Top Post Ad

नगर पथ विक्रेता समिती' निवडणुकीचा निकाल जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत मुख्य समितीचे आठ सदस्य आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे सात समित्यांचे ५६ सदस्य अशा एकूण ६४ सदस्यपदांसाठी निवडणूक पार पडली.  सर्व आठ समिती मिळून एकूण ५४ सदस्य निवडून आले. तर १० जागांवर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. निवडून आलेल्या ५४ सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच मतमोजणीचा निकाल आज (दिनांक ३० मार्च २०२६) माननीय न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. 


शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सर्व १३६ मतपेट्या बाहेर काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या जवळपास २०० ते २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी करण्यात आली. यावेळी उप आयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, अनुज्ञापन अधिक्षक श्री. अनिल काटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्य नगर पथविक्रेता समितीत प्रवर्गनिहाय एकूण ८ सदस्यांचा समावेश आहे. यापैकी खुला प्रवर्गातून २, खुला महिला राखीव १, दिव्यांग महिला राखीव १, अनुसुचित जाती १, अल्पसंख्याक महिला राखीव १ आणि इतर मागासवर्ग १ असे एकूण ७ सदस्य निवडून आले. तर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी उमेदवार उलपब्ध झाले नाहीत.  

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ १ साठी, खुला प्रवर्गातून २, खुला महिला राखीव प्रवर्गातून १, दिव्यांग १, अल्पसंख्याक महिला राखीव १ असे एकूण ५ उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले. तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. तसेच अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग महिला राखीव प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत.  

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ २ साठी, खुला २, खुला महिला १, दिव्यांग १, अनुसूचित जाती १ असे चार उमेदवार निवडून आले. इतर मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी १ सदस्य बिनविरोध निवडून आल्या. तर अल्पसंख्याक आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. 

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ ३ साठी, खुला २ आणि दिव्यांग १ असे एकूण ३ उमेदवार निवडून आले. तसेच खुला महिला राखीव, अनुसूचित जाती महिला राखीव, अल्पसंख्याक महिला राखीव, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.  

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ ४ साठी, खुला २, खुला महिला राखीव १, दिव्यांग १, अनुसुचित जाती १, अल्पसंख्याक १ असे एकूण ६ सदस्य निवडून आले. तर अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. 

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ ५ साठी, खुला २, अल्पसंख्याक १, इतर मागासवर्ग महिला राखीव १ असे ४ उमेदवार निवडून आले. तसेच खुला महिला राखीव, दिव्यांग आणि अनुसूचित जाती महिला राखीव या प्रवर्गासाठी प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाला नाही. 

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ ६ साठी, खुला २ आणि दिव्यांग १ असे एकूण ३ सदस्य निवडून आले. तसेच खुला महिला राखीव १, अनुसूचित जाती १, अल्पसंख्याक १, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी प्रत्येकी एका सदस्याची बिनविरोध निवड झाली. तर इतर मागास महिला राखीव प्रवर्गासाठी सदस्य उपलब्ध झाला नाही. 

परिमंडळीय नगर पथविक्रेता समिती परिमंडळ ७ साठी, खुला २, खुला महिला राखीव १ आणि दिव्यांग १ असे एकूण ४  उमेदवारांची निवड झाली. तर अनुसूचित जाती, अल्पसंख्याक महिला राखीव आणि इतर मागासवर्ग या प्रवर्गासाठी प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. तसेच अनुसुचित जमाती या प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाला नाही. 

  बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ३२ हजार ४१५ मतदार आहेत. यातील १५ हजार ८५ मतदारांनी (सरासरी ४९.४६ टक्के) प्रत्यक्ष मतदान करत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १ लाख ४६ हजार ७६ मतपत्रिकांचा वापर झाला. 

दिनांक २८ मार्च २०२६ आणि दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या मतमोजणीसाठी आझाद हॉकर्स युनियन, भारतीय मजदूर संघ, दिव्यांग पथविक्रेता वेल्फेअर संघ, मुंबई फेरीवाला सेना, जनवादी हॉकर्स सभा आणि महाराष्ट्र हॉकर्स युनियन यांच्यासह विविध फेरीवाला संघाचे उमेदवार आणि प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. 

    माननीय उच्च न्यायालय व शासनाकडील निर्देशान्वये तसेच निवडणूक नियमावलीनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नगर पथविक्रेता समितीमधील निवडून आलेल्या सदस्यांबरोबरच नियुक्त करावयाचे शासकीय / अशासकीय सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती उप आयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com