उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह सहाजणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. यासाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मात्र बारामतीमध्ये लँन्डींग दरम्यान विमानाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्यांचा देखील मृत्यू झाला. 'व्हीएसआर' (VSR) या ऑपरेटरचे 'लिअरजेट ४५' (Learjet 45) श्रेणीतील हे विमान असून, त्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे हा भीषण अपघात झाला.
पुणे पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बारामतीमधील विमान अपघाताची माहिती दिली. तीन मृतदेह घटनास्थळी सापडल्याची माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. अपघात स्थळी तीन मृतदेह सापडले असून तीनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. अद्याप कुणाचीही ओळख पटली नाही असं पोलिसांनी सांगितलं. माननीय अजित दादा पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, हे मान्यवर विमानात प्रवास करत होतेअत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. राजांच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साऱ्या महाराष्ट्राला ओळख होती. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते. राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही. त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे. ज्या विमान अपघातात ६ जणांचा बळी गेला, त्या घटनेची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. ज्या नेत्याची राजकीय कारकीर्द पुढे होती त्यांचे हे अकाली नुकसान आहे. या कठीण काळात शोकाकुल कुटुंबाला सहन करावे लागणारे प्रचंड दुःख शब्दांतून व्यक्त करता येत नाही. मी संपूर्ण पवार कुटुंब, त्यांचे समर्थक आणि हितचिंतक यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. विविध संवैधानिक पदांवर महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणारे श्री. अजित पवार हे एक अनुभवी राजकारणी म्हणून स्मरणात राहतील ज्यांनी आपल्या जनतेप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि चातुर्याने पार पाडल्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो....मल्लिकार्जुन खर्गे

0 टिप्पण्या