Top Post Ad

"तुकाराम महाराजांचे मारेकरी अध्याप मोकाट फिरत आहेत.!"

38 वर्षांपूर्वी कॉ. गोविंद पानसरे ह्यांनी लिहिलेल्या " शिवाजी कोण होता?". ह्या छोटेखानी पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी ह्यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ह्यानी दूरध्वनी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ह्याविरुद्ध त्यांनी कोल्हापुरातील राजाराम पुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हा कॉ. पानसरे ह्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरच्या 35 ते 40 वर्षांनंतर ह्या प्रवृत्तींनी देशामध्ये धुमाकूळ घालून जातीपातीचे, धर्मांधतेचे राजकारण करीत लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याची भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. 

          मी ते पुस्तक वाचले आहे. त्यात त्यांनी महाराजांची बदनामी होईल असा एक ही  शब्द लिहिलेला नाही. उलट त्यात महाराज सर्व धर्मांचा कसा आदर करायचे? जातीपातीची, धर्माची  बंधनं जुगारून सर्व जातींच्या लोकांना सैन्यात सामील करून महत्त्वाच्या पदावर नेमले होते. त्यांना सर्वांना "मावळे" संबोधले जात होते. ते रयतेची काळजी कशा प्रकारे घेत होते. ह्याविषयी लिहिले आहे. ह्याही पुढे जाऊन मी असे म्हणेल की, सर्व  साधारण लोकांना महाराजांच्या  विषयी माहीत नसलेल्या अनेक गुणांचे विश्लेषण त्यांनी केले आहे.  ते मी पुढे सोदाहरण स्पष्ट करील.   पण कावीळ झालेल्या माणसाला सगळे जग पिवळे दिसते, त्याप्रमाणे जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करून     त्यावर आपली धर्मांधतेची, राजकारणाची पोळी भाजण्याचे प्रकार ह्या देशात स्वातंत्र्यानंतरच्या 35 ते  40 वर्षापासुन हेतुपुरस्सर  सातत्याने सुरू आहेत. तसेच ज्यांनी ज्यांनी  जाचक परंपरा, जातिभेद, अंधश्रद्धा ह्या विरुद्ध आवाज उठविला, त्यांना संपवण्याचे प्रयत्न झाले आहेत. भगवान गौतम बुद्ध, जोतिबा फुले ह्यांच्यावर देखील मारेकरी पाठविण्यात आले होते. ह्याचे अधिक स्पष्टीकरण व्हावे म्हणुन एकच उदाहरण देतो. 

         संत तुकाराम महाराज. त्यांचा जन्म १६०८ साली देहू,  जिल्हा  पुणे येथे झाला.  मला त्यांच्या बद्धल नेहमीच कौतुक अन् औस्तुक्य  वाटत आले आहे.कारण भारतातील हा एकमेव संत आहे की, ज्याला सदेह वैकुंठाला नेण्यासाठी देवांनी विमान पाठविले होते. ही अशी एकमेव अद्वितीय घटना आहे की, जी यापूर्वी घडली नव्हती आणि त्यानंतरही घडली नाही.आणि मी खात्रीने सांगतो की, भविष्यातही घडणार नाही .  तुकारामाचा जन्म पंढरपूरच्या विठोबा रखुमाई वर नित्तांत श्रद्धा  असणार्या वारकरी कुटुंबात झाला होता .सावकारी व्यवसाय असल्यामुळे सधन कुटुंब होते. परंतु माता पित्याचा लहान असताना मृत्यु झाला. नंतर  बायको आणि मुलाचे निधन झाले. दुष्काळात घरात जे काही होते ते लोकांस वाटून टाकले. आवली ही त्यांची द्वितीय पत्नी पण अतिशय भांडखोर.आईवडिलांचा अकाली मृत्यु, प्रथम पत्नी, मुलगा ह्यांचे झालेले निधन, भांडखोर आवली, दुष्काळामध्ये संपत्तीचे केलेले वाटप, त्यामुळे ते अक्षरशः कफल्लक झाले होते. म्हणून त्यांना वैराग्य आले.

