बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान आणि इतर कायदेशीर देणी प्रदान करण्याबाबत संवेदनशील आहोत. ‘बेस्ट’कडे स्वतःच्या मालकीच्या बसेस असाव्यात, यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात सातत्याने बैठका घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. बेस्ट प्रशासनानेदेखील प्रभावी उपाययोजना आखाव्यात, असे प्रतिपादन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची संयुक्त सभा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समिती सभागृहात आज (दिनांक २७ मार्च २०२६) संपन्न झाली. महापौर श्रीमती रितू तावडे अध्यक्षस्थानी होत्या. बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या, उपदान (Gratuity), वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती, स्वमालकीच्या बसेसची उपलब्धता, अर्थसहायता याविषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत महापौर श्रीमती तावडे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच, समस्यांचे निराकरण करण्याकामी आश्वस्त केले.
उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृहनेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, 'बेस्ट' समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा बेस्ट महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, सहायक महाव्यवस्थापक (विधी) श्री. राजेंद्र डुबल, मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) श्री. रमेश मडावी यांच्यासह बेस्टचे संबंधित अधिकारी तसेच संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महापौर श्रीमती तावडे पुढे म्हणाल्या की, 'बेस्ट' ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक वाहतूक आणि वीज पुरवठा संस्था आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या नागरी परिवहन सेवांपैकी 'बेस्ट' एक प्रमुख उपक्रम आहे. बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. ‘बेस्ट’कडे स्वतःच्या मालकीच्या बसेसचा ताफा वाढविणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीनेही सकारात्मक पावले उचलली जातील. यासाठी नियमितपणे बैठका आयोजित करण्यात येतील. बेस्ट प्रशासनानेदेखील आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजना आखून सादर कराव्यात, उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले

0 टिप्पण्या