Top Post Ad

समर्थ क्रॉप केअर’चा कोट्यवधींचा घोटाळा...४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे भवितव्य अंधारात

 दोन वर्षांत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत मुंबई ,ठाणे,पुणे, नगर, सोलापूरसह राज्यातील १० हून अधिक जिल्ह्यांतील हजारो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गोळा करणाऱ्या हडपसर येथील ‘समर्थ क्रॉप केअर’ या कंपनीचा बाजार उठल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील चार महिन्यांपासून कोणत्याही गुंतवणूकदाराला परतावा मिळालेला नसल्याने सुमारे ४० ते ४५ हजार गुंतवणूकदारांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणात चार ते पाच हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आश्वासन देत कंपनीने राज्यातील विविध भागांत एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे उभे केल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कोणालाही एक रुपयाचाही परतावा मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त गुंतवणूकदार दररोज हडपसर येथील कंपनीच्या कार्यालयात धाव घेत आहेत.

परतावा मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात सतत चकरा मारत आहेत. मात्र, “साहेब बाहेर गेले आहेत”, “आजारी आहेत”, “लवकरच भेटतील” अशी कारणे देत कर्मचाऱ्यांकडून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. एजंटकडे विचारणा केली असता, “तुमचे पैसे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, घाबरू नका” असे सांगून गुंतवणूकदारांना समजावले जात असल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक गुंतवणूक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामध्ये मुंबईतील टोरेस व फिनिक्स इन्व्हेस्टमेंट, श्रीगोंदा येथील इन्फिनिटी बिकन, बार्शीतील फटे प्रकरण, बीडमधील तिरुमाला तसेच तळेगाव ढमढेरे येथील नरके घोटाळा यांचा समावेश आहे. मात्र, ‘समर्थ क्रॉप केअर’ प्रकरणातील रक्कम आणि गुंतवणूकदारांची संख्या लक्षात घेता हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणी गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप प्रशासकीय स्तरावर ठोस हालचाल दिसत नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. आरोपी परदेशात पळून जाण्यापूर्वी त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुंतवणूकदारांचे किमान मुद्दल तरी परत मिळवून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रशांत अनिल गवळी याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सहआरोपी नागेश जाधव याच्याबाबतही काही गुंतवणूकदारांनी गंभीर आरोप केले असून तो प्रभावशाली अधिकाऱ्यांच्या ओळखीचा असल्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी आता जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com