१९९२ पासून आजवर मुंबई महानगरपालिकेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अनेक युत्या झाल्या, आघाड्या तुटल्या, पण सध्याच्या राजकारणात जो 'वापर करून सोडून देण्याचा' प्रकार सुरू आहे, तो लोकशाहीसाठी आणि विशेषतः सामाजिक समतेच्या राजकारणासाठी चिंताजनक आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी काल जे उद्गार काढले, ते केवळ एका नेत्याचे नसून महायुतीमधील एका उपेक्षित घटकाचा तो 'स्फोट' आहे. "आमच्या स्वाभिमानावर झालेला हा आघात आहे," असे जेव्हा आठवले म्हणतात, तेव्हा महायुतीतील बड्या भावांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.
काल दुपारी ४ वाजता जागावाटपाच्या चर्चेसाठी वेळ ठरवण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांनी साधी शिष्टाचार पाळण्याची तसदीही घेतली नाही. तासनतास ताटकळत ठेवणे आणि चर्चेला महत्त्व न देणे, हे केवळ वेळेचा अपव्यय नसून एका मोठ्या जनसमूहाचा अपमान आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना, ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मतांची गणिते मांडली जातात, त्याच कार्यकर्त्यांच्या नेत्याला अशी वागणूक देणे म्हणजे 'गरज सरो आणि वैद्य मरो' अशीच ही वृत्ती आहे.
भाजपला आज हा इतिहास आठवतो का? असा काळ होता जेव्हा भाजपसोबत जायला महाराष्ट्रातील कोणताही पुरोगामी विचारांचा पक्ष तयार नव्हता. भाजपवर 'स्पृश्य-अस्पृश्यतेचे' आरोप होत असताना आणि त्यांना राजकीय एकाकीपणात टाकण्याचे प्रयत्न होत असताना, मा. रामदास आठवले यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पुरोगामी विचारांची मशाल हातात घेऊन भाजपशी हातमिळवणी केली.
भाजप-शिवसेना ही केवळ 'युती' होती, पण जेव्हा रिपब्लिकन पक्ष त्यात सामील झाला, तेव्हा तिची 'महायुती' झाली. सामाजिक न्यायाचा आणि 'भीमशक्ती-शिवशक्ती'चा जो प्रयोग आठवलेंनी यशस्वी करून दाखवला, त्याच बळावर आज महायुती सत्तेच्या सोपानावर चढली आहे. मात्र, आज सत्तेची ऊब मिळाल्यावर भाजप आणि इतर मित्रपक्षांना याच रिपब्लिकन शक्तीचा विसर पडला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
महायुती स्थापन झाल्यापासून रिपब्लिकन पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिला. संसदेपासून ते गल्लीपर्यंत आठवलें साहेबांनी महायुतीची बाजू लावून धरली. मात्र, जागावाटपाची वेळ आली की या पक्षाला 'ठेंगा' दाखवला जातो. केवळ प्रचारासाठी निळा झेंडा वापरायचा आणि सत्तेच्या वाटपात त्यांना बाजूला सारायचे, हा प्रकार आता उघड झाला आहे. आठवले साहेबांनी "कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल" असे म्हणून दिलेला इशारा हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर तो एका मोठ्या असंतोषाचा पडसाद आहे.
मुंबई महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाची मते निर्णायक आहेत. जर महायुतीने या 'सन्माना'च्या लढाईला गांभीर्याने घेतले नाही, तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भोगवे लागतील. विश्वासघात हा राजकारणातला सर्वात मोठा गुन्हा मानला जातो आणि आज रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत तोच घडताना दिसत आहे. भाजपने हे विसरू नये की, ज्यांच्यामुळे तुम्ही 'सर्वसमावेशक' ठरलात, त्यांनाच संपवण्याचे प्रयत्न केले तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.
0 टिप्पण्या