आज संयुक्त महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद घेणे योग्य ठरेल. आज बहुसंख्य माध्यमे मोठ्या प्रमाणात महाशक्तीपुढे आणि महाराष्ट्रात देवाभाऊपुढे नतमस्तक झाली असताना, हे सांगणे जरूरीचे आहे. त्या काळात जी भांडवली वृत्तपत्रे होती, ती संयुक्त महाराष्ट्रासाठी चाललेल्या आंदोलनाची बदनामी करत होती. खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ आणि वा. रा. कोठारी यांचा ‘प्रभात’ ही नावे याला अपवाद होती. ‘नवयुग’मधून अत्रेदेखील महाराष्ट्रविरोधकांवर तोफ डागत होते. परंतु साप्ताहिकाच्या मर्यादा होत्या. ऑक्टोबर १९५६ मध्ये यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा पुढच्याच महिन्यात, म्हणजे १५ नोव्हेंबर १९५६ रोजी आचार्य अत्रेंनी दैनिक ‘मराठा’ सुरू केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, त्या हुतात्म्यांना वंदन करून आणि तीन कोटी मराठी जनतेच्या चरणांवर आदराने मस्तक ठेवून, हे दैनिक सुरू करत असल्याचे अत्र्यांनी अग्रलेखातच म्हटले होते. त्यावेळी अत्र्यांची आर्थिक परिस्थिती काही फार मजबूत नव्हती. परंतु त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन करताच, लोकांनी चार आण्यांपासून ते हजार-दोन हजार रुपयांपर्यंत मदत करण्यास आरंभ केला. कॉ. डांगे यांनी तर तीन हजार रुपये अत्र्यांना दिले. पाहता पाहता ‘मराठा’चा खप ४० हजारांपर्यंत जाऊन पोहोचला. त्याकाळी हा आकडा मोठा होता.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ‘मराठा’ने अभूतपूर्व कामगिरी बजावल्याची नोंद एसेम जोशी यांनी ‘मी एसेम’ या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते अभेद्य असून, ते कोणालाही तोडता येणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणत असत. १४ ऑक्टोबर १९४८ रोजी दार कमिशनला सादर केलेल्या निवेदनात भाषिक राज्ये निर्माण करण्यात काही धोका नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. मुंबई ही सर्व भारताची मोठी पेठ आहे, म्हणून तिच्यावरील महाराष्ट्रचा हक्क नाकारू नये. कलकत्त्यात बंगली लोक अल्पसंख्य आहेत व तेथील उद्योगधंदे हे बिगरबंगाली लोकांच्या ताब्यात आहेत, म्हणून कलकत्ता बंगालपासून तोडता येईल का? बिहारमधील कोळशाच्या खाणी बिहारच्या आहेत की त्या खाणींचे मालक गुजराती, काठेवाडी व युरोपियन्स यांच्या आहेत? युरोपियन लोकांनी मुंबईतील उद्योगधंदे महाराष्ट्रातील कामगारांच्या श्रमाच्या जिवावर सुरू केले आहेत. इतरांप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा सोस नसून, हा त्यांचा मोठा सद्गुण आहे. धन हे महाराष्ट्रीय लोकांचे कधीही दैवत नव्हते. तो त्यांच्या संस्कृतीचाही गुणधर्म नाही. अन्यथा त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या इतर समाजांना उद्योगधंद्यांवर वर्चस्व निर्माण करू दिले नसते, असे अत्यंत प्रभावी प्रतिपादन डॉ. बाबासाहेब यांनी दार कमिशनपुढे केले होते. दुर्दैवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी त्चांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राप्रमाणेच आचार्य अत्र्यांमागीलही एक नैतिक आधार नाहीसा झाला...
