मेळघाट, धारणी यांसारख्या आदिवासी भागांत कुपोषणामुळे बालमृत्यू आणि स्तनदा माता दगावत असल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल आहेत. त्यात आदिवासी भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी झाली. सुनावणीत 'न्यायालयाचे मित्र' अॅड. अनुप गिल्डा यांनी मेळघाट व धारणी येथे आरोग्याशी निगडीत सुविधांच्या अभावांचा पाढाच न्यायालयात वाचला. सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासी भागांसाठी असलेल्या निधीत पाच टक्के कपात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अद्याप या ठिकाणी रुग्णालय नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सुनावणी करतांना, काही काम न करता घरात बसून राहिलेल्यांना (लाडकी बहीण योजना) आर्थिक मदत म्हणून पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे निधी असेल तर आदिवासी भागांमध्ये रुग्णालये बांधण्यासाठीही निधी असलाच पाहिजे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.
बालमृत्यू, मातांचे मृत्यू थांबायला हवे होते. स्वातंत्र्य मिळवून ७९ वर्षे झाल्यानंतर प्रगतिशील राज्यात आजही आपण कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवर चर्चा करत आहोत. मुलांना वाचवा, असे सांगावे लागत आहे, असा संताप खंडपीठाने व्यक्त केला. आदिवासी भागातील नागरिक मुलांना रुग्णालयात दाखल करत नाहीत. कारण त्यांना रुग्णालयात भरती होणे म्हणजे विलासीन असल्यासारखे वाटते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
ज्येष्ठ वकील अनुप गिल्डा यांनी मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी भागांतील ग्रामपंचायतींना अनुक्रमे ३० कोटी आणि १४८ कोटी रुपयांचे वीजबिल आले असून ते न भरल्यास वीज खंडीत होईल आणि आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तर, सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा उपाध्याय यांनी मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या आदिवासींना त्यांचे वेतन न मिळाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. सरकारने नवीन योजना अमलात आणली तर या कामगारांना वेतन मिळणार नाही, असे सांगितले.
धारणी येथे २६ वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. आशिष सताव यांनी, रुग्णांना रक्त मिळत नसून ते सरकारकडून विकत घ्यावे लागते, असे न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला गिल्डा यांनी केलेल्या युक्तिवादाची आठवण करून देत म्हटले की, सरकारकडे घरी बसलेल्या लोकांना मदत करण्यासाठी निधी आहे. मात्र, आदिवासींना वेतन, अन्न आणि रुग्णांना रक्त पुरविण्यासाठी निधी नाही. सरकारने याचे उत्तर द्यावे. न्यायालयाने राज्य सरकारला मनरेगाअंतर्गत आदिवासी कामगारांच्या वेतनाबाबत आणि वीजबिल भरण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली.

0 टिप्पण्या