 शेजारच्या डोंगरावर जाऊन तासन तास भजन कीर्तन करू लागले . संसारातून लक्ष उडाले .भक्त जमू लागले .हळू हळू अभंग लिहू लागले .  त्यांनी जवळ जवळ ४००० अभंग लिहिले. त्यांच्या पूर्वायुष्याबाबत वेगवेगळी मतं आहेत . त्या वादात न पडता, त्यांनी केलेले काम, त्यांचा शेवट व तो का झाला ह्या गोष्टींचा आपल्याला परामर्श घ्यायचा आहे. तुकारमापुर्वी किंवा त्यांच्या नंतर, त्यांच्या इतका, संत, पुण्यात्मा संपूर्ण भारतात जन्माला आला नाही का ? मग त्यांच्यासाठी देवानी वैकुंठ गमनासाठी विमान का पाठविले नाही? ह्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही व मिळणार  देखील नाही. बरं त्या विमानाला म्हणे इतकी घाई होती की ,महाराज सदेह  वैकुंठाला निघाले होते, तर कमीत कमी त्याच्या बायको व मुलांची शेवटची भेट तरी होवु द्यायची की नाही?  ते येईपर्यंत विमान उडाले होते. असे आवलीला  तिथे  जमलेल्या गावकऱ्यांनी सांगितले. शेवटी प्रश्न शिल्लक राहतोच ना की, फक्त एकट्या तुकाराम महाराजांना वैकुंठा गमन का ?  तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. गेली १००वर्षे सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केलेला आहे. असे मत संत साहित्याचे अभ्यासक व तुकारामांचे वंशज डॉ.सदानंद मोरे व्यक्त करतात 

डॉ आ.ह साळुंखे ह्यांनी. " विद्रोही तुकाराम" नावाचे चरित्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय्य होवुन ईश्वराच्या भक्तिकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला,  सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहार शून्य, भोळसट संत असे काहिसे त्यांचे चित्र आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्धाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवे आव्हान  देणारा हा संत म्हणजे एक महान क्रांतीकारी लढवय्या होता. ते सिंह होते पण त्यांचे चित्रण शेळीच्या स्वरूपात केले जाते.

        तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते. या तथाकथित  लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम,  त्यांच्यावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून  टाकत असत .अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणार्या घोड्या गाढवापेक्षा हिन असल्याचे, ते सांगत. या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित ,प्रस्थापित आणि धार्मिक अनुष्ठान घेवुन वावरणाऱ्या लाकांच्या मनात तुकाराम विषयी विषारी रसायन तयार झाले होते. भक्ती व धर्म संप्रदाय यावर ज्यांनी तीन ग्रंथ लिहिले ते डॉ. रावसाहेब कसबे म्हणतात की , तुकाराम जगातले सर्वश्रेष्ठ संत आहेत.  संत चळवळ शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातीचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी यावर कळस चढविला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असे म्हणणारे तुकाराम पुढे असेही म्हणतात की, माझ्यासाठी देव मेला आहे . हे सगळं त्यावेळच्या ब्राह्मणी धर्माच्या विरूद्ध होतं.असं मत डॉ .कसबे  तूकाराम   महाराजांच्या हत्येच्या शक्यतेबाबत  व्यक्त करतात 

डॉ.साळुंखे मनुस्मृतिचा दाखला देताना, तुकारामाच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देवु शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपल्या समोर ठेवतात. "  ब्राह्मणाला नावे ठेवली असता शुद्राचा वध करावा .शुद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजाची निंदा केली असता, त्याची जीभ छाटावी. कारण तो जन्माने हिन आहे.वगैरे,वगैरे.      ज्यांच्या हातात धर्म शास्त्रे होती, त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अनेकदा अंमबजावणी  केली आहे. त्यांचे हे  विचार तत्कालीन समाजात रूचणारे नव्हते. म्हणूनच त्यांचा छळ होत होता. हे लोक कोलीत लावुन माझा घात करतील असे सांगून, त्यांना पुढे काय होणार आहे ह्याची जाणीव झाली होती. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले तरी मी भिणार नाही. माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार  करतात. 