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने १९५७ सालच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः आचार्य अत्रे गिरगाव मतदारसंघातून उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वाट्टेल तो त्याग करण्याची माझी तयारी आहे. टाटा-बिर्लांकडून येणारे फंड माझ्याकडे नाहीत. पण आमचा निश्चय, आमचा स्वाभिमान, आमचा इतिहास व आमची पंरपरा हेच आमचे भांडवल आहे, असे उद्गार आचार्य अत्रे गिरगाव, गिरणगाव, लालबाग, दादर, वसई त्याचप्रमाणे नाशिक, निफाड, सावंतवाडी अशा विविध ठिकाणच्या सभांमधून काढू लागले. ११ मार्च १९५७ रोजी ‘महाराष्ट्राच्या शिवशक्तीला तुमच्या मतांचे बिल्वपत्र वाहा’, असे कळकळीचे आवाहन सेनापती बापट यांनी केले. त्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले.
डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांचा संयुक्त महाराष्ट्र समितीस पाठिंबा होता. वरळीच्या सर्वसाधारण मतदारसंघातून ॲड. भंडारे हे दलित उमेदवार निवडून आले. तर नगरमध्ये भाऊसाहेब गायकवाड व बी. सी. कांबळे या उमेदवारांनी सर्वसाधारण मतदारसंघातून विजय मिळवला. मुंबईच्या विधानसभेतील २४ पैकी ११ जागा संयुक्त महाराष्ट्र समितीने जिंकल्या. काँग्रेसला त्यावेळी १३ जागा मिळाल्या असल्या, तरी काँग्रेसला ५ लाख ४९ हजर मते, तर समितीला ६ लाख १२ हजार मते मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसपेक्षा समिती अधिक लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले होते.आज महाराष्ट्रात व मुंबईत भाजप हा एक नंबरचा पक्ष असला, तरीदेखील संयुक्त महाराष्ट्र समितीप्रमाणेच उद्धव व राज ठाकरे यांचे पक्ष एक नंबरचे स्थान मिळवतील, असा आशावाद जागवला जात आहे. तेव्हा समितीची लढाई काँग्रेसशी होती, तर आता ठाकरे बंधूंची लढाई भाजपशी आहे. १९५७च्या विधानसभा निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांतदेखील १३१ पैकी ७१ जागा मिळवून संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई महापालिकेवर आपला ध्वज फडकावला होता. त्यावेळी काँग्रेसला ५७ जागा मिळाल्या होत्या. त्यापूर्वी स. का. पाटील यांच्याकडे मुंबई महापालिकेचा ताबा होता, तो समितीने स्वतःकडे हिसकावून घेतला. समितीचे मुंबईचे पहिले महापौर म्हणून प्रिं. मो. वि. दोंदे यांची निवड करण्यात आले. दोंदे यांची विजयी मिरवणूक निघाली, तेव्हा आभाळातल्या देवांनी पाहावे असे ते दृश्य होते, असे कौतुक आचार्य अत्रे यांनी केले होते.
महापालिकेपासून मिरवणूक निघाली, ती सर्वप्रथम हुतात्मा चौकात आली. तेथेच मोरारजींनी मराठी भूमिपुत्रांचे हत्याकांड घडवून आणले होते. त्या पवित्र भूमीवर भिजल्या डोळ्यांनी दोंदे यांनी पुष्पांजली वाहिली, तेव्हा असंख्यजणांचे कंठ दाटून आले होते. यावेळच्या, म्हणजेच २०२६च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाशक्तीच्या बेमुर्वतखोरीचे व दादागिरीचे सर्वत्र दर्शन होत आहे. त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सामान्य मराठी माणूस आणि विरोधकांप्रमाणेच पत्रकारांनाही सामर्थ्य लाभो, ही प्रार्थना. मुंबईचे ‘अदानीस्तान’ होऊ नये, म्हणून लेखक व पत्रकारांनी आपल्या लेखण्या परजवाव्यात. आजच्या काळात त्यासाठी कम्प्युटरवर बसून सत्ताधाऱ्यांना न घाबरता, आक्रमक शैलीत लिहावे, बोलावे आणि वस्तुनिष्ठ वार्तांकन करावे, एवढीच अपेक्षा.
हेमंत. देसाई


0 टिप्पण्या