महानगरपालिका निवडणूक मतदारांकरिता राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या. जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या उमेदवारालाच पसंती द्या. निवडणुकीचा प्रचार, प्रसार मराठीतून करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या. स्थलांतरितांसाठी महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्या मराठी / अमराठी उमेदवाराला नाकारा. महानगरपालिका प्रशासनाकरिता महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह पालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश, पावत्या मराठी भाषेतच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महानगरपालिका हद्दीतील दुकानांच्या पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांवर कठोर आणि तातडीने दंड वसूल करावा. अंमलबजावणीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मांसाहारावरून घरे नाकारणाऱ्या संस्थेच्या निवासी इमारती अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी, वीज तत्काळ कापून टाकावे तसेच, ओसी आणि अग्निरोध प्रतिबंधक प्रमाणपत्र रद्द करावे.
महानगरपालिका हद्दीतील रस्ते, चौक, बागा, क्रीडांगणे, मैदाने यांना मराठी व्यक्ती, मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावे द्यावीत. महानगरपालिका हद्दीतील मराठी भाषेवरील अन्यायाची तक्रार नोंदविण्यासाठी प्रभागनिहाय 'मराठी दक्षता केंद्र' उपलब्ध करून द्यावी. विधीमंडळ राजभाषा समितीच्या धर्तीवर महानगर पालिकेचे कामकाज मराठीतून होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मनपा राजभाषा समिती स्थापन करावी. मुंबई शहराचे 'मराठीपण' सार्वजनिक ठिकाणी दृश्यमान होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. रस्ते, सार्वजनिक इस्पितळे, वाहतूक व्यवस्था, उद्याने, नाटक व चित्रपटगृहे, सभागृहे इ. ठिकाणी मराठीचा वापर प्राधान्याने व ठळकपणे झाला पाहिजे. अमराठी लोकांना मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रभागनिहाय ऑफलाइन तसेच ऑनलाइन केंद्र सुरु करणे. महानगरपालिकेतील संधी आणि प्राधान्य महापालिकेतील किमान ८० टक्के कंत्राटे मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवीत.महापालिकेच्या नोकरभरतीत ८० टक्के प्राधान्य मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मिळायला हवे. फेरीवाला ओळखपत्र देताना ८० टक्के प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवे. महानगरपालिका हद्दीत व्यवसायासाठी परवाना देताना ८० टक्के प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच द्यावे. परराज्यीय नागरिकांना व्यवसाय परवाना देताना स्थानिक मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांच्या सहभागीदारीची अट घालावी. परराज्यीय नागरिकांना महापालिकेच्या हद्दीत व्यवसाय, धंद्यांसाठी परवाने देताना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करावे. महानगरपालिकेच्या शाळांकरिता मराठी माध्यमाच्या अनुदानित व गुणवत्तापूर्ण शाळा चालवणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता व धोरण असल्याचे कृतीतून सिद्ध करावे. महानगरपालिकेने कोणत्याही परिस्थितीत मराठी वगळता इतर प्रादेशिक भाषांमधील नवीन शाळा काढू नयेत. मराठी शाळांचे शिक्षण मंडळ बदलताना मराठी शाळेचे माध्यम बदलून इंग्रजी माध्यम करू नये. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळांच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्याच काढाव्यात.
मराठी शाळांच्या धोकादायक इमारती पाडल्यास तिथे नवीन मराठी शाळाच पूर्ण क्षमतेने उभारली गेली पाहिजे. मराठी शाळांचे अनुदान वेळेवर मिळाले पाहिजे. महानगरपालिकेचा शालेय शिक्षणावर खर्च होणारा निधी हा प्रामुख्याने मराठी शाळांसाठीच असावा. महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधा परराज्यांतून आलेल्या नागरिकांना त्यांचे सण, उत्सव साजरे करण्यासाठी महानगरपालिकेने मराठी सणउत्सवांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवू नयेत. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांना, कल्याणकारी योजनांना मराठी भाषेचा सन्मान करणारी नावे द्यावीत. उदा. नाना-नानी पार्क ऐवजी आजी-आजोबा उद्यान इत्यादी. हिंदी-इंग्रजीचा वापर टाळावा.
- डॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)
---------------------------------------------------------------
आपल्या 'मराठी अभ्यास केंद्रा'ने, मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी समाजाच्या हितासाठी सातत्याने जो लढा दिला आहे, तो राजकीय दृष्टीकोनातून अधिक तीव्र करणे गरजेचे आहे...त्याकामी, 'धर्मराज्य पक्ष' पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी राहील. धर्मराज्य पक्षाचा जन्मच मुळात मराठी-श्रमिकवर्गाला, भांडवली-व्यवस्थेतील *'कंत्राटी-कामगार पद्धती'च्या* क्रूर, पोलादी टाचेखाली त्याने गमावलेले त्याचे 'माणूसपणाचे न्याय्य-हक्क' मिळवून देण्यासाठी झाला आहे. *महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाच्या मुळावर येऊन, त्याला त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात 'दुय्यम-नागरिकत्वा'चा शाप भोगावा लागतोय...* म्हणून, आम्ही तुमच्यासारखेच रात्रंदिवस तळमळत असतो." *मातृभाषेची आणि ती भाषा बोलणार्या माणसांची, भांडवली-बाजारपेठेतील किंमत घटत गेली की,* ती भांडवली-व्यवस्थेतल्या आधुनिक 'गुलामां'ची म्हणूनच केवळ अस्तित्वात उरलेली भाषा; हळूहळू, पण निश्चितपणे नष्टप्राय व्हायला लागते (त्याची पहिली अवस्था म्हणजे, भाषा वेडीवाकड्या धेडगुजरी स्वरुपात बोलली जायला लागते...जे आपण मराठी-भाषेच्या संदर्भात अलिकडे अनुभवत आहोतच), हा इतिहासाचा धडा आपल्याला विसरुन चालणार नाहीच!
