Top Post Ad

भारतातील प्लास्टिक उद्योग अव्वल स्थानी येण्याकरिता ‘एआयपीएमए’ च्या वतीने ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन

भारताचा प्लास्टिक उद्योग जागतिक व्यापारात निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असून येत्या काही वर्षांत प्लास्टिकच्या तयार उत्पादनांची निर्यात चारपट वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या दृष्टीकोनाला अनुसरून ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए) ने भारताला प्लास्टिक तयार उत्पादनांचे अग्रगण्य जागतिक केंद्र बनवण्यासाठी एक धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. या धोरणाला अनुसरून  ‘एआयपीएमए’ च्या वतीने दिनांक २३ ते २६  मार्च २०२६ दरम्यान मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ हे बी-टू-बी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज प्रसारमाध्यमांना देण्यात आली.

 हे प्रदर्शन पूर्णपणे प्लास्टिकच्या तयार उत्पादनांसाठी समर्पित असलेले भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असेल. यात घरगुती वस्तू, पॅकेजिंग, बांधकाम साहित्य, बॅगा आणि क्रीडा साहित्य अशा विविध प्रकारातील उत्पादनांचे प्रदर्शन जागतिक खरेदीदारांसाठी आयोजित करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयइओ) च्या सहकार्याने ‘एआयपीएमए’ ही स्पर्धात्मकता, विश्वासार्हता आणि नाविन्यपूर्णता यांवर आधारित मजबूत निर्यात परिसंस्था उभारत आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासोबत काम करणाऱ्या ‘एफआयइओ’ ने ५० पेक्षाही अधिक देशांतील सुमारे २०० आंतरराष्ट्रीय ग्राहकांना  तसेच मोठ्या आयातदार कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक स्तरावरील मध्यस्थांना आमंत्रित केले असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

‘एआयपीएमए’चे अध्यक्ष सुनील शहा यांनी या उपक्रमाच्या व्यापक आर्थिक परिणामांवर भर देताना म्हटले, “प्लास्टिवर्ल्ड व्यापारासाठीचे व्यासपीठ तर आहेच पण त्याचबरोबर लाखो ‘एमएसएमई’ना सक्षम करण्याची, देशात रोजगारनिर्मिती वाढवण्याची आणि भारताला प्लास्टिक तयार उत्पादनांचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याची प्रक्रिया आहे, ‘एआयपीएमए’ आयोजित ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ हे प्रमुख बी-टू-बी प्रदर्शन भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. यामुळे प्लास्टिकच्या तयार उत्पादनांसाठी भारताची जागतिक स्त्रोत केंद्र म्हणून असलेले स्थान अधिक बळकट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘एआयपीएमए’च्या प्रशासन परिषदेचे अध्यक्ष अरविंद मेहता यांच्या मते, हा उपक्रम केवळ व्यापारवाढीपुरता मर्यादित नसून तो राष्ट्रीय आर्थिक मिशन बनला आहे. “प्लास्टिवर्ल्ड’ हा केवळ व्यापार विस्ताराचा उपक्रम नसून भारताला प्लास्टिकच्या तयार उत्पादनांचे जागतिक केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय ध्येय आहे, निर्यात संधी शोधाचा भाग म्हणून ‘एआयपीएमए’च्या  निर्यात विभागाने २०२१ इत २०२३ दरम्यान १५ महिन्यांच्या कालावधीत २१ देश आणि प्लास्टिक उत्पादनांच्या ९ एचएसएन अध्यायांवर सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासात असे आढळून आले की, जागतिक निर्यातीत भारताचा वाटा सुमारे १.२ टक्के आहे, तर चीनचा २२ टक्के  आहे. व्हिएतनामचा निर्यातीतील वाटा ४ टक्के आहे. या अभ्यासात अमेरिका, चीन, जर्मनी, मेक्सिको, फ्रान्स, इटली, युनायटेड किंगडम, कॅनडा, पोलंड, नेदरलँड्स, तुर्की, जपान, स्पेन, बेल्जियम, संयुक्त अरब अमिरात, ब्राझील, चिली, इथिओपिया, घाना, केनिया आणि नायजेरिया या प्रमुख आयात बाजारपेठांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असेही आढळून आले की, स्पर्धात्मक दर आणि सुधारित गुणवत्ता मानकांमुळे भारतीय उत्पादकांना अनेक बाजारपेठांमध्ये चीन आणि व्हिएतनाममधील पुरवठादारांची जागा घेण्याची मोठी संधी आहे. या निर्यात मोहिमेला गती देण्यासाठी ‘एआयपीएमए’ने २३ ते २६  मार्च २०२६ दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ चे आयोजन केले असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. 

‘प्लास्टिवर्ल्ड’चे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी म्हटले की,  आज भारताचा प्लास्टिक उद्योग उत्पादनक्षमतेबरोबरच गुणवत्ता, नाविन्यपूर्णता आणि जागतिक स्पर्धात्मकतेचेही प्रतीक बनला आहे. सक्षम धोरणात्मक पाठबळ, मजबूत पायाभूत सुविधा आणि उद्योजकतेच्या ऊर्जेच्या जोरावर भारत प्लास्टिकच्या तयार उत्पादनांचे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. हे प्रदर्शन भारतीय उत्पादकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण करेल.  “पहिल्यांदाच देशभरातील लघुउत्पादकांना तीन दिवसांत एका छताखाली २०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय ग्राहकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. ‘प्लास्टिवर्ल्ड’च्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत भारताची प्लास्टिक उत्पादनांची निर्यात चारपट वाढवण्यास महत्त्वाची मदत होईल,” असा विश्वास मुरारका यांनी व्यक्त केला.

जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या तयार उत्पादनांचा व्यापार सुमारे १.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका असल्याचा अंदाज आहे. सध्या भारताची निर्यात सुमारे १२.५ अब्ज डॉलर इतकी असून ती जागतिक बाजारपेठेतील 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तुलनेत, केवळ अमेरिकाच दरवर्षी ७२ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीची प्लास्टिक उत्पादने आयात करते. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, सरकारची सहाय्यक धोरणे, २ ते ३ नवीन पॉलिमर पार्क उभारणे, प्लास्टिक मशीन आणि मोल्ड उत्पादनाचा विस्तार तसेच एमएसएमई आधारित उत्पादनांत  १०० टक्के वाढ यामुळे भारताची निर्यातक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.  शिवाय त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. चीनने कॅन्टन फेअरसारख्या मोठ्या व्यापार व्यासपीठाचा वापर करून जशी प्रगती साधली, त्याच धर्तीवर भारतही धोरणात्मक पावले उचलत आणि जागतिक खरेदीदारांचा सहभाग मिळवत आपली निर्यात व्यवस्था मजबूत करू शकतो, भारताचा प्लास्टिक उद्योग प्रामुख्याने एमएसएमईवर अवलंबून असून देशभरात ९४,००० हून अधिक उत्पादन कारखाने कार्यरत आहेत. सध्या या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा एकूण सुमारे ९० लाख लोकांना त्यातून रोजगार मिळतो. एआयपीएमएच्या मते, प्रस्तावित निर्यात उद्दिष्ट साध्य झाल्यास या क्षेत्रातील रोजगार १.२५ कोटी लोकांच्याही पुढे जाऊ शकतो. असे तज्ज्ञांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com