         ज्या काळात मनुस्मृति नुसार धार्मिक बंधने घट्ट होती, त्या काळात तुकारामांनी ती जुगारून, त्यावर घणाघाती प्रहार केले. आणि इथेच ते ब्राह्मण पुरोहित व धर्माच्या ठेकेदारांच्या मनातून उतरले. कुणीतरी आपल्या समाज मान्यतेला, सार्वभौमत्वाला आव्हान देण्याची , बहुजन समाजाच्या अधिकाराची भाषा, अभंगाच्या माध्यमातून बोलू लागला आहे. म्हणूनच रामेश्वर भट्ट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ,  प्राकृत भाषेत सांगितला म्हणून,  तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा धर्मपीठाने दिली. तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून सर्व मानव ईश्वराची लेकरं असून, ती सर्व समान आहेत, उच्चनीच कुणी नाही, असे सांगत. आणि हेच तत्त्व अनुसरून शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडून सर्व जातींच्या लोकांना सामावून घेतले होते.

            कुणी कोणत्या गोष्टीवर  किती व कसा विश्वास ठेवायचा, हे ज्याने त्याने ठरवायचे असते . ती पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे.परंतु संविधानाने दिलेल्या हक्कां नुसार कुणीही , कुणाच्या ही  विचार स्वातंत्र्यावर गदा  आणु नये. म्हणुन जे लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करुन, प्राप्त परिस्थिती लक्षात घेवुन, कशावर विश्वास ठेवायचा किंवा नाही  हे ठरवतात. त्यांच्यावर आक्षेप घेवु नये असे मला वाटते. 

      " संत तुकाराम"  ह्या नावाचे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी सन १९३६ च्या चित्रपटात शेवटी त्यांनी वैकुंठागमन केल्याचे दाखविले आहे. त्या काळाचां विचार करता, तेव्हा बहुसंख्य समाज अशिक्षित होता. इंग्रजांनी सुधारणांना सुरुवात केली होती. जातीयतेचे पाश अतिशय घट्ट होते .त्यामुळे ते दृश्य, एकुणच सामाजिक परिस्थिती पाहता, चालवले गेले .परंतु काही वर्षांपूर्वी चंद्रकांत कुलकर्णी ह्या पुरोगामी विचारांच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात  हे दृश्यच दाखविण्यात आले नाही. कारण ह्या आधुनिक काळात ते कुणाच्या पचनी पडले नसते. कुलकर्णींनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, मी आधुनिक काळाला अनुरूप असा योग्य तुकाराम महाराज चित्रित केला आहे. यावरून समझानेवाले को इशारा काफी  है.

           ज्या ज्या वेळी चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवले गेले, त्या त्या वेळी, त्या व्यक्तींना किंवा समूहाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. तुकारामांनी समाज प्रबोधनासाठी चौकट मोडली.  म्हणुन त्यांना संपवण्यात आले. सध्याच्या भीषण परिस्थितीचा विचार करता  आजही तुकारामाचे मारेकरी खून करीत मोकाट फिरत आहेत असे दिसून येते , नाहीतर डॉ.   नरेंद्र दाभोलकर,   कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ह्यांच्या हत्या करण्याची गरज, कुणाला, का  भासली असती ? त्यांनी कुणाचं काय बिघडवलं  होते? ते ह्याच प्रवृत्ती विरूद्ध भांडत होते ना?  लोकांचे प्रबोधनच करीत होते ना ? ह्या प्रवृत्तींच्या चुकीच्या गोष्टींना आळा घालू पहात होते ना?मग तुकाराम आणि हे सर्व लोक वेगळे कसे? आधुनिक काळात हे मोटर सायकल वर येतात, धाड धाड गोळ्या घालतात आणि निघून जातात.

