Top Post Ad

अंधेरा कायम रहे...!

 नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर 'शक्तीमान' नामक एक मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत तमराज किल्विश नामक खलनायकाचं पात्र होतं. तम म्हणजे अंधकार. तमराज म्हणजे अंधकाराच्या साम्राज्याचा सम्राट. अंधकारावरच तमराज किल्विशचं अस्तित्व अवलंबून असल्यामुळे, तो सारखा 'अंधेरा कायम रहे!' चा उद्घोष करीत असे. त्यामुळे त्याकाळी त्याचा हा डायलॉग खुप प्रसिद्ध झाला होता. भारतीय मनुवाद्यांचेही प्राचीन काळापासून 'अंधेरा कायम रहे!' हेच ब्रीदवाक्य आहे.             अंधकार हे अराजकता, अंदाधुंदी, अव्यवस्था यांचे प्रतीक आहे. अनुत्पादक मनुवाद्यांना जसे कोणतेही उत्पादन करता येत नाही तसेच राज्यही करता येत नाही. या उलट बहुजन समाज हा उत्पादक समाज आहे. ते राज्यही चांगले करु शकतात. स्वतःच्या मालकीची उत्पादन साधने आणि बहुसंख्यांक असल्यामुळे राज्यव्यवस्थेवरही त्यांचीच पकड असते. याचा मनुवाद्यांना जसा हेवा वाटतो. तसेच मनुस्मृतीने आपल्याला प्रदान केलेले विशेषाधिकार बहुजन हिरावून तर घेणार नाहीत, अशी त्यांना सतत भीतीही वाटत असते. परिणामी बहुजन समाजाने आपल्यावर कुरघोडी करु नये म्हणून ते अराजक, अव्यवस्थेला खतपाणी घालून बहुजनांच्या चालत्या गाडीला खीळ घालण्याचे कुटील कारस्थान करीत आलेत, करीत आहेत. 

अराजक : अमृतकाल :             अराजकाची स्थिती त्यांच्यासाठी हितकारक असते. मनमानी करण्यासाठी ती जशी उपयुक्त असते. तसेच अराजकाच्या परिस्थितीत त्यांच्या कुटील, विघातक कारवाया जनतेच्या ल‌क्षात येत नाहीत. त्यामुळे करुन सवरुन त्यांना नामानिराळे राहता येते. अराजक हा त्यांच्यासाठी 'अमृतकाल' असतो. अराजक निर्मितीसाठी ते, ज्या व्यवस्थेमुळे राज्याचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे ती व्यवस्था, ती सिस्टीम करप्ट करतात.‌ त्यासाठी ते- व्यवस्थेतील योग्य, प्रामाणिक, निस्पृह, शिस्तप्रिय माणसांचे खच्चीकरण करुन तिथे करप्टेड, अयोग्य, बेईमान, लाचार, स्वार्थी माणसे नेमतात. हरिशंकर परसाईनी म्हटले आहे- *"जिसे जहाँ नहीं होना चाहिये, वह ठीक वहीं है।" ज्ञानी, चारित्र्यवान लोकांना बेदखल करुन  मानसन्मानाच्या पदांवर जाणीवपूर्वक खुजी व अयोग्य माणसं नेमून त्या पदांची शान धुळीस मिळवितात. सत्वहीन समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रपुरुष, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय स्मारकं, संविधान इत्यादी मानदंडांची अवहेलना करतात.

आदर्शांवर चिखलफेक :             आजवर शेतकरी आणि सैनिकांविषयी जनतेच्या मनात कमालीचा आदर होता. 'जय जवान, जय किसान' या घोषणेने त्यांच्या मनात देशभक्तीची लाट उसळत असे. त्यांच्या चारित्र्यावरही ते चिखलफेक करतात. त्यासाठी - ● प्रेमप्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात.   ● सैनिक सरहद्दीवर असताना त्यांच्या बायकांना मुलं कशी होतात? असा घृणास्पद प्रचार ते करतात.    ● व्यापाऱ्यांचे योगदान हे सैनिकांपेक्षा मोठे असते, असे व्यापाऱ्यांचे उदात्तीकरण करण्यात येते.   ● संप करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, आदिवासींना नक्षली तर डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांना अर्बन नक्षली आणि मुसलमानांना देशद्रोही ठरवून नामोहरम केले जाते.   ● लोकशाही, समता, सामाजिक न्याय, कायदा सुव्यवस्था, सर्वधर्मसमभाव, महिलांचा सन्मान इत्यादी राष्ट्रीय मूल्यांची पदोपदी पायमल्ली केली जाते,   ● कर, कर्ज बुडव्यांचे कर्ज माफ करणे. गुन्हेगारांचे गुन्हे माफ करणे, त्यांच्या राजकीय अधिकार पदांवर नेमणूका करणे. लाचखोर अधिकाऱ्यांची पदोन्नती करणे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मुदतवाढ देणे या गोष्टीही सर्रासपणे केल्या जातात.

