Top Post Ad

राजकारणामध्ये ‘कार्यकर्ता’ असणं फार अवघड...

उमेदवारी मिळाली नाही, म्हणून काल जी माणसं धाय मोकलून रडत होती, त्यापैकी बऱ्याच जणांना मी व्यक्तिशः ओळखतो. ही माणसं रडत होती. संतापलेली होती. चक्कर येऊन पडत होती. शिव्या-शाप देत होती. ही सगळी दृश्यं बघणारा सर्वसामान्य माणूस मात्र त्यांची खिल्ली उडवत होता. ते स्वाभाविकही आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांना ट्रोल करत होते. टीव्हीवरचे अँकर विचारसरणीच्या मोठमोठ्या बाता मारत होते. कोणी काही म्हणो, पण मला या कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती वाटते. राजकारणासारख्या असुरक्षित क्षेत्रात प्रवेश करणं सोपं नसतं. काम, धंदा, नोकरी, करिअर सोडून अनेक जण राजकारणामध्ये उतरतात. जीवाचं रान करतात. मतदारांसाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करतात. मागची निवडणूक होऊन आठ-दहा वर्ष झालेली. आताही संधी नाही मिळाली, तर पुढची पाच वर्षे गेली. तोपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. हातातून वय जातं. आरक्षण बदलतं. एकदम होत्याचं नव्हतं होतं. तेव्हा, काय वाटतं त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. 

राजकारणामध्ये ‘कार्यकर्ता’ असणं फार अवघड असतं. आपल्या देशात तर फारच. कालपर्यंत ज्याच्या विरोधात लढलो, तो काल रात्री पक्षात येतो आणि त्याच्या घरातल्या तिघांना उमेदवारी मिळते. हा मात्र असाच राहतो. परवा यांनी प्रभागातल्या मतदारांना घेऊन अष्टविनायक यात्रा केलेली असते. सगळ्या बायकांना सिनेमा दाखवलेला असतो. ते सगळेजण विचारत असतात, तुम्हाला तिकीट नाही मिळालं? करायचं काय?टाईमपास म्हणून, सोशल मीडियावर, या दुःखी कार्यकर्त्यांना, लोक ट्रोल करतात. त्यांना म्हणावं, एखाद्या वर्षी मनासारखं अपरायझल नाही झालं, हवी तशी इन्क्रिमेंट नाही मिळाली, तर कसं वाटतं? आपण काबाडकष्ट करून नोकरी करतो, पण आपल्यापेक्षा जास्त इन्क्रिमेंट झोपा काढणारा मिळवतो, त्याला प्रमोशनही मिळतं, तेव्हा कसं वाटतं?

आणि, यांना विचारसरणी शिकवणार कोण? टीव्हीचे अँकर? त्यांचा आणि विचारांचा संबंध काय? टेलिप्रॉम्प्टरवर दिसतं, ते वाचणाऱ्यांचा भूमिका घेण्याशी कधी संबंध आलाय का? त्यांनी कधी भूमिका घेतल्याची किंमत चुकवली आहे का? या कार्यकर्त्यांनी भूमिका बदलल्या, पण मुळात जेव्हा सगळेच पणाला लावण्याची वेळ येते तेव्हा करणार काय? सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर सगळं करीअर उद्ध्वस्त होण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना कळेल भूमिका घेणे किती कठीण असते! सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते माझे मित्र आहेत. दोन-चार डाकू सोडा, पण या कार्यकर्त्यांविषयी मला भयंकर सहानुभूती आहे. 

सर्वसामान्य माणसाला राजकारणात काम करणं आज एवढं कठीण आहे! बाळासाहेबांचे पक्ष शेवटी मुलाकडे जातात. साहेबांचे पक्ष मुलीकडे आणि पुतण्याकडे जातात. सगळ्या पक्षांमध्ये अशी अवस्था असताना, सामान्य घरातल्या पोरांनी राजकारणाच्या वणव्यात पाऊल ठेवणे एवढं सोपं नाही. ही पोरं भस्मसात होत असताना त्यांना हात द्यायलाही कोणी नाही. या महिला चक्कर येऊन पडल्या, तर तुम्ही त्यांची खिल्ली उडवता. पण, राजकारणात जे चाललंय, त्यावर कोण कधी बोलतं? बर्फाच्छादित भूमीतला तो सोनम वांगचुक पेटून उठतो तरी. आपण काय करतो? सगळे शांत असतात. अवैध पद्धतीने सरकार स्थापन होतं, तरी पाण्यावर तरंग नाही. काल ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणणारे आज तुमचे नायक होतात. लोकांना अडाणी समजणारे तुम्हाला जाणते वाटतात. कालचे गद्दार आपल्या पद्धतीने घड्याळाची वेळ सेट करतात. तरी तुम्ही काही बोलत नाही. जेव्हा ठोकलं पाहिजे, तेव्हा ठोकत नाही. तुम्हाला मिळाले आमचे बिचारे कार्यकर्ते. सगळ्याच बाजूंनी ते मात्र ठोकले जातात. भरडले जातात. चिरडले जातात. इंडिगोच्या मालकांना आणि सरकारला प्रश्न न विचारता, फ्रंट डेस्कवर बसलेल्या बापड्या पोरीला झापत बसणारे आपण! ज्यांच्यामुळे हा राडा झाला, त्यांना कधी सुनावणार आहोत आपण? 

अरे, बोलायचं असेलच तर बोलायला हवं, या एकूण राजकारणाविषयी. राजकारणाच्या प्रारूपाविषयी. ही वेळ का येऊन ठेपली, त्याविषयी. त्यासाठी इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःला विचारलं पाहिजे. ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणून मी काय करतो आहे? माझी भूमिका काय? आपण शांत बसतो म्हणून हा राडा होतो. म्हणून हे आक्रंदन सुरू असते. राजकारणाची आणि लोकशाहीची अंत्ययात्रा आपल्या डोळ्यासमोर निघाली आहे. आणि, आपण मात्र याला टपली मार. त्याला टपली मार… आणि, जेवण करून शांत झोप, एवढेच करण्यात मग्न आहोत! 

  • नव्या वर्षात तरी जागे होऊ! 
  • ज्यांच्यामुळे हा चिखल झाला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवू.  
  • - संजय आवटे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com