Top Post Ad

मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा ; जनता दलाची मागणी

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या महिलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आसाम सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने ही कर्जे माफ करावीत, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जनविकास समितीने केली असून ही मागणी पूर्ण झाली नाही तर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर कर्जदार महिला बहिष्कार टाकतील असा इशारा दिला आहे.  मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या महिलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी जनता दल आणि कोकण जनविकास समिती यांच्या माध्यमातून गेले वर्षभर मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज राज्य सरकारने माफ करावे, या कंपन्यांच्या कर्जावरील व्याजाचे दर कमी करण्यात यावेत आणि खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशा मागण्या जनता दल व कोकण जनविकास समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. 

  भूछत्राप्रमाणे उगवलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यानी रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात  कर्ज वाटप करून कोणतीही आर्थिक साक्षरता नसलेल्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. एका वेळी पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कंपन्या देत असल्या तरी, पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज देण्याचे प्रकार झाले आहेत. त्याचवेळी एकावेळी एका व्यक्तीला कमाल तीन कंपन्याच कर्ज देऊ शकतील, अशी तरतूद असताना आठ-आठ, दहा-दहा कंपन्यांनी एकेका व्यक्तीला कर्जपुरवठा केला आहे. परिणामी कर्जाची रक्कम दोन-तीन लाखापासून पाच-सहा लाखापर्यंत गेली आहे. मुख्यतः मजुरी व आंबा-काजू बागांचे उत्पन्न या पलीकडे कसलेही नियमित उत्पन्न नसताना दरमहा पंधरा-वीस हजार रुपयांपर्यंतचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न आज या महिलांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मासिक पाच वा दहा टक्के या पठाणी व्याज दराने खासगी सावकारांकडून कर्जे घेऊन काही महिलांनी हप्ते भरले आहेत. परंतु त्यामुळे त्यांची स्थिती अधिकच शोचनीय झाली आहे.    

        दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी या कंपन्यांचे एजंट दांडगाई आणि दादागिरी करीत असतात. हप्त्याच्या प्रत्येक तारखेला एजंट घरात येऊन बसतो. याबाबत आवाज उठवल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रात्री अपरात्री घरी येण्याचे प्रकार बंद झाले असले तरी कर्जदार महिलांना अपशब्द वापरणे, दमबाजी करणे, असे प्रकार अजुनही सुरूच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव संजय परब तसेच कोकण जनविकास समितीचे दिनेश राणे यांनी म्हटले आहे.

   कर्ज मंजूर करताना कंपन्या विविध कारणाखाली दहा ते बारा टक्के रक्कम कापून घेतात. व्याजाचा दरही २४ टक्के सांगण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तो २८ ते ३६ टक्क्यांपर्यंत जात आहे. त्यामुळे हे कर्ज फेडणे महिलांच्या दृष्टीने अशक्य झाले आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जबाजारी महिलांची संख्या अडीच ते तीन हजारांच्या पुणे आहे. हप्ते कसे फेडायचे, या विवंचनेतून अनेक महिलांनी आपले गाव-घर सोडले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यासारख्या घटनाही घडल्या असून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किमान तीन ते चार महिलांनी यात जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने ही कर्ज माफ करावीत, अशी मागणी या सर्वांनी केली आहे. 

      अलीकडेच केंद्रीय वित्त सेवा सचिव नागराजू यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्याजाचे दर जास्त असल्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करून हे दर कमी करण्याचे निर्देश या कंपन्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कंपन्यांचे व्याजाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेकडे आग्रह धरावा, अशी मागणी या तिघांनी केली आहे.       याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यभरातील कर्जदार महिला घेतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com