केंद्र सरकारकडून लागू करण्यात येत असलेल्या त्रिभाषा सूत्रावर तीव्र शब्दांत मत मांडताना, या निर्णयामुळे प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक व लेखक पी. साईनाथ यांनी दिला. ‘मराठी वाचवा’ ही चळवळ केवळ मराठी भाषेपुरती मर्यादित नसून, या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात केवळ मराठीच नव्हे, तर अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत आणि त्या प्रत्येक भाषेला टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, मराठी भाषा आणि एकूणच महाराष्ट्रातील भाषिक अस्मितेच्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.
मराठी पत्रकार दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे वार्षिक पुरस्कार पी. साईनाथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच कालनिर्णयसोबत मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही साईनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेसाठी निवडलेल्या छायाचित्रकारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना रोख रुपये दहा हजार आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या निष्पाप नाटकाला पदार्पणात दोन पुरस्कार मिळाले. या नाटकातील कलाकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रामुळे स्थानिक भाषांवर दबाव येण्याची शक्यता असून, त्यामुळे भाषिक विविधतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून ती भाषिक स्वाभिमान जपणारी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठीसह देशातील सर्व प्रादेशिक भाषांचे संरक्षण आणि संवर्धन लोकशाही व सांस्कृतिक समृद्धीसाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करत, या विषयावर व्यापक चर्चा होणे गरजेचे असल्याचे साईनाथ यांनी अधोरेखित केले.
हिंदी सक्तीच्या विरोधातील मराठी भाषा आंदोलनात मुंबई मराठी पत्रकार संघाने सक्रिय सहभाग नोंदविल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. तसेच पत्रकार संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सोहळ्याचे प्रास्ताविक उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माराम नाटेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अजय वैद्य तसेच कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर यांना यंदाच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. रोख रुपये दहा हजार आणि गौरवचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यंदा प्रथमच सिनेपत्रकार आणि व्हिडीओ जर्नालिस्टसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठी शिरीष कणेकर यांच्या पत्नी भारती कणेकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात आला असून, पहिल्या शिरीष कणेकर स्मृती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर ठरले आहेत. तसेच व्हिडीओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) कै. वैभव कनगुटकर यांच्या स्मृती जपण्यासाठी उद्योगपती राजू रावल यांच्या देणगीतून वैभव कनगुटकर स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या सोहळ्यात तुळशीदास भोईटे यांनी त्यांना मिळालेल्या दहा हजार रुपयांच्या बक्षीस रकमेत अकरा हजारांची भर घालून एकूण एकवीस हजार रुपये, संजीव दयाल यांनी पाच हजार रुपये, तर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दहा हजार रुपये अशी एकूण छत्तीस हजार रुपयांची मदत कै. वैभव कनगुटकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
- पुरस्कारांचा तपशील
- १. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लेखनासाठी श्री. सचिन अंकुश लुंगसे – लोकमत
- २. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त (सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आदी) विषयावरील चालू वर्षातील उत्कृष्ट पुस्तकासाठी श्री. तुळशीदास भोईटे – ज्येष्ठ पत्रकार
- ३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार विषयक पत्रकारितेसाठी श्री. विवेक शंकर दिवाकर – नवराष्ट्र
- ४. विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या उत्कृष्ट ललित लेखनासाठी श्री. अविनाश कोल्हे – मुक्त पत्रकार
- ५. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांतासाठी श्री. अशोक नागनाथ अडसूळ – लोकसत्ता
- ६. शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार : सिनेमा व मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठी श्री. दिलीप अनंत ठाकूर – ज्येष्ठ पत्रकार
- ७. वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी व्हिडीओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) पुरस्कार : इलेक्ट्रॉनिक माध्यमातील वरिष्ठ व्हिडीओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) साठी श्री. राजेश माळकर – ज्येष्ठ व्हिडीओ जर्नालिस्ट.
0 टिप्पण्या