भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्र औचित्यावर रविवारी पवई, हिरानंदानी येथील जयभीम नगर येथील बुद्ध विहाराच्या प्रशस्त प्रांगणात महामानवास मानवंदना अर्पण करण्यात आली. जयभिमनगर बुद्धभूमी वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात देश-विदेशातून आलेल्या 600 पेक्षा जास्त भिक्खूनी सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
भिक्खूसंघाने आयोजित केलेल्या या हृदयस्पर्शी महामानवाला मानवंदनेत भदंत संघप्रिय थेरो, भदंत शिलबोधी थेरो, भदंत आर. आनंद थेरो, भदंत शांतिरत्न महाथेरो, भदंत के. आर. लामा, भदंत पद्मपाणी थेरो, भदंत बोधिशील थेरो, भदंत करुणासागर बेरो, भदंत बोधिधम्म थेरो, भदंत निवीण थेरो, भदंत उपाली थेरो आदिं भिक्खुंचा प्रमुख सहभाग साक्षात बोधगयेची आठवण करून देत होता. धम्मदेसना, परित्राण पाठ, मंगलमैत्री, तसेच भव्य धम्मरॅलीचे नेत्रदीपक आयोजन करण्यात आले होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामिचे सुमधुर स्वर उपस्थितांच्या मुखातून बाहेर पडताना त्या मंत्रघोषात सर्व वातावरण मंगलमय शांतीचे निर्व्याज अवर्णनीय तेजोपुंज सर्वांच्याच मुखकमळावर पहायला मिळत होते. पांढ्रया शुभ्र वस्त्रानी अलंकृत असलेल्या उपस्थित उपासकवर्गाने यावेळी बुद्धाच्या करुणेचे साक्षात दर्शन घडविले. यावेळी जागतिक किर्तीचे भदन्त विशुद्धानंदबोधि महास्थविर यांनी अध्यक्षस्थानी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आभाळायेवढया विशाल कार्यास गवसनी घालत त्यांच्या जागतिक किर्तीचा गौरव केला. त्यांनी बौद्ध धर्माची महती कथन करताना भगवान बुद्धाच्या दया, क्षमा, करुणा आणि शिलतेचा संदेश जगभरात शांती प्रदान करतोय असे म्हटले. आपल्या धम्मदेसनेत ते पुढे म्हणाले, भारताची राष्ट्रीय एकता आणि सर्वभौमिक मानवतेचा संदेश हाच बाबासाहेबांच्या विचारधारेचा मुख्य स्वर होता. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच मूल्यांवर भारतीय संविधान उभे आहे. म्हणूनच भारतीय समाजात राष्ट्रीय एकात्मतेची दृढ भावना निर्माण केली जात आहे.जात-धर्म-भाषा भेद ओलांडून माणुसकीचा सार्वभौम संदेश पोचवला जगात पोहचवीला जातोय.तरुण पिढीला नीतिमूल्य, विवेक आणि धम्मप्रेरणा दिली जात आहे. संविधान जगणे आणि जपणे ही कर्तव्यभावना बळकट केली जात आहे. हा धम्मसोहळा केवळ स्मरणाचा नव्हे तर परिवर्तनाचा, बाबासाहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचा आहे. धम्म म्हणजे मानवतेची मूल्ये, समतेची संस्कृती बंधुत्वाची ऊर्जा याच मूल्यांचा प्रसार हीच या कार्यकमाची प्रेरणा आहे. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व मानतो आणि बोधिसत्वाचा प्रवास बुद्धत्वाकडे असतो. बुद्धत्व प्राप्तीसाठी दहा पारमिता, दहा उपपारमिता तसेच दहा परमार्थ पारमितांची आवश्यकता असते. बाबासाहेब आमचे पिता- त्यांच्या मंगल पारमितेची वृद्धी करण्यासाठी आपण सर्वानी या मंगल कार्यात सहभागी झाल्याचे समाधान होतेय, हीच खरी मानवंदना होय. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण बौद्धिक मूल्ये आणि संविधानामुळे मानवमुक्तीच्या भविष्याकडे एकाच दिशेने वाटचाल करण्यास कटीबद्ध होतोय.


0 टिप्पण्या