Top Post Ad

दादा…. तुमचं जाण कुणाचं तरी राजकीय संकट टाळून गेल हे मात्र नक्की....

 अजित पवार हे जेंव्हा राष्ट्रवादी फोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले तेंव्हा सर्वांना असे वाटले की अजित पवार सत्ताकांक्षी असल्याने त्यांनीच हे केलं. काहींनी याचे खापर भाजप वर व विशेषत: फडणवीस यांच्यावर देखील फोडलं. पण फडणवीस यांच्या समर्थकांना मात्र हे मान्य नव्हतं, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे फडणवीस सरकार बहुमतात असतांना व अजिबात अजित दादांची किंवा इतर कुणाचीही अजिबात गरज फडणवीस हे का करतील. याउलट दोघांच्या सत्तावाटपात अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीस हे स्वतःच्या सत्तेत आणखी वाटे का करतील असा युक्तिवाद त्यांचा असायचा. हा युक्तिवाद त्यावेळी अनेकांना पटला देखील, आणि त्यामुळेच अनेकांनी अजित पवार यांनाच राष्ट्रवादी पक्षफोडीचे व्हिलन ठरविले.

थोड्या वेळासाठी आपण अस गृहीत धरुया की शिंदे फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारला कुठलाही धोका नव्हता व अजित पवारांची त्यांना गरज नव्हती. पण आपण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. एक बाजूला आपल्या सर्वांनाच दरवर्षी वर्तमानात जगायची सवय लावलेली असताना भाजपसारखा पक्ष मात्र नेहमीच इतिहास आणि भविष्यकाळ यात रमलेला दिसतो. तो तसा उगाचच नाहीये. गृहीत धरुया की त्यावेळी ती गरज नव्हती, पण याचा अर्थ फडणवीस यांना भविष्यातही ती गरज लागणारच नव्हती असे नाही. भाजप किंवा फडणवीस यांचं स्वप्न नेहमीच स्वबळावर सत्ता हेच राहिलेलं आहे आणि ते स्वाभाविक देखील आहे. अजित पवारांवर थेट देशाच्या पंतप्रधानांनीच सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणं आणि नंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी गरज नसतांनाही तत्कालीन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणं यात भाजपच्या स्वबळावर सत्तेत येण्याच्या भविष्यकालिन महत्वाकांक्षेची बीजे रोवलेली होती हे मात्र अनेकांना समजलंच नाही.
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करायची असेल तर इतर अनेक गोष्टीपैकी महत्त्वाची असलेली गोष्ट होती मुंबई महानगरपालिका व तिची सत्ता. उद्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि शिंदे महापौर पदासाठी अडून बसले (जे आज दिसतय) तर काय करायचं या प्रश्नाच उत्तर म्हणजे अजित पवारांची शिंदे फडणवीस सत्तेतील एंट्री होती. शिंदेंसोबत आज अनेक खासदार आमदार असताना त्यांना महानगरपालिकेत अपेक्षित यश का नसेल मिळाल, या प्रश्नाच उत्तर देखील त्यात आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची असेल तर शिंदेंना कट्टू साईज ठेवणं हे प्रथम आवश्यक होत आणि ते करूनही शिंदे अडून बसलेच तर अजित पवार हा हुकमी एक्का सोबत ठेवावा लागणार होता. का तर शिंदे महानगरपालिकेसाठी, सरकारमधून बाहेर पडेपर्यंत टोकाला गेले आणि तसे बाहेर पडलेच तर राज्यातील सत्तेला अजित पवार तारणहार म्हणून राहतील अशी ती व्यूहरचना होती. अजित पवार आजपर्यंत सत्तेत होते त्यामुळेच शिंदेची भाजपसोबत बार्गेनिंग करण्याची पॉवर फार काही करु शकली नाही. अजित पवार सत्तेत नसते तर शिंदेंनी थेट “महापौर पद आम्हाला द्या नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडतो” असा पवित्रा घेतला असता. त्यामुळे अजित पवारांची सत्तेतील एंट्री भाजपच्या भविष्यातील राजकारणाची तरतूद होती, आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या सत्तेतील काही वाटा भविष्यातील तरतूद म्हणून अजित पवारांना देऊ केला होता.
मग आता नक्की बिघडल कुठे? एका बाजूला शिंदे अडून बसलेले असतांना दुसऱ्या बाजूला मात्र राष्ट्रवादीचे वारे पूर्वपदावर वाहण्यास सुरुवात झाली होती. अजित पवार स्वगृही परतण्याची तयारी करीत होते. आणि हे आत्ताच झाल असत तर… अर्र!!..... अजित पवार शरद पवार एक झाल्याने शिंदे फडणवीस सरकार मधून अजित पवार बाहेर पडू शकतील ही शक्यता निर्माण झाली असती आणि खरंच अजित पवार याच वेळी (शिंदे महापौर पदासाठी अडून बसलेले असताना) बाहेर पडले असते तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर महापौरपद खेचून आणण्याईतपत नक्कीच वाढली असती. (महापौर पद द्या नाहीतर सरकार मधून बाहेर पडतो) अजित पवारांचं राष्ट्रवादीत परत जाण, सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणाऱ्या भाजपसारख्या पक्षासाठी व विशेषत फडणवीस यांच्या प्रतिमेसाठी महाभयंकर संकट होत. अजित पवारांच्या अशा अपघाती निधनाने फडणवीसांवरच हे संकट तूर्तास तरी टळल असंच म्हणावं लागेल. दादा, तुमच्या अशा जाण्याने तुमच्याशी मतभेद असणाऱ्यांसह अवघा महाराष्ट्र हळहळला. तुमच्या जाण्याच राजकारण करायचं नाही, पण तरीही तुमचं जाण कुणाचंतरी राजकीय संकट टाळून गेल हे मात्र नक्की.
दादा…. भावपूर्ण श्रद्धांजली…

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com