   ● सत्याला असत्य आणि असत्याला सत्य, तर भ्रमाला वास्तव आणि वास्तवाला भ्रम ठरविले जाते.   ● खलनायकांना नायक आणि नायकांना खलनायक ठरविले जाते.   ● महामानवांची सतत बदनामी केली जाते. खुज्या व्यक्तींचे राष्ट्रपुरुष, महामानव म्हणून महिमामंडन केले जाते. त्यासाठी खऱ्या इतिहासावर माती टाकून खोटा इतिहास सांगितला जातो.   ● अभिरुचीहीन समाज निर्माण करण्यासाठी  प्रसार माध्यमांमार्फत हीन, निसत्व, सवंग कार्यक्रम सादर केले जातात. मुख्य प्रश्नांवरचे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आलतूफालतू गोष्टींवर चर्चेची गुऱ्हाळं चालविली जातात. सत्याकडे कानाडोळा केला जातो.■ काही सार्वत्रिक समजही जाणीवपूर्वक  निर्माण केले जातात. उदाहरणार्थ -   • सत्याला कोणी वाली नसतो.   • खऱ्याची दुनिया नाही.   • कसायाला गाय धार्जिणी असते.   • आपल्याच भल्याचा विचार करणे.   • तळे राखील तो चव चाखील.■ *अराजकवाद हा मनुवाद्यांच्या रक्तातच भिनला आहे. :*  ◆ आपल्याला राज्य करता येत नाही तर दुसऱ्यालाही करु द्यायचे नाही.   ◆ आपलं भागतंय तोवर दुसऱ्याला सहकार्य नाहीतर त्याचं पुरतं वाटोळं करायचं.  मग वाटोळं उद्या होणार असेल तर आज का होईना ही मनोवृत्ती.   ◆ आमचं नीट चालत नसेल तर आम्ही लोकांचंही नीट चालू देणार नाहीत. त्यासाठी भरल्या डेगीत ते मूतायलाही कमी करीत नाहीत.

■ *'रिकामं मन हे सैतानाचं घर' :*             'रिकामं मन हे सैतानाचं घर असतं' या म्हणीप्रमाणे रिकामटेकडे मनुवादी सतत प्रतिक्रांतीसाठी दबा धरून बसलेले असतात.आपलं ठेवायचं झाकून, लोकाचं बघायचं वाकून व बघता बघता फट दिसली की तिची दरी कशी होईल, बीळ असेल तर भगदाड कसे पडेल याच गणगणीत ते सतत असतात. त्यांना स्वराज्य (त्यांचे राज्य) हवे असते. सर्वांचे कल्याण करणारे सुराज्य नको असते. परिणामी स्वराज्याचा उद्घोष करणारे मनुवादी त्यांना आदर्श वाटतात. तर सुराज्य निर्माते सम्राट अशोक, सम्राट अकबर, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरु आदी थोर महापुरुष शत्रू वाटतात. शत्रुचा ते कोणत्याही थराला जाऊन सूड घ्यायला कचरत नसतात. 

■ *दिवाभितांचे वंशज :*             घुबडांना दिवाभीत म्हणतात. त्यांना प्रकाश सहन होत नाही, म्हणून दिवसा ते अंधाऱ्या जागेचा आश्रय घेतात आणि रात्री संचार करतात. मनुवादी याच प्रवृत्तीचे आहेत. उजेडात त्यांचा विद्रुप चेहरा आणि कपटकारस्थाने उघडी पडतात, म्हणून त्यांना अंधकार म्हणजे अराजक प्रिय असते. म्हणूनच "अंधेरा कायम रहे!" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

  • सुभाषचंद्र सोनार,
  •  राजगुरुनगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com