भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अगाध-अपार श्रद्धा असणारे, आंबेडकरी-विचारधारा आणि तत्त्वज्ञान कोळून प्यायलेले 'आनंदा होवाळ' म्हणजे, एक संयमी व्यक्तिमत्व आहे; पण, याचा अर्थ ते 'मवाळ' आहे, असं मात्र नव्हेच! त्यांचा आणि माझा परिचय गेल्या अनेक वर्षांपासूनचाच...त्यांच्या 'इंडियन सोशल मूव्हमेंट' या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक व वैचारिकदृष्ट्या एका विचारपीठावर आलो. 'धर्मराज्य पक्षा'चा अध्यक्ष म्हणून, एक-दीड तपाचा काळ व कामगार-नेता या नात्याने, गेल्या तीन-चार दशकाहून अधिक, असा माझा सत्य-न्याय-बंधुता-समता-ममता असा 'नितीधर्म' लढा...प्रस्थापित धनदांडग्या-भांडवली-व्यवस्थेविरोधातलाच (Vampire-State System) राहिलेला आहे.
कामगार-शेतकरी आणि कष्टकरीवर्गाला गुलाम बनवणारी, रक्तपिपासू शोषक-व्यवस्था, जिला आम्ही "Vampire State System" म्हणतो, त्या व्यवस्थेविरोधात आम्ही जो काही धर्मयुद्धाच्या रुपाने 'एल्गार' पुकारलाय, त्याच पठडीतले आनंदा होवाळ होत. त्यांची जातीअंताची लढाई; तसेच, सामाजिक कर्तव्यभावनेतून तळागाळातील, कष्टकरीवर्गातील दिनदलित जनतेसाठी त्यांचा सुरु असलेला संघर्ष व त्या दरम्यानची त्यांची असीम तळमळ आम्ही पहात आलोय. आनंदाजींच्या चालण्याबोलण्यातून, त्यांच्या पेहरावातून, सोज्वळ वर्तणुकीतून, वरकरणी हा माणूस सरळमार्गी वाटतो, अर्थात तो आहेच; परंतु, त्यांचं लिखाण मात्र, नक्कीच मुळमुळीत नाही...गुळमुळीत तर अजिबातच नव्हे; हे त्यांच्या *"लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?"* या पुस्तकावरुन लक्षात येतंय.एखादे महामार्गावरील वाहन, सुरुवातीला ज्याप्रमाणे महामार्गावरील परिस्थितीनुरुप गती पकडतं...अगदी तसाच 'लेखनप्रवास', त्यांनी या पुस्तकाद्वारे आपल्या जीवनमार्गावरुन बेतलाय. भाजप आणि आरएसएस या दोन्ही धर्मांध संघटनांविरोधात मत व्यक्त करताना, आनंदाजींनी आपली भाषा अधिक आक्रमक ठेवलीय, जी आम्हाला अपेक्षित होतीच. या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना आवर्जून सांगावसं वाटतं की, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात, "गांधीहत्या आणि आपण... " या विषयावर ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, या प्रभावी वक्त्यांचे भाषण, आमच्या 'धर्मराज्य पक्ष' आणि ठाणे-काँग्रेसच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 'आनंदा होवाळ' जातीने उपस्थित होते. आंबेडकरी-विचारवंत या नात्याने, ते मंचावर विराजमानही झाले होते, तो त्यांचा मानच होता. दि. ३० जानेवारी-२०२६ रोजीच्या या कार्यक्रमानंतर, अवघ्या काही दिवसांतच आनंदाजींचं हे पुस्तक प्रकाशित होतय आणि त्यानिमित्ताने, त्याची प्रस्तावना माझ्याकरवी प्रसवली जातेय, यापेक्षा माझ्यासाठी दुसरा सन्मान तो कोणता?
आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आनंदा होवाळांनी, सनातन्यांवर जो काही 'मूले कुठारः' असा शब्दप्रहार केलाय, तो पुस्तकाच्या शीर्षकातून अधोरेखित होऊ पहातोय. 'गांधीहत्या' हा देशाला लागलेला कधि न मिटणारा असा फार मोठा 'कलंक' होता, जो एका नराधम-माथेफिरु नथुराम गोडसेमुळे भारतभुमीला लागलाय. महात्मा गांधी कधिही, देशाची फाळणी व्हावी...या मताचे नव्हतेच; उलटपक्षी देशाच्या विभाजनाला त्यांचा तीव्र विरोध व अखंडतेसाठी प्रसंगी 'प्राणार्पण' करण्याची त्यांची तयारी होती. 'RSS'ने कसा भारतीय 'राष्ट्रध्वज' (तिरंगा) मनोमन कधिही स्विकारला नाही आणि त्यांचाच 'द्विराष्ट्रवादा'च्या सिद्धांताला कसा पाठिंबा होता, हे 'आनंदा होवाळ' यांनी ज्यापद्धतीने सप्रमाण पटवून दिलंय, त्यावरुन *तथाकथित हिंदुत्ववाद्यांची मोठी गोची होऊन त्यांची 'गोबेल्स-निती' वाचकांपुढती उघडी पडल्याशिवाय राहणार नाही.* समाधानाची बाब म्हणजे, आनंदाजींनी आपल्या पुस्तकातून *फक्त, सनातनी प्रवृत्तीवरच नव्हे; तर, तत्कालीन कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांवरदेखील आसूड ओढलेत.* त्यात त्यांनी विनायक दामोदर सावरकरांसोबतच, मौलाना अबुल कलाम आझाद यांनाही सोडलेले नाही. देशातील हिंदू आणि मुस्लिमांमधील धार्मिक कट्टरता विषद करताना, ते पूर्णतया निःपक्षपाती रहातात, ही त्यांच्या लिखाणाची असाधारण अशी जमेची बाजू.
भारतीय संविधान व लोकशाही, यावर नितांत श्रद्धा असणारा आनंदा होवाळांसारखा माणूस, दुर्दैवाने कालौघात काहीसा मागे पडला असला; तरी, या पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांची नवी ओळख (नयी परख) समाजाला होईल आणि समाज त्याची यथार्थ दखल घेईल, याबाबत माझ्या मनात बिलकूल संदेह नाही. बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर चालणारा व बुद्धाचं तत्त्वज्ञान जगणारा, हा अवलिया; म्हणजे, खराखुरा आंबेडकरवादी 'सम्यकमार्गी' आहे, ज्याच्या व्यक्तित्वात, 'राजकीय-सौदेबाजी'चा लवलेशही नाही आणि कधी नव्हता! "गांधीजींचं क्षणभर सोडा; पण, *भगतसिंगांसाठी संघाने स्वतः काय केले?"* किंवा "डाॅ. हेडगेवार, गांधीजींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन तुरुंगात गेले नव्हते; तर, स्वार्थी हेतूसाठी कसे गेले होते", ते ही संघाचा 'पर्दाफाश' करताना आनंदाजी प्रभावीपणे विषद करतात...तसेच, काँग्रेस-कार्यकारिणीला 'दुहेरी-सभासदत्वा'ची पद्धत, ही प्रामुख्याने रा. स्व. संघ आणि हिंदू महासभेमुळे कशी बंद करावी लागली; याचंही सखोल विवेचन पुस्तकात येतं. *संघ ब्रिटीशांच्या धाकात असल्यानेच गोळवलकरांना ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणं मान्य नव्हतं,* ही त्यांची सप्रमाण मांडणी, इतिहासाच्या पानांआड दडलेलं, एक ऐतिहासिक सत्य पुनश्च चव्हाट्यावर आणतं. "ब्रिटीशांनी आपल्याला गुलामीत ठेवणं, हे 'मोठा मासा, छोट्या माशाला खाणार' निसर्ग-नियमानुसार होतं" (थोडक्यात, ज्या ब्राह्मणी-वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती, आमच्या बहुजन पिढ्यापिढ्यांना अस्पृश्यतेच्या व अन्य प्रकारच्या गुलामीत ठेवत होत्या, त्याचंच छुपं समर्थन)",
अशा 'बळी तो कानपिळी' जंगली-विचारधारेच्या *गोळवळकरांना, स्वाभाविकच देशाच्या अवनत अवस्थेसाठी ब्रिटीशांना दोष देणे वा त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणे, मान्यच नव्हतं...* अशातऱ्हेची धाडसी मांडणी आनंदाजी ऐतिहासिक दाखले देत करत जातात आणि म्हणूनच, देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची 'नालायक देशबांधव' अशी कृतघ्न व संतापजनक भर्त्सना करणाऱ्या गोळवळकरांच्या RSS-संघटनेविषयी, *"स्वातंत्र्यसैनिकांचा विश्वासघात करणारी संघटना"* असा प्रत्ययकारी उल्लेख ते करतात. हिंदू धर्माच्या प्राचीन-उज्ज्वल परंपरांचा फुकाचा उल्लेख करायचा आणि देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी सिद्ध झालेल्या लढवय्या स्वातंत्र्य-सैनिकांचा घोर उपमर्द करायचा...असा हा दुपेडी अवसानघात असल्याचा, आनंदाजी, 'लेझर-बीम' सोडतात. स्वतः हेडगेवार, नेताजी सुभाषचंद्रांना भेटण्यासंदर्भात कशी 'अवमानकारक अनास्था' दाखवतात, त्याबद्दलही अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात आहे...आणि, ती यासाठी महत्त्वपूर्ण आहे; कारण, *सध्या संघियांना त्यांच्या निहीत राजकीय-स्वार्थापोटी नेताजींचा, अगदी 'वल्लभभाई पटेल-पॅटर्न'प्रमाणे,* मोठा उमाळा आलेला दिसतोय, म्हणूनच.
*डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी, वि. दा. सावरकरांच्या "एकाच संविधानाखाली एक प्रमुख-प्रबळ हिंदुराष्ट्र आणि दुसरं दुय्यम मुस्लिम राष्ट्र",* अशा अतार्किक व अव्यवहार्य राजकीय-मांडणीची, 'ऑस्ट्रिया व तुर्कस्तान' यांच्या तत्कालीन स्थितीचं वर्णन करत, कशाप्रकारे चिरफाड केली...याबद्दलही, या पुस्तकातून आनंदाजी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं, असं प्रतिपादन करतात. *जिना व सावरकरांच्या द्विराष्ट्र-सिद्धांतावर* मर्माघाती प्रहार करण्याकामी..."राष्ट्रवादाची, धर्म-जात-वंश-पंथ-भाषा व संस्कृती, यांच्या बेड्या व मर्यादा ओलांडणारी परस्परावलंबी, भेदभावरहित सामुदायिक भावना" अशा बाबासाहेबांच्या मांडणीचं, आनंदाजी पुनर्जागरण करतात. *"एक राष्ट्र, एक लोक, एक संस्कृती", ही व्याख्या, नरराक्षस ॲडाॅल्फ हिटलरच्या "एक जनसमूह, एक राज्य, एक नेता", या नाझी-घोषवाक्याशी साधर्म्य सांगते,* असा आनंदाजी दावा करतात. तसेच, "जाती, या राष्ट्रवादाच्या मार्गातील अडथळ ठरत नाहीत", या सनातनवाद्यांच्या व इतर राजकारण्यांच्या कथनावर, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत, "केवळ, भौगोलिक-एकता, राष्ट्र उभारणीसाठी पुरेशी नाही", असं ठामपणे नमूद करत आनंदाजी, RSS-विखारधारेवर (विचारधारेवर नव्हे) या पुस्तकात प्रहार करताना दिसतात. यासंदर्भात पुढे जाऊन "हिंदुराष्ट्र अस्तित्वात आल्यास, ते या देशासाठी फार मोठं संकट असेल", या बाबासाहेबांच्या भविष्यवाणीचाही पुनरुच्चार करतात. *"हिंदू धर्म, हा धर्मातरितांना पुनरपी सामावून घेणारा 'मिशनरी धर्म' का बनू शकत नाही",* याचंही मूळ, देशातील दाहक व तिरस्करणीय अशा, जात-वास्तवात अडकलं असल्याची मांडणी पुस्तकात आहे.
*गांधीहत्येपश्चात 'RSS'वर बंदी घालणाऱ्या गृहमंत्री वल्लभभाई पटेलांनी, पुढे बंदी उठवताना, "राष्ट्रध्वजाचा सन्मान 'RSS'ने राखण्याच्या हमीसोबतच, पटेलांनी त्यांना घालून दिलेल्या पूर्वअटींचंही 'RSS'ने धड कधि कसं पालन केलं नाही",* त्या 'RSS'च्या दुटप्पी व विश्वासघातकी वर्तनाकडे आनंदाजी आपलं लक्ष वेधतात. "लवचिकतेसह जन्माने प्राप्त होणारी 'चातुर्वर्ण्य-व्यवस्था' उचित" म्हणणारे गोळवळकर आणि "श्रमांची विभागणी मान्य आहे; मात्र, श्रमिकांची नाही", अशी उद्घोषणा करणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर...यांच्यातील मानवतेच्या दृष्टीकोनातून पराकोटीचा तारतम्यभाव, वाचकांनी या पुस्तकाच्या आधारे जरुर पडताळून पहावा, ही वाचकांना नम्र विनंती! स्वातंत्र्यापश्चात, *'तीनचा आकडा, म्हणे अशुभ आहे;* म्हणून हिंदू, 'तिरंगा' कधिही मान्य करणार नाहीत', असं 'RSS'चं तमाम हिंदुंची दिशाभूल करु पहाणारं प्रतिपादन होतं...जे तद्दन मूर्खपणाचं, द्वेषमूलक व अज्ञानमय, यासाठी ठरावं; कारण, मुळात 'तिरंगा' हा 'तिरंगा' नसून, तो 'चौरंगा' आहे ('गडद निळ्या' वर्णाचं अशोकचक्र, ते सोयिस्करपणे विसरले)...शिवाय, *संपूर्ण भारतीय अध्यात्म व आधुनिक विज्ञान, हे केवळ 'तीन', या संख्येवरच आधारलेलं आहे.* उदा. गीतेनुसार 'सत्त्व, रज, तम' अशी त्रिगुणात्मक सृष्टीची रचना आणि इलेक्ट्रॉन, प्रोटाॅन, न्यूट्रॉनसह त्रिस्तरीय आण्विक-संरचना इ. इ.
