राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील वर्चस्वावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्यांने एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जात आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. महापालिका निवडणूक संपली असली हा वाद अद्याप धुसमसत आहे. मात्र महायुतीमधील या दिग्गज नेत्यांच्या राजकीय कलगीतुरामागे कोणाचा हात आहे अशी चर्चा ठाणे-नवी मुंबईत राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भारतीय जनता पक्ष एकटा लढला असता तर कल्याण आणि उल्हासनगर महापौर झाला असता. किल्ले कोणाचे नाहीत, भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना यांचं नामोनिशान साफ करून टाकू. हे आज मी परत बोलतोय, पण भारतीय जनता पक्ष शिस्तीचा आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटत नसताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे, असं म्हणताना गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं. ठाण्यातील महागणपती मंडळाला गणेश नाईक यांनी भेट दिली असतांना ते बोलत होते. पुढे त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना इशारा दिला की, माझ्या नादी लागाल तर माजी खासदार करेन. या भस्मासुरांनी 10 वर्षे महाराष्ट्राला लुटलं, यांची जागा जेलमध्ये असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.
या वादावर प्रतिक्रिया देतांना शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, भाजपसोबत राहून ही लढाई शेवटाला जाऊ शकत नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही अर्थात शिवसेनेत परतावे आणि लढाईचे रणशिंग फुंकावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. शिवसेनेत येऊन ही लढत दिली तर तुमचाच विजय आहे, माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे. त्यांना शिंदे प्रवृत्तीशी भाजपमध्ये राहून लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांचा छुपा पाठिंबा आहे. नाईक यांनी त्यांच्याच जिल्ह्यात भ्रष्टाचार आणि अरेरावीविरोधात रणशिंग फुंकले आहे.नवी मुंबई आणि ठाण्यातील रस्ते आणि उद्यानासाठी राखीव असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले गेले. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावे लागेल हे स्वत: नाईक सांगत आहेत, शिंदे विरोधातील या लढाईला गणेश नाईक यांना सरकारचे पाठबळ मिळत नाही. त्यामुळे सत्तेत राहून त्यांना ही लढाई लढता येणार नाही. त्यांच्या हातापायात बेड्या टाकून त्यांना लढायला पाठवलेले आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत स्वगृही आणि मूळ प्रवाहात येऊन तेथून लढाई लढली पाहिजे. त्यासाठी संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठिशी उभा राहील, अशी ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली. भाजपमध्ये राहून लढताना फारतर तुम्हाला आमदारकी आणि मंत्रिपदे मिळतील. पण लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही, असा सल्लाही संजय राऊत यांनी नाईक यांना दिला आहे.
गणेश नाईकांच्या या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईकांना वयानुसार स्मृतीभ्रंश झाल्याची टीका श्रीकांत शिंदेंनी केली. तुमच्या घरात तीन माजी असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी खरपूस समाचार घेतला.ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवा असं ओपन चॅलेंज श्रीकांत शिंदेंनी दिलं. वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे असा टोला खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला.
मंत्री गणेश नाईक यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळत असावी असा टोला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी लगावला. गणेश नाईक यांना आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंबाबत आहे, त्यांनी एकदा स्पष्ट करावं असंही उदय सामंत यांनी म्हंटलं. .
कुणी कितीही वल्गना केल्या तरी एकनाथ शिंदे समर्थ आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी तो भक्कम केला. बोलणं सोपं असतं, मात्र शिंदेंनी विधानसभा निवडणूक, नगरपरिषद निवडणुकीमध्ये करून दाखवलं. शिवसेना राज्यात नंबर दोनचा पक्ष आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
दरम्यान शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनीही नाईकांना त्यांच्या खात्यातील कामांची आठवण करून देत पलटवार केला आहे. मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही. फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत. साधनसामुग्री नाही. DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय, असा सवाल करत निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे. पुढे निलेश राणे म्हणतात, वन राहिलीच नाहीत, तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले, तसे आता जंगल पोखरले जात आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत, अशा शब्दात निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश नाईकांवर पलटवार केला.

0 टिप्पण्या