Top Post Ad

आश्विनी भिडे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्‍वीकारला

ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज (दिनांक ३१ मार्च २०२६) सायंकाळी स्‍वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या श्रीमती भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय)  प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.


 अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्‍या अतिरिक्त विभागीय आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्‍हणून आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्हणून त्‍यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्‍यात महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे.

आश्विनी भिडे यांनी यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत दिनांक ९ मे २०२० ते दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये देखील श्रीमती भिडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. दरम्यान, विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्‍या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्‍यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. त्यांना तीन महिने मुदतवाढ मिळणार अशी चर्चा होती, पण मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार याबाबत महापालिकेत उलटसुलट चर्चांना वेग आला होता..  मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, संजय मुखर्जी या तीनही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड होणाऱ्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. या आधी त्यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुराही सांभाळली आहे. अश्विनी भिडे यांना आयुक्तपदाचा तीन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी एक महिला आहेत आणि त्याचवेळी आयुक्तपदीही महिलेची नियुक्ती होणार असल्याने महापालिकेवर महिला राज आल्याची चर्चा आहे. गेल्या काही काळापासून मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर सातत्याने भ्रष्टाचाराचे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तपदाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे आल्याने, महापालिका प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचं महत्त्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com