Top Post Ad

मुंबईतील ससून डॉक बंद... हजारो मच्छिमार आणि छोटे व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने मुंबईतील ससून डॉक येथील गोडाऊन बंद करण्याची कारवाई केली. यामुळे कोळी मच्छीमार बांधवांमध्येच नाही तर त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. ससून डॉक येथील गोडाऊनवर करण्यात आलेली कारवाई म्हणजे ससून डॉक कायमचे बंद करून ते दुसरीकडे हलवण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप   विधान परिषदेचे मा. आमदार तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चेतन पाटील तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ, मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लि. कुलाबा कफ परेड, श्री मार्तड प्रसन्न कुलाबा मत्स्योद्‌योग विविध कार्यकारी सोसायटी लि. कुलाबा, मल्हारी मार्तंड मच्छीमार सोसायटी रेवस, ससून डॉक मासे विक्री महिला वेल्फर असोसिएशन कुलाबा, दयोवती महिला संघ व इतर मच्छीमार संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सन 1871 मध्ये ब्रिटिश राजवटीनं मुंबईतील कुलाब्यात ससून डॉक सुरू केला. बंदराचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौरस मीटर असून, त्यावर 150 हून अधिक गोडाऊन आहेत. सन 2014–15 मधील रेकॉर्डनुसार 1984 पासून मुंबई ट्रस्टनं महाराष्ट्र मत्स्यविकास महामंडळाला सदर गोडाऊन भाडेतत्त्वावर दिली आहेत. मत्स्य विकास महामंडळानं ही गोडाऊन सप्लायर्स आणि मासळी व्यावसायिकांना व्यापार वृद्धीसाठी 5 ते 25 हजारपर्यंत मासिक भाड्यानं दिली आहेत. पोट भाडेकरू म्हणून आम्ही सदर भाड्याची रक्कम महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाकडं नियमितपणे जमा केली. मात्र, महामंडळानं सदरची 25 कोटी रुपयांची रक्कम मुंबई पोर्ट ट्रस्टकडे जमा केलेली नाही.   खोल समुद्रात मासेमारी करून अनेक जहाजे या बंदरावर येतात. स्थानिक महिला आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या कोळी महिला इथं मच्छी घेऊन पुढे त्याची विक्री करण्यासाठी आपापल्या परिसरात जातात. इथूनच परदेशात देखील ताज्या मासळीची निर्यात केली जाते. त्यामुळं मागील काही पिढ्यांपासून कोळी समाजाचं ससून डॉक हा उदरनिर्वाहाचं साधन बनला आहे. मात्र, केवळ प्रशासनातील गोंधळामुळं आणि हा ससून डॉक काही बड्या उद्योगपतींना देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे हे उदरनिर्वाहाचं साधन कायमस्वरूपी बंद करण्यात आले.  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या कारवाईचा परिणाम कोळी मच्छीमार, मासे विक्रेते तसेच ससून डॉक येथे उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कामगारांवर झाला असल्याचे चेतन पाटील यांनी सांगितले.

ससून डॉक येथील बंद केलेली गोडाऊन उघडणे. (दिनांक १२ जून २०१५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील इतिवृत्तातील निर्णय लागू करणे.) ससून डॉक येथे सुसज्ज अत्याधुनिक सुविधांसह बंदर उभारणे. १०० मीटर जेट्टी वाढविणे. राणी जाधव यांनी ससून डॉक संदर्भातील दिलेल्या अहवालामध्ये फेरबदल करणे. ससून डॉक स्वयं पुनर्विकास करण्यासाठी द्यावे यासोबतच  मुंबईतील कोळीवाड्यांच्या झालेल्या सीमांकनाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन कोळीवाड्यांचा डी.सी.आर. मंजूर करावा.  महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता दि. २०/१०/२०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे मा. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ समिती गठित करण्यात यावी.

 तामिळनाडू व आंध्र प्रदेश राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना पावसाळी हंगामातील मासेमारी बंदी कालावधीत खावटी अनुदान देणे. तसेच याकरिता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आर्थिक तरतूद करावी. किनारपट्टीवरील मच्छीमारांचा मासे सुकवणे, मासे उत्तरविणे, मासळीवर प्रक्रिया करणे व जाळी विणणे याकरीता असणाऱ्या जागांवर हक्क राहिला पाहिजे.  मच्छी मार्केटच्या पुनर्विकासाच्या धोरणात सुधारणा करणे व खाजगी मार्केटमध्ये आवश्यक सोयी सुविधा देणे.  जमशेदजी बंदर, कुलाबा आणि गिरगाव ही मासेमारी बंदरे हटवण्यात आली आहेत ती परत लिस्टवर घेणे.  बॉम्बे पोर्ट ट्रस्ट या प्राधिकरणांतर्गत असलेले कोळीवाडे (मच्छीमार वसाहती), मच्छीमारांच्या पारंपारिक व्यवसायाच्या जागा या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या स्वतंत्र धोरणातून वगळण्यात याव्या.  मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट हे स्थलांतर न करता त्यांना तिथेच तळ मजल्यावर जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले असून यावर लवकरच निर्णय घ्यावा असे मत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

शासनाच्या या धोरणाविरोधात मुंबईतील ससून डॉक मासेमारी बंदरावरील गोडाऊन बंद केल्याच्या निषेधार्थ कोळी महासंघ व ससून डाक मासेमारी बंदर बचाव कृती समितीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी ससून डॉक ते आझाद मैदान भव्य लक्षवेधी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली त्यामुळे या मोर्चाला स्थगित करण्यात आले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com