आणि कशासाठी केल्या, त्यांचे खरे शत्रू कोण होते, हे समजून घ्या. विषारी शिवशाहीरांच्या, नथुरामी कीर्तनकारांच्या आणि मनुवादी किडेबाजांच्या नादी लागून आपलं आयुष्य बरबाद करू नका. छत्रपतींना छत्रपती बनण्यात कुणी अडथळे आणले आणि छत्रपती घराण्याचं छत्रपतीपद कुणी काढून घेतलं, हे जाणून घेतलंत तर आपल्याला छत्रपती शब्दावरून उचकवणारेही त्याच विचारधारेचे लोक आहेत, हे तुम्हाला कळेल. बहुजनांचा इतिहास समजून घेण्यासाठी आंबेडकर वाचा, फुले वाचा, शाहूराजा समजून घ्या... अगदी आजचे आ.ह.साळुंखे वाचा, शरद पाटील वाचा. महत्त्वाचं म्हणजे धर्माधांच्या जाळ्यात फसण्यापेक्षा स्वत:च्या घराची भरभराट करण्यासाठी चांगली नोकरी, चांगला व्यवसाय निवडा. दंगली घडवण्यासाठी हातात तलवारी नाचवण्यापेक्षा, आयुष्य घडवणारी विज्ञान-तंत्रज्ञानाची पुस्तकं वाचा. चांगल्या मार्गानं भरपूर पैसा कमवा. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेनं समाजासाठी वेळ द्या. समाजाचा उद्धार करण्यासाठी खारीचा वाटा उचला. हे खरं 'शिवकार्य' !
...आपल्यासोबतचा जो इतरजातीय बहुजनवर्ग आहे, त्यांचा मायेनं हातात हात घ्या. आपल्यात फूट पाडण्यासाठी खुप मोठी अजस्त्र शक्ती नियोजनबद्ध पद्धतीनं काम करतेय. अब्जावधी रुपये आणि सत्तेचा दबाव वापरून मराठा विरूद्ध ओबीसी, दलित विरूद्ध मराठा, माळी विरूद्ध धनगर... वगैरे वगैरे आगी लावल्या जाताहेत... त्याला बळी पडू नका. कुणब्यांनो शेतात माजलेलं तण आपण जसं खुरप्यानं उपटून टाकतो, तसं हे जातीजातींतलं द्वेषाचं तण नेस्तनाबूत करायला सज्ज व्हा. त्यानंतर आपलं मायेचं, प्रेमाचं, बंधुभावाचं, समतेचं पीक चैतन्यानं सळसळून कसं डोलायला लागतंय ते बघाच. स्वत:ही समृद्ध होऊया आणि समस्त बहुजन वर्गाला उन्नत करूया.
  • जय शिवराय... जय भीम.
  • किरण माने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com