...तेव्हा, *आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपण तयार केलेला 'मराठीनामा' हा केवळ एक निवडणुकीपुरता 'जाहीरनामा' न राहता, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग व्हावा,* असे आमचे ठाम मत आहे. आजच्या काळात *धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणाला छेद देण्यासाठी आपण मांडलेली 'महाराष्ट्र धर्माची' संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे...मानवी-समुहांची परस्परावलंबी, एकजिनसी, साहचर्ययुक्त 'जैविक-बांधणी' करण्यात...'भाषा' हा घटक, 'राष्ट्र' या संकल्पनेपेक्षाही कितीतरी अधिक महत्त्वाचा ठरताना,* इतिहासाच्या पानोपानी आपल्याला दिसतंच. ...थोडं पुढे जात, 'धर्मराज्य पक्षा'च्या स्थापनेपासूनच *"संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, 'स्वायत्त-महाराष्ट्र'...'शिवछत्रपती-राष्ट्र' ('महाराष्ट्रा'चं नाव बदलून 'शिवछत्रपतीराष्ट्र' व्हावं, ही आमची प्रारंभापासूनच आग्रही 'राजकीय-भूमिका'आहे)",* ही आम्ही आजवर मांडलेली संकल्पनाही, आपल्या 'मराठी अभ्यास केंद्रा'ने अंगिकारावी, ही अंतिम मराठी-हितासाठी आपल्याला नम्र विनंती!
*"मराठीत्व, हेच 'राष्ट्रीयत्व",* या भूमिकेतून *"स्वायत्त-महाराष्ट्रा"च्या मागणीला सतत उजाळा मिळत रहावा* व मराठी-जनमानसात त्याची सातत्याने रुजवात व्हावी, म्हणून आपल्यापैकी प्रत्येक मराठी-माणसाने प्रत्येक भाषणाअंति, *"|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||"* असा ('भारतीय-राष्ट्रीयत्वा'च्याही आधी अग्रक्रमाने), 'मराठी-राष्ट्रीयत्वा'चा पुकारा व्हावा, त्याला आपल्याकरवी अधिकचा पुढावा मिळावा...ही देखील, आमची आपल्याला नम्र विनंती व तशी शिवछत्रपतीचरणी प्रार्थना! भाषावार प्रांतरचनेत भाषेला आणि प्रादेशिक संस्कृतिला प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणून...संपूर्ण महाराष्ट्रावरील, विशेषतः मुंबई-ठाण्यासारख्या शहरांवरील (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर...ज्याला, आम्ही *"मुं.ठा.पु.रा.ना."* असं संबोधतो) परप्रांतीय-आक्रमण रोखणं, हे केवळ आपल्या सर्वांसाठी क्रमप्राप्तच आहे, असं नव्हे; तर, ते आपलं सर्वांचंच आद्यकर्तव्य (आमच्यादृष्टीने 'धर्मकर्तव्य') आहे. 'मुंठापुराना' शहरं व त्यांच्या उपनगरांतील *'मराठी-टक्का' आणि 'मराठी-मत्ता' झपाट्याने कमी होत चालली आहे.* महत्त्वाची शहरे जैन, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी आणि आता हिंदी-भाषिक गिळंकृत करत चालले आहेत...चारही बाजूंनी मराठी माणसाची 'कोंडी' केली जात आहे. *"कालपरवापर्यंत महाराष्ट्राची 'महालक्ष्मी' आणि आता तर, अवसानघातकी व दळभद्री मराठी-राजकारण्यांमुळे व नादान मराठी-मतदारांमुळे महाराष्ट्राची 'राजलक्ष्मी'ही...'गुज्जू-भाषिकां'च्या ताब्यात जात चालली असताना;* आपण स्वस्थ बसूच शकत नाही!
अशा अवघड स्थितीत, समस्त मराठी जनांना एकत्र करुन सर्वच पातळींवर एकाच वेळेस निर्धाराने व चिकाटीने सनदशीर लढा उभारल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण 'मराठी अभ्यास केंद्रा'तर्फे निरलसपणे व निर्धाराने अत्यंत कष्टपूर्वक ते काम निरंतर करत आहात...याचं आम्हाला खूपच अप्रूप आहे! म्हणूनच, २ जानेवारी-२०२६ रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघा'त होणाऱ्या पत्रकार-परिषदेत मांडलेल्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. हा विचार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा आणि मराठी भाषा आणि मराठी माणसाचे हित कसोशीने त्याद्वारे जपले जावे, यासाठी 'धर्मराज्य पक्ष' आपल्यासोबत आहेच. आपल्या या लढ्याला आणि पुढील वाटचालीस आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा...धन्यवाद!
- राजन राजे ...अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

0 टिप्पण्या