Top Post Ad

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 साठी ठाणे महानगरपालिका सज्ज

 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व शहरांच्या स्वच्छतेचे मूल्यांकन स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 द्वारे केले जाणार आहे. या अभ‍ियानातंर्गत शहराच्या स्वच्छतेचे मूल्यांकन हे प्रत्यक्ष पाहणी करुन व नागरिकांच्या अभिप्रायावर केले जाणार असून यासाठी केंद्र शासनाची समिती महापालिका राबवित असलेल्या उपक्रमाची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (24 एप्रिल) ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी करुन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.


      स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात 27 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. तर भारतामध्ये याची सुरूवात 25 एप्रिलपासून झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपायुक्त मधुकर बोडके, मिताली संचेती, उपनगरअभ‍ियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवाणी आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयुक्तांनी पाहणी केली.

           स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 या अभियानात ‘दृश्यमान स्वच्छता, घनकचरा प्रक्रिया, कचरा वर्गीकरण व संकलन, स्वच्छतागृहांची उपलब्धतता, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, सेप्टिक टँक साफसफाईचे यांत्रिकीकरण, स्वच्छता जनजागृती, संस्थात्मक बळकटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि नागरिकांच्या तक्रार निवारण प्रणाली अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

          उथळसर प्रभागातील कचराळी तलाव परिसरात सार्वजनिक शौचालयाची पाहणी करताना शौचालयावर चिकटवण्यात आलेली जूनी पत्रके तत्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शौचालयात नियमित पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पाईपच्या मुखाशी जाळ्या बसविणे, तसेच दुकानदारांनी दुकानाबाहेर ओला व सूका अशा दोन कचरा कुंड्या ठेवाव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या.

         पाचपाखाडी येथील सरस्वती इंग्लिश हायस्कूलमध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि ई-कचरा यांचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत आहे का हे पाहत असताना शाळेतील शौचालयाच्या स्वच्छतेची पाहणी आयुक्तांनी केली. यानंतर वंदना नाल्याची पाहणी करून नाल्यातून पाण्यासोबत वाहून येणारा कचरा अडविण्यासाठी जाळ्या बसविण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

            तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाचीही पाहणी करण्यात आली. तलावाच्या कडेला तरंगत असलेला कचरा त्वरित काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. तलाव परिसरात वृक्षारोपणाची शक्यता तपासण्यास सांगण्यात आले. याशिवाय, सीएसआरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या “फ्लोटिंग वेटलँड” या संकल्पनेबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

           स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहराच्या स्वच्छतेचे मूल्यांकन एकूण 12,500 गुणांवर केले जाणार असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण आणि वाहतूक, प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या अभिप्रायाला सर्वाधिक 10,500 गुण दिले जाणार आहेत. उर्वरित 2000 गुण हे प्रमाणपत्र घटकांवर आधारित असणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या अभिप्रायाला या सर्वेक्षणात महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. महापालिकेच्या संबंधित विभागांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व निकषांनुसार नियोजन करुन शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी या पाहणी दौऱ्यात दिल्या.         स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे शहराने उत्तम कामगिरी करावी यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही स्वच्छतेबाबत सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com