Top Post Ad

संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची चर्चा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एक साथ !
६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.या युतीअंतर्गत जागावाटपाचाही प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असून, उर्वरित जागांवर काँग्रेस आणि युतीतील इतर घटक पक्ष निवडणूक लढवतील.काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, मुंबईभर संयुक्त प्रचार दौरे, कोपरा सभा आणि जनसंवाद कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे.पत्रकार परिषदेत बोलताना नेत्यांनी स्पष्ट केले की, मुंबईच्या विकासासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी ही युती करण्यात आली असून, येणाऱ्या निवडणुकीत ही आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

--------------------------------------

नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. एकबाजूला धर्मांध, धनदांडगे आणि दुसऱ्या बाजूला सरंजामी जात दांडगे यांच्या पैशाच्या महापुरात गरीब, शोषित, वंचित निवडणुकीला उभे राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात गोरगरीब, संख्या दुर्बल, मार्जिनल, एससी, एसटी, भटके, ओबीसी जातसमूहातून आलेले उमेदवार मैदानात उतरले होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी या विषम राजकीय लढ्यात वंचिताना राजकीय आत्मभान दिलेले आहे. त्यामुळेच ही वंचितांची फळी निकराने लढली. राजकीय गुलामगिरी झुगारण्यासाठी वंचित जातसमूहांचा राजकीय महाप्रवाह बाळासाहेब आंबेडकर निर्माण करत आहेत. 

त्याबदल्यात वंचितला विद्वान म्हणवणाऱ्या लोकांनी अनेक शिव्या शाप दिलेले आहेत. बी टीम चे आरोप लावलेले आहेत. बदनामीचे कट रचलेले आहेत. पण  आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. पाहुण्यांच्या चपलीने विंचू मारायला निघालेल्यांच्या डोक्यापल्याडचा हा विषय आहे. किंवा ते कळतय पण वळत नाही या मोडवर आहेत. त्यातील बहुतांश मंडळी सरंजामी प्रस्थापितांच्या छावणीत कम्फर्ट शोधत आहेत. अशा प्रागतिक शक्ती लयास गेल्या तर आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात एक नवा पर्याय म्हणून उदयास येऊ लागलेली आहे. बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर हे जनतेत आहेत. लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. जातिव्यवस्थेने विषम केलेला राजकीय संघर्ष झुंजारपणे लढत आहेत. सोबतीने अंजली आंबेडकर जीवाचे रान करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे फायरब्रँड युवा नेता सुजात आंबेडकर हा महाराष्ट्र पिंजून काढत आहे. 

हिंगोलीत वैदू समाजाचा कार्यकर्ता तर जामखेडमध्ये कोल्हाटी समाजाचा कार्यकर्ता आता नगरसेवक म्हणून निवडून आणलेला आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे नगरपरिषदेत सुतार समाजाची महिला नगराध्यक्ष झाली आहे. ही खरोखरच एक महान सुरुवात आहे. “भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची” म्हणत स्वाभिमानी राजकारणाची पायवाट निर्माण करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आता विजय होताना दिसतो आहे. पुढील काळात वंचितचे आमदार आणि खासदार ही मोठ्या संख्येने निवडून येतील अशी आशा निर्माण झाली आहे.

ज्यांच्या डोक्यावर कधी फेटा बांधला गेला नाही त्यांच्या डोक्यावर बाळासाहेब आज फेटा बांधत आहेत. ज्यांच्या अंगावर कधी विजयाचा गुलाल उधळा गेला नाही त्यांच्या अंगावर आज सुजात विजयाचा गुलाल उधळत आहे. ज्यांनी आजवर दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये सतरंज्या उचलल्या त्यांना आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब स्वतःची ओळख आणि ऑफिसेस देत आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना मानाचा शाहिरी मुजरा! सप्रेम जयभीम!!

  • शाहीर सचिन माळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com