शिंदेची सेना आणि भाजप यांच्यातील तु-तू-मै-मै निवडणुका झाल्यानंतरही अद्याप सुरुच आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी एकहाती बाजी मारली. तर शिंदेसेनेनंही लक्षणीय यश मिळवलं. निवडणुकीच्या आधीपासूनच नाईक हे शिंदेंना थेट आव्हान देत होते. त्यावर शिंदेकडूनही प्रतिकार होत होता.
नवी मुंबईत परिवहन समितीमध्ये नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करत शिंदेसेनेनं भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पण त्यानंतर भाजपनेही नवी मुंबईत शिंदेसेनेची गोची करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र त्याचे उट्टे शिंदेसेनेनं ठाण्यात काढण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. शिंदेंचं होमपीच असलेल्या ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीत लढले. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. पण दोन्ही पक्षांमधील संघर्ष कायम आहे.
नवी मुंबईत भाजप आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात लढली. तिथे शिंदेसेना विरोध पक्षात बसली आहे. ठाण्यात दोन्ही पक्षांची युती असल्यानं भाजप सत्तेत आहे. त्यांच्याकडे उपमहापौरपद आहे. अन्य समित्यांवरही भाजपनं दावा केला आहे. आता नवी मुंबईत संख्याबळानुसार परिवहन समिती सदस्यांची निवड करणं अपेक्षित असताना भाजपनं त्यांचेच सदस्य दिले. त्यातून भाजप विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष निर्माण झाला. नवी मुंबईत परिवहन समिती सदस्यांच्या निवडीसंदर्भात भाजपनं घेतलेली आक्रमक भूमिका ठाण्यात शिंदेसेनेकडून घेतली जात आहे. ठाणे महापालिकेत स्थायी समिती सदस्यांसह प्रभाग समित्या, परिवहन, शिक्षण, सुधार समिती सदस्य निवडीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नवी मुंबईत भाजपनं ताठर भूमिका कायम ठेवल्यास ठाण्यात भाजपला अन्य समित्यांमधील वाटा विसरावा लागेल, अशी भूमिका शिंदेसेनेनं घेतल्याचे कळते.
त्याचे परिणाम आता ठाण्यात दिसू लागले आहेत. प्रशासकीय राज असताना झालेल्या कारभाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर महासभेत उत्तरं मिळतील अशी अपेक्षा भाजपला होती. पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे ठिणगी पडली आहे. ठाण्यातील महापालिकेच्या पहिल्याच महासभेत जो हंगामा झाला त्यामुळे कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधी बाकावर आहे.याबाबत सर्वत्र संभ्रमच निर्माण झाला होता. प्रशासकीय कामकाजाबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि लक्षवेधी घेण्याऐवजी थेट विषयपत्रिकेला सुरुवात करून त्यास मंजुरी देऊन थेट महासभा विसर्जित करण्यात आली. यामुळे भाजपसह सर्वच पक्षीय नगरसेवक आक्रमक झाले होते.
मात्र याबाबत सर्वसामान्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली की, ही लुटूपुटूची लढाई आहे. या लढाईमुळे मलाईमधील वाटा अधिकाधिक लाटण्याचाच डाव आहे. केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा हा राजकीय खेळ आहे.
0 टिप्पण्या