समाजातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद निर्माण होऊन मानवी संबंध अधिक सुसंवादी व सुखी व्हावेत, या उदात्त उद्देशाने आयुष्यभर कर्मपूजेत रमलेल्या विदर्भातील थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी ठाम मागणी विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आली आहे.ही मागणी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व सरचिटणीस गजानन देविदास नागे यांनी केली असून, यासंदर्भातील मागणीपत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल महामहिम देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविण्यात आले आहे.
संत गाडगे बाबांचे कार्य हे केवळ विदर्भापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र व देशासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामसफाई, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीबांचे पुनर्वसन, मुक्या जनावरांची सेवा, गरजूंचे विवाह व आजारपणात औषधोपचार अशा अनेक सामाजिक क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आजही अजरामर आहे. निरक्षर असूनही समाजाला दिशा देणारे गाडगे बाबा हे “चालतं-बोलतं विद्यापीठ” होते, असे गौरवोद्गार आजही समाजात ऐकू येतात.त्यांच्या कार्याची दखल घेत अमरावती येथील विद्यापीठास “संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे. बाबांच्या विचारांवर आधारित आश्रमशाळा, शैक्षणिक संस्था, मुंबईत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी धर्मशाळा यांसारखे अनेक सामाजिक प्रकल्प आजही कार्यरत आहेत.स्वच्छ गाव–स्वच्छ शहर ही संकल्पना देशात सर्वप्रथम रुजविण्याचे श्रेय संत गाडगे बाबांनाच जाते. त्यांच्या संदेशांवर प्रेरित होऊन आज संपूर्ण देश व राज्य शासन विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. समाजासाठी एवढे भरीव व नि:स्वार्थ कार्य करणाऱ्या या थोर महापुरुषांना आजवर भारतरत्न सन्मान न मिळणे ही खंत असल्याचेही गजानन नागे यांनी नमूद केले.संत गाडगे बाबांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, ही केवळ विदर्भाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व देशातील जनतेची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या