Top Post Ad

एकीकडे रस्ता ठप्प असताना दुसरीकडे टोल वसुली मात्र निर्धोकपणे सुरू

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने अनेक तास महामार्ग ठप्प राहिला. द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित होऊन २२ ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आडोशी बोगद्यापासून बऊर गावाच्या हद्दीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. हजारो वाहनचालक, प्रवासी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्ण कित्येक तास रस्त्यावर अडकून पडले. कोणी पहाटे ४ वाजल्यापासून तर कोणी रात्री तीन-पाच वाजल्यापासून कोंडीत अडकले होते. अनेक प्रवाशांच्या फ्लाइट चुकल्या, तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला व शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांना खोळंबा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाणी, अन्न व स्वच्छतागृहाची व्यवस्था अपुरी पडत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता हा अपघात झाल्यानंतर वायूगळती रोखण्यासाठी रात्री तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र गळती थांबवण्यात अपयश आल्याने सकाळी पुन्हा नव्या पथकाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवल्याने कोंडी अधिकच वाढली.  बुधवारी दुपारी ४:३० वाजता दुसऱ्या टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील वायू भरण्याचे काम सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत टँकर बाजूला करून काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली.

केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या 'विकसित' प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या  माध्यमातून विचारला आहे. एक्सप्रेस वेवर उलटलेल्या टँकरमधील ज्वलनशील 'प्रोपेलिन गॅस' सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यासाठी NDRF, SDRF, BPCL आणि महामार्ग पोलिसांना तब्बल ३३ तास लागले.  हजारो प्रवासी अडकलेले असताना त्यांना साध्या स्वच्छतागृहाच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. रस्ता पुढे बंद असतानाही वाहनांना एक्सप्रेस वेवर प्रवेश का दिला गेला? ही प्रशासनाची मोठी चूक आहे. एकीकडे रस्ता ठप्प असताना दुसरीकडे टोल वसुली मात्र निर्धोकपणे सुरू होती, यावरून त्यांनी प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर प्रश्न उपस्थित केले. 

या प्रकरणी झालेल्या  विलंबावर बोट ठेवत आंबेडकर म्हणाले की, प्रशासन किती लोकधार्जिणे आणि कार्यक्षम आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इतका वेळ लागणे हे प्रशासकीय समन्वयाचा अभाव स्पष्ट करते. या ३३ तासांच्या काळात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालके अन्न-पाण्यावाचून महामार्गावर अडकून पडली होती. मुंबई आणि पुण्यातील नुकत्याच निवडून आलेल्या किती लोकप्रतिनिधींनी या संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली? असा सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या उदासीनतेवरही हल्ला चढवला. ३३ तास नागरिक रस्त्यावर अडकून पडणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून ती एक गंभीर प्रशासकीय चूक असल्याचे सांगत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

या अपघाताबाबतचा एक सखोल अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहीती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. झालेल्या अपघाताबाबत या अहवालात माहिती दिली जाईल, तसेच हे अपघात रोखण्यासाठी काही एस.ओ.पी सुद्धा तयार केले जाणार आहेत. याबाबत सुद्धा या अहवालात ते नमूद केलं जाईल आणि तो अहवाल मुख्यमंत्री यांना पाठवला जाणार अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर होणारे असे अपघात त्या मार्गावर होतात, पण ८ तासांच्या आत आपण त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. ८ तासांपेक्षा जास्त कधी ही वेळ लागलेला नाही, दुर्दैवानं काल झालेल्या घटनेतील गॅस जो होता तो अत्यंत ज्वलनशील होता, यामुळे आपल्याला वेळ लागला, अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी आम्ही कार्यवाही करत आहोत. चालकांना आता एक नवीन कार्यशाळा दिली पाहिजे, याबाबत देखील उपाययोजना सुरू आहेत, आमची व्यवस्था कमी पडली, अशी माहिती देखील पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.


------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com