हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला खास करून शेतकऱ्यांना, तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं राहील. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बहारीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले
यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा घणाघात या नेत्यांनी केला.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील, तो आमचा निर्णय नाही. अध्यक्ष आणि सभापती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया दिली. नागपूरचे अधिवेशन रात्री उशिरा चालतं, प्रत्येक दिवशी 10 तास कामकाज चालतं. छोटे मोठे 18 विधेयकं आम्ही मांडणार आहोत आणि ती सगळी मंजूर व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या