300 हून अधिक विद्यार्थी असलेल्या पाली भाषा विभागासाठी स्वतंत्र जमीन देऊन पाली भवन उभारण्यात यावे. या प्रमुख मागणीकरिता भंते विमांसा हे २० ऑगस्ट २०२५ पासून पाच महिन्यांहून अधिक काळ मुंबई विद्यापीठाच्या कालीना संकुलात बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. मात्र इतका दीर्घ कालावधी उलटूनही विद्यापीठाचे कुलगुरू भंते विमांसा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यास तयार नाहीत. त्यामुळे कुलगुरूंना पाली भवनबाबत इतका तिरस्कार का असा संतप्त सवाल पाली संवर्धन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला. हा उघड जातीवाद असून रोहीत वेमुल्ला आणि पायल तडवी यांच्याप्रमाणे उद्या भन्ते विमांसा यांच्या जीवाला देखील धोका असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
समितीने सांगितले की, डिसेंबर २०२३ मधील सत्याग्रहानंतर पाली विभागाला स्वतंत्र मजला मिळाला होता आणि कुलगुरूंनी पाली भवनासाठी स्वतंत्र जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अल्पसंख्याक आयोगाकडून प्रस्ताव मंजूर होऊन निधी उपलब्ध असतानाही स्वतंत्र पाली भवनाऐवजी ‘वारसा भाषा अभ्यास केंद्रा’त केवळ एक मजला देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे सांस्कृतिक दमन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठ प्रशासन बौद्ध समाजाची अस्मिता पायदळी तुडवत असल्याचा आरोप करत, विविध संघटना, उपासक व उपासिका एकत्र येऊन भंते विमांसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
समितीच्या मते, आंदोलन मोडीत काढण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून बाहेरील राजकीय व्यक्तींमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू मुंबई विद्यापीठात भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले असताना, पूर्वनियोजित भेट असूनही भंते विमांसा यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देण्यात आले नाही. सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांनी त्यांना अडवून ठेवत धक्काबुक्की केली. या झटापटीत भंते विमांसा यांना नग्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. या घटनेमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली असून, त्यांना बीकेसी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर त्यांच्याविरोधातच खोटा एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
लोकशाही देशात शांततेने आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असताना, निशस्त्र व शांततामय आंदोलन करणाऱ्या भंते विमांसा यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे समितीने म्हटले आहे. या अन्यायाची परिसीमा गाठत विद्यापीठ प्रशासनाने भंते विमांसा यांना पीएचडी अभ्यासक्रमातून बेदखल केले. तसेच १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी आंदोलनस्थळी असलेले त्यांचे साहित्य, बॅनर व तंबू जबरदस्तीने हटवण्यात आले. याचबरोबर त्यांच्या वसतिगृहातील खोली सील करण्यात आली. परिणामी, त्यांना संपूर्ण रात्र थंडी व डासांच्या त्रासात रस्त्यावर काढावी लागली. यामागे मोठे षडयंत्र असून हे आंदोलनच नव्हे तर भन्ते विमांसा यांनाही संपविण्याचे कारस्थान असल्याची शंका समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
पाली भाषा विभागासाठी स्वतंत्र जमीन देऊन पाली भवन उभारण्यात यावे. तसेच पाली विभागाला शासकीय अनुदान देण्यात यावे. अण्णाभाऊ साठे अतिथीगृह परिसरात विद्यापीठाच्या सर्व विषयांसाठी ३०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह बांधण्यात यावे. या मागण्यांसाठी सुरु असलेले भन्ते विमांसा यांच्या आंदोलनाबाबत बौद्ध समाजातील मान्यवर, शिक्षित वर्ग, अधिकारी, प्राध्यापक, साहित्यिक व विचारवंतांनी मौन बाळगू नये, सत्य परिस्थिती समजून घेऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा, असे आवाहन पाली संवर्धन समन्वय समितीने केले आहे.


0 टिप्पण्या