Top Post Ad

तिरंगा की अशोक चक्रांकीत राष्ट्रध्वज ?....संवैधानिक प्रजासत्ताक की तीन रंगाचा उत्सव ?

आपण भारतीय 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा ‘स्वातंत्र्य दिन’ आणि 26 जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो. त्यादिवशी देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्ती मिळाली, पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्य झालो म्हणून आपण त्यादिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने अविरतपणे आपल्या तब्येतीची पर्वा न करता,  जगातील सर्व घटनांचा अभ्यास करुन भारतीय परिप्रेक्ष्यात बुध्दाच्या काळातील लोकशाही गणराज्याला आधुनिक कायद्यात रुपांतरीत करुन समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या चतु:सूत्रीवर आधारित भारतीय संविधान लिहिले. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगिकारुन स्वत:प्रत अर्पण केले. भारतीय संविधानाची अंमलबजावणी  26 जानेवारी 1950 पासून सुरु झाली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 

भारताने स्वत:ला धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले. संसदीय लोकशाही स्वीकारली.  एक व्यक्ति, एक मूल्य हे तत्व म्हणून देशातील प्रत्येक नागरिकास सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय देण्याची हमी दिली. प्रत्येकाला आचार विचार व धार्मिक स्वातंत्र्य दिले. त्यामुळे भारतीय कायदे मनुच्या कायद्यानुसार नाही,  तर संविधानाच्या तरतुदीनुसार चालतील याची सुरुवात झाली. भारताने आपली प्रतीके म्हणून ‘जण गण मन’ हे राष्ट्रगीत तर केशरी, सफेद आणि हिरवा या तीन रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.  भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचे, महापुरुषांचे स्मरण करतो. त्यात महात्मा गांधी, पंडित नेहरु, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु इत्यादींचे आपण स्मरण करतो. प्रजासत्ताक दिनीही आपण त्यांचे स्मरण करतो. भारतीय संविधानाची ज्या दिवसापासून आपण अंमलबजावणी केली,  त्यादिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करायला लागलो, ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहीले म्हणून त्याच्या अंमलबजावणीचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायला लागलो, पण ज्यांच्यामुळे हे शक्य झाले, त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख मात्र आता पर्यंत आपले राज्यकर्ते टाळत आले आहेत.

दिर्घकाल देशात काँग्रेसची राजवट  होती,  त्यातही असेच होत होते आणि त्याच मळलेल्या वाटेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील संघ- भाजपची वाटचाल सुरु आहे. किंबहुना ती अधिक वेगाने डॉ. आंबेडकरांनी संविधानाने दिलेली संसदीय लोकशाही, न्यायपालिका, प्रशासन यांना मोडीत काढून पुन्हा समाजामध्ये मनुवाद रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. संघ परिवार आणि भाजपची मंडळी उघड - उघड संविधान बदलण्याची भाषा करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या भाजप संघपरिवाराच्या मुशीत वाढले, त्याच परिवारातील त्यांचे पूर्वसूरी दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींच्या राजवटीत घटना पुनरावलोकन समिती बनविली गेली होती,  हे कसे विसरता येईल ? त्यावेळी संख्याबळामुळे जे शक्य झालं नाही. तोच कार्यक्रम पुढे रेटण्याचे काम वेगळ्या पद्धतीने पाशवी बहुमताच्या बळावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी आता करीत आहे. त्यांनी नवीन संसद इमारत बनविली, त्याच्या उदघाटन  समारोहाला संसदीय प्रथा –परंपरा यांना हरताळ फासत राष्ट्रपतींना आमंत्रित केले नाही.  तो समारोह एखाद्या राजाने राज्यभिषेक करावा तसा साजरा केला. याच संसदेत राजदंडा ऐवजी सेंगोल आणलं, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध योजनांची, स्थळांची विविध ऐतिहासिक वास्तूंच्या महापुरुषांची नावे बदलण्याचा कार्यक्रम झपाट्याने सुरु केला आहे.  सामाजिक आरक्षणाला बगल देण्यासाठी थेट नोकरभरती सुरू केली आहे. नोटबंदी, जी. एस. टी. यासारख्या निर्णयामुळे  छोटे व्यापारी, दुकानदार डबघाईला आले तसेच राज्यांची स्वायतता धोक्यात आली.   

