कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन ढसाळांच्या जयंतीदिनी रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी नीलकमल लाॅन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर येथे संपन्न होणार आहे. सदर साहित्य संमेलनास महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक प्रसिद्ध साहित्यिक, कवी, विचारवंत उपस्थित रहाणार असून विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी दिली. ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे उद्घाटक असून,कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, महा.राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष आहेत. उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस, परिसंवाद प्रमुख ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म.भा.चव्हाण. तर कविसंमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
भारत सरकारने नामदेवराव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले होते. हाडकी हाडवळा, मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे, गांडु बगीचा, तुही यत्ता कंची ? मुर्ख म्हातार्याने डोंगर हलविले ? या सत्तेत जीव रमत नाही, प्रियदर्शनी इंदिरा गांधी एक अपरिहार्य पात्र ,खेळ व इतर विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली आहे. खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक, या साहित्य संमेलनासाठी उपस्थित रहाणार असून मराठी साहित्य प्रेमी रसिक - वाचकांनी विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व मराठी साहित्य संस्कृती वृध्दींगत करण्या साठी उपस्थित रहावे असे आवाहन समेलनाचे निमंत्रक ज्येष्ठ साहित्यिक अशोकराव टाव्हरे टाव्हरे यांनी केले आहे.साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद, काव्यसंमेलन,गुणवंतांचा सन्मान अधिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी कनेरसर येथे दि.१५/०२/२०२४ रोजी पहिले व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे दि.१५/०२/२०२५ रोजी दुसरे साहित्य संमेलन झाले होते. पुर ता.खेड येथे नामदेवराव ढसाळ यांचा जन्म झाला असून कनेरसर येथे शालेय शिक्षण झाले होते. ढसाळ हे मुंबई येथे उपजिवीकेसाठी गेले व तीच त्यांची कर्मभूमी ठरली. विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या कवितेत वापरलेली प्रतिक, रूपक, म्हणी, भाषेतील रग, बंदूकीच्या गोळी सारखी सुसाट सुटणारी शब्दफेक, त्या शब्दांची उंची येवढी उतुंग होती की, मराठी साहित्यालाही त्या शब्दांची ओळख नव्हती. त्यांनी मराठी साहित्याला नवे शब्द नवा आयाम देवून साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व क्रांतिकारी बदल घडवून आणला तसेच दलित पँथर ह्या संघटनेच्या माध्यमातून दबलेल्या पिचलेल्या सर्वहरा जनतेचा न्यायिक आवाज बुलंद करीत अन्याय - अत्याचार व विषमते विरुद्ध संघर्ष करीत न्याय - लोकशाही आणि समते साठी आग्रही भूमिका घेऊन राजकिय आणि सामाजिक जनजीवन ढवळून काढले. म्हणून त्यांची विश्वसाहित्यिक म्हणून गणना होते.

0 टिप्पण्या