Top Post Ad

काँग्रेस-वंचितची RSS च्या मुख्यालयावर धडक

 देशाचा स्वाभिमान अमेरिकेला विकणे, देशाला गुलाम बनवणे ही मोदींची राष्ट्रभक्ती- अॅड. प्रकाश आंबेडकर

भाजपा व RSSला मनुवादी, हुकूमशाही व्यवस्था आणायची आहे - हर्षवर्धन सपकाळ

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. RSSमुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत असतात. RSS नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकापासून RSSच्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचितचे नेते हर्षवर्धन पुंडकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश भोयर, अतुल कोटेचा यांच्यासह काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या मोर्चाने धडकी भरलेल्या भाजपा सरकारने पोलिसांना पुढे करून मोर्चाला परवानगी नाकारून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी RSS मुख्यालय परिसरात धडकले. 

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आल्याने पंतप्रधान अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. याच दबावाखाली नरेंद्र मोदींनी व्यापार करार करून भारताला गुलाम बनवले आहे. देशातून सिलेंडर आणि संसदेतून नरेंद्र गायब झाले आहेत. इंधन गॅस तुडवड्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, देश म्हणून एकत्र भूमिका घेताना दिसत नाहीत. एपस्टिन फाईलमध्ये नाव आले तरीही काहीच कारवाई होत नाही गेंड्याचा कातडीचे व बेशरमपणाचे लक्षण आहे. एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकच असल्याने आम्ही संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा काढणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे.  RSS कार्यालयावर  मोर्चा काढल्याने भाजपाची देशभरात नाचक्की होईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली तरी आमचा निर्धार व मागण्या कायम आहेत. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 अशोक खरातचे कारनामे सुरु असताना फडणवीस झोपा काढत होते का? नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण आपणच बाहेर काढले अशा फुशारक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मारत आहेत. मुख्यमंत्र्याच्या प्रत्येक शब्दात अहंकार ठासून भरलेला दिसतो. फक्त मलाच ज्ञान, बुद्धी आहे असा त्यांचा समज असून इतर सर्वांना ते मुर्ख समजतात. मुळात एपस्टीन फाईल्सवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशोक खरात फाईल उघडण्याचा त्यांचा कांगावा असावा. भोंदू अशोक खरात प्रकरण होऊच कसे दिले? मागील पाच वर्षाच्या काळात फडणवीसच गृहमंत्री होते, त्यावेळी फडणवीस झोपा काढत होते का? हे त्यांचे अपयश आहे, हे त्यांनी मान्य करावे. प्रकरण अंगलट झाल्याने रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, चाकणकर यांना कशाचाही पश्चाताप झालेला नाही व नौतिकतेच्या आधारेही त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मोर्चापूर्वी संविधान चौकातील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे संविधान व तिरंगा झेंडा RSSला देणार होतो पण सरसंघचालक मोहन भागत हे मोर्चाला व संविधानाला घाबरून दिल्लीला निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी RSSच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी निवृत्ती घ्यावी असे बौद्धिक त्यांना देण्यात आले पण मोदींने ते मानले नाही, याचा अर्थ नरेंद्र मोदी RSSला घाबरत नाहीत, ते सैराट झाले आहेत. RSSत नैतिकता राहिलेली नाही हे यातून दिसत आहे. भाजपा व RSSला देशातून संविधान संपवून बंच ऑफ थॉट लादायचे आहे. RSS व भाजपाला संविधान मान्य नाही. सर्व यंत्रणा सरकारने खिशात घातल्या आहेत. भाजपा व RSSला मनुवादी, हुकूमशाही व्यवस्था आणायची आहे. हा देश अदानी-अंबानीच्या हाती द्यायचा डाव आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजपाचे सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहे. भारतीय मालावर अमेरिकेने १८ टक्के कर लावला आहे. पण अमेरिकेच्या मालांवर भारतात शून्य टक्के कर आहे, भारताला गुलाम बनवण्याचा हा प्रकार आहे. एपस्टिन फाईलमध्ये मोदींचा उल्लेख असून मोदींनी दुसऱ्या राष्ट्रप्रमुखांसमोर मुजरा केल्याचा उल्लेख आहे. देशाचा स्वाभिमान अमेरिकेला विकणे, देशाला गुलाम बनवणे ही मोदींची राष्ट्रभक्ती आहे का? डोनाल्ड ट्रम्पचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आलेले आहे, त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी इराणवर हल्ला केला आहे. इराण हा भारताचा मित्र असून जम्मू काश्मीर प्रश्नी इराणने भारताच्या भूमिकेचे उघड सर्मथन केलेले आहे. प्रत्येक संकटात इराणने भारताला साथ दिली पण आज भारत इराणच्या मागे उभा राहिला नाही. कॅनडा सारखा छोटा देश अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही तर नरेंद्र मोदी का घाबरतात? सरसंघचालक मोहन भागवत येत्या १५ दिवसात नरेंद्र मोदी यांना जाब विचारतील, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. काँग्रेस व वंचितची विचारधारा वेगळी आहे पण देशाच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलो आहोत. देशाचे स्वातंत्र, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असेही आंबेडकर यावेळी म्हणाले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com