डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चौदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला पुढच्या वर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हे शताब्दी वर्ष आपण सारे येत्या २० मार्च २०२६ पासून राज्यभरात साजरे करणार आहोत. समान संधी अभियान आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सवाची सुरुवात शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता : मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई महानगर पालिका मुख्य कार्यालयासमोर, आझाद मैदानाशेजारी, सी एस टी एम मुंबई.येथे होणार आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक / निमंत्रक दिवाकर शेजवळ , सुनील कदम, गजानन शिरसाट, नामदेव साबळे, राजू रोटे, प्रमोद नाईक, उदय कांबळे, संजय कांबळे. जालिंदर यादव, सतीश डोंगरे यांनी केले आहे.
चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी केलेली क्रांती म्हणजे केवळ पाणी पिण्याची साधी सामूहिक कृती नाही. तो जगाच्या इतिहासात नोंदला गेलेला देशातील पहिला मोठा अहिंसक, सनदशीर मार्गाचा प्रतिकात्मक लढा गणला जातो. महाडची क्रांती ही जगाच्या इतिहासातील फ्रेंच क्रांती इतकीच महत्वपूर्ण आहे. किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे.फ्रेंच क्रांतीची उद्दिष्ट्ये आणि महाड क्रांती ची उद्दिष्ट्ये ही सारखीच होती. फ्रेंच राज्य क्रांती म्हणजे समता, मानवी अधिकार, प्रतिष्ठा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार यासाठीचा तो लढा होता. पण महाडची क्रांती ही त्याही पलीकडे जाते . भारतात ८०% समूहाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, त्याही अधिकाराचा तो लढा होता. दलितांना सार्वजनिक ठिकाणच्या प्रत्येक संधी पासून वंचित ठेवण्यात आले होते. त्या विरुध्द महाड येथून सुरू झालेला लढा अद्याप संपलेला नाही. तो आजही देशात सुरूच आहे.चवदार तळ्याचे पाणी पिण्यापासून अस्पृश्यांना वंचित ठेवले जात होते. बाबासाहेबांनी त्या तळ्यावर जाऊन फक्त ओंजळीने पाणी घेतले. परंतु त्या कृतीतून बाबासाहेबांनी इथल्या हजारों वर्षांच्या जातीव्यवस्थेला हादरा देत आव्हान दिले. त्याचे परिणाम आज पण पाहातो आहोत. तेव्हापासून जाती निर्मूलनाच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली. अर्थात, क्रांती नंतर आणि प्रतिक्रांतीही घडत असते असे स्वतः बाबासाहेब च म्हणत असत. क्रांती घडताना अनेक अडचणी येत असतात. तरीही बाबासाहेबांची ही क्रांती पूर्ण यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, जाती निर्मूलन हे त्यांचे ध्येय होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता, समान दर्जा आणि संधी वर आधारित समाज घडवण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आपण ' समान संधी अभियान ' च्या माध्यमातून महाड क्रांतीचा शताब्दी महोत्सव वर्षभर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत, शहरात, गावा गावात साजरा करणार आहोत. त्याचा प्रारंभिक सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पार पडणार आहे. त्यातून निरनिराळ्या क्षेत्रांतील दिग्गज आणि नामवंत देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमते विरोधातील लढ्यासाठी दिशा दिग्दर्शन करणार आहेत.

0 टिप्पण्या