शिवडी येथील प्रस्तावित सनबर्न फेस्टिवल विषयी गंभीर कायदेशीर आणि सार्वजनिक सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असल्याच्या कारणाने आयोजकांना नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या ॲड. पूनम दिलीप जाधव यांच्या वतीने मुंबई हायकोर्टाचे ॲड. प्रथमेश गायकवाड यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या सौ. पूनम दिलीप जाधव यांनी दिली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ही नोटीस कोणत्याही तर्कावर आधारित नसून, सनबर्नच्या मागील कार्यक्रमांमध्ये घडलेल्या मृत्यू, वैद्यकीय आपत्काल, अंमली पदार्थ-संबंधित घटना, गर्दी व्यवस्थापन अपयश आणि नियामक उल्लंघनांच्या नोंदींवर आधारित आहे. २००९, २०१९ आणि २०२४ मधील मृत्यूच्या घटनांनंतरही आयोजकांनी कोणताही स्वतंत्र चौकशी अहवाल किंवा सुधारात्मक सुरक्षा आराखडा सार्वजनिक केलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
प्रस्तावित कार्यक्रमात १६–१७ वयोगटातील अल्पवयीन मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय हा वैद्यकीयदृष्ट्या धोकादायक असून Juvenile Justice Act व एनडीपीएस कायद्याच्या संरक्षणात्मक तत्त्वांच्या विरोधात आहे. यापूर्वी सनबर्न कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थ जप्ती व अटकेच्या घटना घडल्या असून, एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर याचे दायित्व लागू होते. शिवडी हे क्षेत्र अरुंद रस्ते, मर्यादित प्रवेश-निर्गमन व पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमासाठी अयोग्य आहे. तरीही संरचनात्मक सुरक्षा अहवाल (Structural Safety Audit), गर्दी नियंत्रणाचा आराखडा (Crowd Management Plan) , Medical Preparedness, पर्यावरणावर होणारा परिणाम (Environmental Impact Assessment) व पोलीस परवानगी याबाबत कोणतेही कागदपत्र आयोजकांनी सादर केलेले नाहीत.परवानगी नसतानाही तिकिट विक्री चालू असणे ही जनतेची दिशाभूल आहे. या प्रकरणी आयोजकांनी ७२ तासांच्या आत एनडीपीएस पालन, बालसुरक्षा, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय तयारी, पर्यावरणीय अनुपालन व पोलीस समन्वय दर्शविणारा संपूर्ण कृती आराखडा सार्वजनिक करावा, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात कार्यक्रमावर तात्काळ स्थगितीसह फौजदारी, दिवाणी व नियामक कारवाईसाठी याचिका दाखल करावी लागेल अशी चेतावणी या नोटीस मध्ये देण्यात आली आहे. या नोटिशीची प्रत मुंबई पोलीस आयुक्त, नार्कोटिक्स विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ( BNHS ) यांनाही रवाना करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या