नॅशनल टेलिव्हिजनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत  या कार्यक्रमातील आघाडीची स्पर्धक दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यावर आज थेट पत्रकार परिषदेद्वारे दिव्या शिंदे हिने याबाबत वास्तविकता स्पष्ट केली आहे.   कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस' सिझन सहा मधून ज्या पद्धतीने आपल्याला काढण्यात आले ती पद्धत केवळ अन्यायकारक नसून जाणून-बुजून केलेल्या भेदभावाचा आणि अपमानाचा स्पष्ट नमुना आहे  अशा शब्दात दिव्या शिंदे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

"लोकांनी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला. जे लोक वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक असते, स्वाभिमानाची असते. या संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन कोणाला मारायला जाणार आहे का? माझी तलवार ही माझ्या विचारांची आणि माझ्या माजाची आहे. मी बिग बॉसला १०० वेळा सांगितलं होतं की मला घराबाहेरचं बोलायला लावू नका, पण तिथे कोणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं."  आज मुंबईत प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना ती म्हणाली,  "विषय संपला नाही, आता सुरू झालाय!"  .

घरातून बाहेर पडताच दिव्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. "जय भीम, जय शिवराय" म्हणत तिने महाराष्ट्र आणि जगभरातून तिला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण त्याचसोबत, "आता विषय सुरू झालाय" असं म्हणत तिने बिग बॉसच्या मेकर्सना आणि तिला टार्गेट करणाऱ्या सदस्यांना सूचक इशारा दिला. दिव्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या आतल्या गोष्टी चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल बोलताना दिव्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आपली बाजू मांडण्याची योग्य संधी न मिळाल्याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही, तिने आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. दिव्याच्या मते, तिला जाणीवपूर्वक अशा कोपऱ्यात ढकललं गेलं जिथे तिचा संताप अनावर व्हावा. 

               पुढे बोलताना दिव्या शिंदे म्हणाल्या की, मी तलवारीची धमकी दिल्याचा अर्धवट प्रचार केला जातोय.मात्र मी छत्रपती शिवरायांच्या विचारांची तलवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीची धार याचा आवर्जून केलेला उल्लेख जाणूनबुजून टाळला जात आहे.त्यामुळे माझी नाहक बदनामी होत आहे.  बिग बॉस च्या घरामध्ये केलेले एक सर्वसामान्य, अनौपचारिक विधान “धमकी” म्हणून रंगवून  कठोर कारवाई करण्यात आली. मात्र याच कार्यक्रमामध्ये यापूर्वी इतर स्पर्धकांनी उघडपणे धमकीवजा भाषा वापरूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता दुहेरी निकष (Double Standards) लावण्यात आले. 

   या पत्रकार परिषदेवेळी तिच्यासोबत लोकांचे दोस्त रवि भिलाणे, पत्रकार संजय शिंदे, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे, ज्योतीताई बडेकर, मयूर शिर्के आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे आदी उपस्थित होते. महेश बनसोडे म्हणाले की,हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही.आतापर्यंत दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, गरीब आणि संघर्ष करणाऱ्या कलाकारांवर अशाच पद्धतीने अन्याय होत आलेला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि टीआरपी प्रधान कार्यक्रम सतत सत्ताधारी मानसिकतेला पोषक भूमिका घेत आहेत आणि बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. हे केवळ पक्षपाती नाही, तर जात, वर्ग आणि सत्तेच्या बाजूने उभ्या असलेल्या मनोरंजन व्यवस्थेचे कुरूप वास्तव आहे.अशी भावना सुबोध मोरे आणि संजय शिंदे यांनी व्यक्त केली. 

तर रवि भिलाणे यांनी, ही लढाई केवळ एका स्पर्धकासाठी नसून समता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांसाठीची लढाई आहे.या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दिव्या शिंदे यांच्या प्रकरणात बिग बॉस ने " संविधान '' हा शब्द वापरण्यास तिला केलेली मनाई ही असंवैधानिक असून बिग बॉस ने आणि कलर्स वाहिनीने त्वरित खुलासा करावा.अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा थेट इशारा रवि भिलाणे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दिव्याच्या समर्थकांचा आणि विरोधकांचा मोठा राडा पाहायला मिळत आहे.