गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुका तातडीने जाहीर करून पार पाडाव्यात, अशी ठाम मागणी ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलच्या वतीने विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या कार्यकारिणीवर निवडणूक प्रक्रिया अनावश्यकपणे लांबविल्याचा आरोप करत संस्थेच्या कामकाजात निर्माण झालेल्या अनिश्चिततेकडे लक्ष वेधले. निवडणुका लांबणीवर टाकण्यामागे मतदार याद्यांमध्ये फेरबदल आणि नव्या सदस्यांची घाईघाईने नोंदणी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला पॅनेलचे सदस्य विवेक गणपुळे, कायदेशीर सल्लागार नील हेळेकर आणि चक्रवर्ती मॅडम उपस्थित होत्या.
सहस्त्रबुद्धे म्हणाले, “८ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास अनुकूल नसल्याचे स्पष्ट केले असतानाही त्या झाल्या नाहीत. सध्याची कार्यकारिणी मुदत संपूनही पदावर कायम आहे. त्यामुळे संस्थेच्या कामकाजात अनिश्चितता निर्माण झाली आहे. २९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेनंतर मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा संशय आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे नियमबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला. सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावरही पॅनेलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चारिटी कमिशनरांनी काही मुद्द्यांवर ताशेरे ओढले आहेत. अभिलेख आणि दुर्मिळ ग्रंथांचे जतन वैज्ञानिक पद्धतीने होत नाही. संशोधन व प्रकाशनाला चालना देण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन व अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे,” असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.
संस्थेच्या वैचारिक भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही विचारधारेवरील संशोधनाला संधी मिळाली पाहिजे. एशियाटिक ही सर्वसमावेशक विचारांची व्यासपीठ असली पाहिजे, मराठी भाषेला संस्थेत अधिक मानाचे स्थान देण्याचीही मागणी करण्यात आली. “दक्षिण मुंबईतील या ऐतिहासिक संस्थेत मराठी कार्यक्रमांना प्राधान्य मिळाले पाहिजे,” असे पॅनेलने नमूद केले. दरम्यान, निवडणुका लवकर घेण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कायदेशीर सल्लागारांनी सांगितले. “निवडणूक प्रक्रिया चारिटी कमिशनरांच्या निरीक्षणाखाली पार पाडावी, अशी मागणी करण्यात येणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलने सभासदांना आवाहन केले की, संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी पारदर्शक व वेळेत निवडणुका होणे आवश्यक आहे. “जनादेश घेऊन सक्षम नेतृत्व देण्यास आम्ही सज्ज आहोत,” असे सहस्त्रबुद्धे यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या