Top Post Ad

अवयवदान जनजागृतीसाठी रुग्णमित्र आता अधिकृत गणवेशात

 अवयवदानाबाबत समाजात जनजागृती वाढवण्यासाठी आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी यासाठी ‘रुग्ण मित्रांनी एक हृदयस्पर्शी पुढाकार घेतला आहे. आता रुग्ण मित्र अधिकृत गणवेश परिधान करून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विजेते आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिली. रुग्णालयांमध्ये अनेकदा रुग्णांचे नातेवाईक उपचार, कागदपत्रे, अवयवदानाची प्रक्रिया किंवा विविध विभागांपर्यंत पोहोचण्यासाठी गोंधळून जातात. अशा वेळी ‘रुग्ण मित्र’ हे आधारवडासारखे त्यांच्या मदतीला धावून येतात. अवयवदानाची महत्त्वाची माहिती देणे, आवश्यक मार्गदर्शन करणे आणि गरजू कुटुंबांना मानसिक आधार देणे हे काम ते निस्वार्थपणे करत असतात. यावेळी रुग्ण मित्र संस्था संलग्न प्रसन्न फाउंडेशन च्या पुढाकाराने हा गणवेश देण्यात आला.

“अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ती मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. एका दात्यामुळे अनेकांना आयुष्याची नवी संधी मिळू शकते, या उपक्रमामागे केवळ सेवा भाव नाही, तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याची तीव्र इच्छा दडलेली आहे. अवयवदानामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेकांना नवजीवन मिळू शकते, ही भावना समाजात रुजवण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ सातत्याने प्रयत्न करत आहेत.  अशी भावनिक प्रतिक्रिया मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी  व्यक्त केली.

या कार्यक्रमाला प्रसन्ना फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा आष्ट्रीवकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रसाद मोकाशी, सुभाष गायकवाड (शिर्डी), विनोद साडविलकर, रमेश चव्हाण, किरण गिरकर, कमलेश साळकर, प्रज्वला इंगळे, शांताराम मोरे, सुनीता हेळकर, दमिता उबाळे तसेच बॉम्बे हॉस्पिटलचे देहदान-अवयवदान समन्वयक प्रफुल्ल पवार यांच्यासह अनेक रुग्णमित्र उपस्थित होते.

 या सेवेला आता अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी रुग्ण मित्रांना अधिकृत गणवेश देण्याचा निर्णय प्रसन्न फाउंडेशनच्या श्रद्धा अष्टीवकर यांनी घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांची ओळख सहज पटेल आणि गरज पडल्यास ते थेट मदत मागू शकतील असे रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या परिसरात मदतीचा हात पुढे करणारे हे ‘रुग्ण मित्र’ आता अधिकृत गणवेशात दिसणार असून, त्यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे अवयवदानाबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होईल, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com