ओडिषा राज्यातील जाजपूर जिल्ह्यात असलेल्या रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी या वैभवशाली बौद्ध संस्कृतीचा वारसा लाभलेल्या स्थळांना *डायमंड ट्रँगल* म्हणतात. नुकताच या तीनही स्थळांचा युनेस्कोच्या भारतीय यादीत तात्पुरता समावेश करण्यात आल्याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचे संचालक लाझार एलोंद असोमो यांनी युनोस्को चे भारतातील राजदूत विशाल व्ही शर्मा यांना एका पत्राद्वारे कळवले आहे.22 डिसेंबर 2025 रोजी या यादीत समाविष्ट होण्यासाठीच्या मार्गदर्शक नियमांची पूर्तता करत या स्थळांबद्दलची आवश्यक ती कागदपत्रे युनोस्को कडे पाठवण्यात आली होती.
डायमंड ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बौद्ध स्थळांमध्ये हीनयान, महायान व वज्रयान या बौद्ध परंपरांचा प्रचार व प्रसार झाल्याचे इतिहास तज्ञांचे म्हणणे आहे. येथील उत्खननात मिळालेल्या बौद्ध अवशेषांवरून याची प्रचिती येते. हा अदभुत डायमंड ट्रँगल बुद्ध विचारांचा, ज्ञानाचा व ध्यानाचा एक जिवंत गौरवशाली इतिहास आहे. या तीनही ठिकाणी भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात महत्त्वपूर्ण असे विशाल विहार, भव्यस्तुप, हजारो छोटे छोटे वोटिव स्तूप, बुद्ध व बोधिसत्वांच्या सुंदर आकर्षक मुर्त्या, विशाल आकाराचे बुद्ध शीर्ष व शिलालेख सापडले आहेत.
चीन, तिबेट, श्रीलंका येथून बौद्ध भिक्षू ध्यान साधना तसेच बौद्ध तत्त्वज्ञान शिकण्यासाठी या ठिकाणी येत असत. प्राचीन चिनी बौद्धयात्री *ह्यू एन सॉंग* याने इसवी सन 638 ते 639 मध्ये या *डायमंड ट्रँगल* ला भेट दिली होती असे इतिहास तज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी आधी तात्पुरत्या यादीत नोंद होणे हे अनिवार्य असते असे भारतीय पुरातत्व खात्याचे म्हणणे आहे. युनेस्को च्या यादीत या तीनही बौद्ध स्थळांचा समावेश झाल्यामुळे स्थानीय, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील बौद्ध पर्यटनाला यामुळे चालना मिळेल व जगाचा भारताकडे एक बौद्ध राष्ट्र म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनाला अधिक व्यापकता येईल.
0 टिप्पण्या