शंभर वर्षांची संघाची वाटचाल आणि स्वातंत्र्यापश्चातची भाजपाची (जनसंघापासून सुरुवात करत) वाटचाल; ते थेट मालेगाव, मडगाव (गोवा) बाॅम्बस्फोट...यावरही आनंदाजी, पावसाळी विजेच्या कल्लोळासारखा आपल्या पापण्या भेदून आत शिरणारा, असा झगझगीत प्रकाश टाकतात. *'RSS'चे प्रेरणास्त्रोत असलेल्या डाॅ. मुंजेंनी इटलीचा नृशंस हुकूमशहा (हिटलरचा कडवा साथीदार) बेनिटो मुसोलिनी याच्या घेतलेल्या भेटीनंतरच,* त्यांना सैनिकी-शाळा काढायची प्रेरणा मिळाल्याचं आनंदाजी सांगतात.
*ब्रिटीशांनी शिक्षण व नोकऱ्यांचे दरवाजे बहुजनांसह सर्वांना खुले केल्याने, 'RSS'वाले नाराज होतेच;* पण, त्यांची ब्रिटीशासमोर बोलण्याची टाप नव्हती...मात्र, *जेव्हा म. गांधींच्या नेतृत्त्वाखाली राजकारणात महिला व बहुजनांचा मोठ्याप्रमाणावर शिरकाव झाला; तेव्हा मात्र, आपल्या पायाखालची जमीनच सरकायला लागली...* म्हणून, "RSS'वाल्यांची माथी भडकली", असं आवर्जून आनंदाजी नमूद करतात. पुस्तकाच्या पानापानातून आधुनिक भारताचा पाया घालणारे, बेलगाम खाजगीकरणाला लगाम घालून रक्तपिपासू-निर्मम-शोषक 'भांडवली-व्यवस्थे'वर प्रभावी अंकुश ठेवणारे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरप्रणित 'हिंदू कोड बिला'चे जोरदार समर्थन करणारे व भारताला धर्मनिरपेक्ष-समाजवादी राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर मोठी मानमान्यता मिळवून देणारे *भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्यासारख्या भारताला लाभलेल्या अमोघ 'नररत्ना'चा...भाजप-संघीय लोक एवढा का तिरस्कार करत आलेत व आजही करताहेत;* त्याच्याही यथास्थित उलगडा होत जातो!
*"धर्माचा धंदा आणि धंद्याचा धर्म" करणारे भाजप-संघीय लोक, खाजगी-भांडवलाला मोकाट सोडू देऊ इच्छितात...* हे आनंदाजी यांचं एखाद्या प्रेषितासारखं विधान, दाहक 'वस्तुस्थिती' (Crony-Capitalism and Uncontrolled 'Privatisation') बनून, आज आपल्यापुढे 'दत्त' म्हणत उभी ठाकलीय, हे विशेषच! *"मनुस्मृतीने 'माणूस' कधिच केंद्रस्थानी मानला नाही किंवा हिंदू कायदे, हे समष्टीसाठी नव्हते; तर, विशिष्ट वर्गासाठी-जमातीसाठी होते",* याचंही पुस्तकात रहस्योद्घाटन होत जातं. त्या हिंदी आणि उर्दुतला फरक मांडताना, "वो ख्वाब देखते है, हम देखते है सपना" असा मार्मिक उल्लेख ते करतात आणि 'राज्य घटनाकार' व 'हिंदू कोड बिल' निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख करताना, "येणारा भविष्यकाळ हा मनूचा काळ" बनून व सर्वसामान्य जनतेचा 'काळ' म्हणून अंगावर येत आहे, असा या 'पुस्तकीय विचार-संहिते'च्या अंति, आनंदाजी अतिगंभीर इशारा देऊन जातात!
...विचारविश्वात, 'एक मैलाचा दगड' बनण्याची अंगभूत क्षमता असणाऱ्या पुस्तकास व त्यांच्या पुढील राजकीय-वाटचालीस, व्यक्तिशः माझ्या आणि माझ्या 'धर्मराज्य पक्षा'च्या अनेकोत्तम शुभेच्छा!
जय महाराष्ट्र I जय हिंद II
- राजन राजे
- (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

0 टिप्पण्या