Top Post Ad

राजावाडी रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत इमारत उभारणीचे प्रत्यक्ष काम पुढील आठवड्यात सुरु करण्याचे निर्देश

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडणे हे कोणत्याही स्थितीत परवडणारे नाही. पुनर्विकास टप्पा एक मधील इमारत उभारणीचे काम पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे, प्रलंबित असलेल्या परवानगी युद्ध पातळीवर प्रयत्न करून प्राप्त कराव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.


घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही.सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६०० रुग्णशय्या क्षमता असलेली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन आज (दिनांक २ एप्रिल २०२६) पाहणी केली. नगरसेवक. धर्मेश गिरी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) भारती राजूलवाला, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता श्री. मनोज राणे, एन विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) श्री. मारुती पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

प्रारंभी माहिती देताना उपप्रमुख अभियंता श्री. राणे म्हणाले की, राजावाडी रुग्णालय पुनर्विकास टप्पा एक अंतर्गत उभारण्यात येणारी इमारत ही निम्न तळघर, तळघर, तळमजला अधिक १० मजले या स्वरूपाची राहणार आहे. ६०० रुग्णशय्या क्षमतेच्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. यासाठी सुमारे ३३ हजार १७९ चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ राहणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये टप्पा एक इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. गौण खनिज आणि राडारोडा संदर्भातील परवानगी प्राप्त होताच तत्काळ इमारत उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण रुग्णालय स्थलांतरित केले जाईल आणि पुढील टप्प्यात दुसरी इमारत उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भूमिपूजन होऊन चार महिने लोटल्यानंतरही प्रत्यक्ष इमारत उभारणी कार्यवाही सुरू न झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. प्रशासनाला जिथे जिथे अडचणी वाटत असतील, त्या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतल्यास अशा अडचणी मार्गी लागू शकतात. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना महापौरांनी केली. पुढील आठवड्यात इमारत उभारणीचे काम सुरू करावे. इमारत उभारणीचे काम सुरू असताना शेजारी रुग्णालयामध्ये रुग्णांना बांधकामाचा आवाज, धूळ आदींचा त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. कामाच्या प्रत्येक टप्प्यात घाटकोपर परिसरातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने माहिती द्यावी. रुग्णालय पुनर्विकास संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त सभेमध्ये सविस्तर सादरीकरण करावे, असे निर्देशही महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com