मुंबई महानगरातील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. प्रशासकीय विभाग कार्यालय आणि मध्यवर्ती यंत्रणा यांच्यात समन्वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना प्रत्येक कामाच्या टप्प्याची नियमित माहिती द्यावी. ज्या नाल्यांची स्वच्छता सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित नाल्याची लांबी - रूंदी, गाळ काढण्याचे परिमाण, कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्याचा संपर्क क्रमांक आदींची माहिती दर्शविणारा फलक कार्यस्थळी लावावा. नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासात योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. नाले स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्यापासून ते क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे छायाचित्रण, चित्रिकरण अनिवार्य करावे, असे विविध निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उप महापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी उपस्थित होते.
तसेच मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून याबाबत काही नियम शिथिल करण्यात आले आहे. ज्यामध्ये अनुभवी किंवा विनाअनुभवी दोन्ही आस्थापना निविदा भरू शकतात. जेणेकरून या कामाकरिता लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती होऊन हे काम जलद गतीने सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यावेळी पावसाळ्यात कंत्राटदारासोबतच प्रशासन आणि युतीचे सर्व नगरसेवक सफाई कामांवर लक्ष ठेवणार आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून लवकरात लवकर आणि व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे पालिका प्रशासनाची असेल त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक देखील त्यांच्यासोबतच या कामांवर देखरेख ठेवणार आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच काही त्रास होणार नाही यासाठी युतीचे शासन प्रयत्नशील असल्याचे ग्वाही महापौरांनी दिली.पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि मुंबईकरांना जोरदार पावसामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी. प्रमुख नाले व लहान नाले यांबरोबरच अतर्गत नाल्यांचीदेखील स्वच्छता करावी. नालेस्वच्छतेची जबाबदारी पूर्ण गांभीर्याने आणि देखरेखीखाली पूर्ण करावी. दिनांक ३१ मेपर्यंत पावसाळ्यापूर्व नालेस्वच्छतेचे संपूर्ण उद्दिष्ट्य गाठावे. अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करुन गाळ काढण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करावी. नदी/ नाल्याकाठी राहणा-या नागरिकांना पावसाळ्यात धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे संरक्षक भिंत बांधावी. लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना विश्वासात घ्यावे. नाले स्वच्छतेच्या कामांची टप्पेनिहाय माहिती नगरसवेकांना द्यावी. अडीअडचणी असल्यास नगरसेवकांना अवगत करावे व समस्यांचे निराकरण करावे. नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासात विल्हेवाट लावावी. त्यावर द्रव्य फवारणी करावी. गाळ वाहतूक करणा-या वाहनांवर ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (VTS) लावावी. या वाहनांवर ताडपत्रीचे आच्छादन असावे. गाळाचे मोजमाप योग्य प्रकारे करावे. गाळ काढण्याबरोबरच तरंगता कचरादेखील वेळोवेळी काढावा, असे स्पष्ट निर्देश देखील प्रशासनाला देण्यात आले असून याबाबत युतीचे सर्व नगरसेवक स्वतः या सर्व कामांवर लक्ष ठेवणार असल्याचेही महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या.
महानगरपालिकेच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. पहिली ते आठवीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. आतापर्यंत निविदा मागवून या वस्तूंची खरेदी केली जात होती. मात्र या वर्षापासून हे साहित्य जी.ई.एम. या केंद्र शासनाच्या पोर्टलवरून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदी प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जावी, यासाठी जेम पोर्टलचा अवलंब करण्यात येत आहे. नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर होणे, हे आपले कर्तव्य आहे. ते चोखपणे पार पाडावे, यासाठी युती प्रशासन सज्ज असल्याचे महापौरांनी सांगितले

0 टिप्पण्या