तर दुसरीकडे भाजपला देणगी देणाऱ्या भांडवलशहांना मोकळे रान सोडले आहे, त्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली आहेत.  गौतम अडाणी सारख्या उद्योगपतीच्या घशात देशातील साधनसंपत्ती, जल- जंगल-जमिनी घालण्याचा कार्यक्रम वेगाने सुरु आहे. या सर्व गोष्टींना विरोध करणाऱ्या व्यक्तीला संघटनेला देशद्रोही ठरविले जात आहे. ‌ देशातील विविधता, लोकशाही परंपरा, तिची प्रतिके नष्ट करुन पुन्हा नव्याने मनुवादी प्रथा – परंपरा,  प्रतिके माथी मारण्याचा एककल्ली कार्यक्रम सुरु आहे. त्याला मिडीयामध्ये बसलेली ब्राम्हण्यवादी मंडळी भांडवलशाहीच्या मदतीने खतपाणी घालत आहेत. स्वातंत्र्य काळापासून संघ परिवारातील संस्था संघटना यांच्या लोकशाही विरोधी व संविधान विरोधी कृत्यांवर सत्तेत असताना आणि आताही काँग्रेस पक्ष मूकपणे बघत आला आहे. त्यात भर पडत गेली मिडीया, बॉलीवूडचे सिनेमे, गाणी यामुळे जनमानसाच्या मनावर परिणाम करणाऱ्या या माध्यमातील गीतकार, कथाकार, संगीतकार अभिनेते यात संघ भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणाला कळत-नकळतपणे पाठिंबा देताना दिसतात. केशरी, सफेद आणि हिरवा या तीन रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून आपण स्वीकारलेला असताना फक्त तिरंगा म्हणून त्याचा उल्लेख करणे असो अथवा देशाच्या नावाचा उल्लेख करताना भारत न म्हणता हिंदुस्थान असा उल्लेख करणे असो.  त्यामुळे आपसूक निळा रंग, अशोक चक्र, भारत यांचा उल्लेख त्यातून टाळला जातो. आणि देशाची एका धर्माची प्रतिके लोकांच्या मनावर बिंबवली जातात. 

काल प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागरुक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना थेट प्रश्न विचारले.  नाशिक जिल्हयात वन खात्याच्या पोलिस अधिकारी माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी संघ परिवाराच्या मुशीत वाढलेले नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही ना त्यांचे स्मरण केले, याबाबत आक्षेप नोंदवून निषेध व्यक्त करून प्रश्न विचारले.  काल वसई विरार महानगरपालिकेने पालिकेच्या नवीन इमारतीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोड्या थोड्या अंतरावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त केशरी, सफेद आणि हिरवा या तीन रंगाचे विविध आकारात सेल्फी पॉइंट बनविले होते. पण त्यात कुठेही प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? तो कशासाठी साजरा करतात. त्यात ना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख, ना फोटो, ना संविधानाचा उल्लेख, ना सरनाम्याचा कुठेही उल्लेख ना त्यातील महत्वाची माहिती, इतकेच काय त्या एकाही ठिकाणी मध्यभागी ना निळा रंग ना अशोक चक्र होते.

संघ भाजपच्या कच्छपी लागलेल्या प्रशासकीय व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताकाच्या नावाने उत्सव साजरे करायचे आहेत, सुट्टी साजरी करायची आहे. मंत्र्यांना सलामी हवी आहे, त्या सोहळ्यात भाषणे ठोकायची आहेत. लोकांना देशभक्तीत गुंगवून ठेवण्यासाठी सेल्फी पॉइंट वर जाऊन सेल्फी काढायला लावायचे आहेत. पण हे ज्यांच्यामुळे शक्य झाले आहे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नकोत, त्यांनी दिलेले संविधान नको, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे प्रतीक असलेले तीन रंगाच्या मध्यभागी असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र असलेला राष्ट्रध्वज देखील नको. ही मानसिकता काय दर्शवते ? याला जातीयवाद म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार ? 1950 पासून प्रजासत्ताक दिन भारतीय संविधान, निळ्या रंगातील अशोक चक्राचा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळून साजरा केला जातो. पण आता इथून पुढे हे चालणार नाही हेच काल दिवसभर ठिकठिकाणी घडलेल्या घटनांवरून दिसून येते. 

  • सुरेंद्र बनसोडे, 9833057645

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com