आदिवासी संस्कृतीची ओळख असलेले तारपा हे पारंपरिक वाद्य आणि त्यावर आधारित नृत्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोठे काम पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वसलेल्या वाळवंडा या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांनी केले. अवघ्या 12 व्या वर्षापासून ही कला जोपसत आज ९२ व्या वर्षी देखील ते या संस्कृतीलाच आपले दैवत मानत आहेत. त्यांच्या या कार्याचा देशाने गौरव केला, त्यांना आज पद्म पुरस्कार जाहीर झाला.
कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही आपल्या कलेच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. आता त्यांच्या या प्रदीर्घ आणि निष्ठावान कलासाधनेची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या या सन्मानामुळे केवळ त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांनी तारपा नृत्य सादर करून आदिवासी कलेचा ठसा उमटवला. मोठ्या शहरांपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचताना त्यांनी कधीही आपल्या मूळ परंपरेशी तडजोड केली नाही. याकरिता त्यांना शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. मात्र हा राष्ट्रीय सन्मान मिळाल्याने भिकल्या धिंडा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कलेलाच नव्हे तर आदीवासी संस्कृतीला नवी ओळख मिळाली असून, वाळवंडासारख्या दुर्गम भागातील कलाकारही देशपातळीवर पोहोचू शकतात, हा विश्वास बळकट झाला असल्याचे दिसून येते.भिकल्या धिंडा यांचा जीवनप्रवास संघर्ष, मेहनत आणि परंपरेशी असलेल्या नात्याची प्रेरणादायी कथा सांगतो. लहानशा गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज राष्ट्रीय सन्मानापर्यंत पोहोचला आहे. वयाच्या 92 व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यांत आणि हातांत तारपावरील प्रेम तितकेच जिवंत आहे. भिकल्या धिंडा यांना अवघ्या 12 व्या वर्षी तारपा वाद्याची ओढ लागली. जंगल, डोंगर आणि गावकुसाबाहेरील मोकळ्या जागेत त्यांनी ही कला आत्मसात केली. गेल्या 80 हून अधिक वर्षांपासून ते सातत्याने तारपा वाजवत असून, अनेक ठिकाणी आदिवासी नृत्य आणि संगीत सादर करत आहेत. त्यांच्या कलेतून केवळ मनोरंजन नाही, तर आदिवासी जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक ओळख दिसून येते. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या प्रसंगी भिकल्या धिंडा यांनी तारपा हेच आपले दैवत असल्याची भावना व्यक्त केली. येणाऱ्या पिढ्यांनीही ही परंपरा जपावी, शिकावी आणि पुढे न्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या शब्दांमधून केवळ अनुभव नाही, तर संस्कृती टिकवण्याची जबाबदारीही दिसून येते. भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री सन्मान हा आदिवासी कलेच्या गौरवाचा क्षण ठरत आहे.

0 टिप्पण्या