 कॉ. पानसरेनी ,"शिवाजी कोण होता? ".ही पुस्तिका छापली. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही महाराजांचा खरा इतिहास लोकांना सांगा. ज्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने महाराजांच्या नावाचा उदो उदो केला जातो, त्या महाराष्ट्रात सरकारमान्य शिव चरित्र असू नये, ह्यापेक्षा दुसरी शरमेची गोष्ट असूच शकत नाही.  महाराजाचा आरमार प्रमुख दौलत खान, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, त्यांचा वकील हे सगळे लोक मुसलमान होते व त्यांच्याशी एकनिष्ठ होते. मग महाराज मुस्लिम द्वेष्टे कसे ?  पन्हाळ गडावर जेव्हा वेढा पडला, तो दीर्घ काळ चालल्यानंतर महाराजांनी युक्ती केली. खोटा शिवाजी मोगल सैन्यासमोर फिरवून त्यांचे लक्ष  विचलित करून महाराज विशाल गडावर पसार झाले. तेव्हा महाराज गडावर पोहोचल्याचा, तोफांच्या आवाजांचा संदेश मिळेपर्यंत, पावनखिंडीत मोगलाना रोखण्याचे काम बाजी प्रभू देशपांडेंनी केले. त्यांनी प्राणाची बाजी लावली. त्यांनी निश्चितपणे मोठे काम केले. पण जो खोटा शिवाजी झाला होता. त्याला तर शंभर टक्के खात्री होती की, आपण मोगलांच्या हाती सापडणार आणि आपले मुंडके कलम होणार, तरीही तो महाराजांचे  प्राण वाचवण्यासाठी बळी गेला. त्याचे नाव होते शिवा काशीद. तो न्हावी होता. जसा बाजी प्रभूंचा त्याग मोठा तसाच शिवा काशिदचा ही त्याग मोठाच होता .मग एकाच नावाचा उदोउदो करता, आणि दुसरे नाव लपवून ठेवता? ते का ?

 आग्र्याच्या सुटकेची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. महाराजांनी आजारी असल्याचे ढोंग केले. गोरगरिबांचा आशीर्वाद लाभावा म्हणुन, मोठमोठ्या पेटार्यांमधून ते फळफळावळ पाठवत असत. एक दिवस ते पेटार्यात बसून फरार झाले.  पण संशय येऊ नये म्हणून  महाराजांच्या जागी एक व्यक्ती झोपून होती व सेवक त्यांचे पाय चेपत होता. ते दोघे होते हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर . त्या दोघांनाही माहीत होते की, महाराज फरार झाल्याचे समजल्यानंतर आपले काय हाल होणार आहेत. तरीही ते राजांचा प्राण वाचावा म्हणून स्वतः बळी गेले. किती मोठा त्याग आहे हा, पण त्यांची कुणी नोंदच घेतलेली दिसत नाही.  असे का ? अशा कितीतरी गोष्टी पानसरे  आपल्या लक्षात आणून देतात. पुढे पानसरे सांगतात की, शिवाजी महाराजांनी लिहिलेली सत्तावीस पत्रं आणि दुसऱ्या राजांकडून त्यांना आलेल्या पत्रांमध्ये कुठेही ,"गोब्राम्हण प्रतिपालक" असा शब्द नाही, मग हा शब्द कुणी आणला? तसेच महाराजाच्या राज्याभिषेकावेळी महाराज शूद्र म्हणून ह्यांनीच राज्याभिषेक नाकारला . नंतर तो गागाभट्ट या काशीच्या ब्राह्मणाकडून करून घेतला. त्यामुळे महाराजांनी हा शब्द वापरण्याची शक्यताच नाही. मग हा शब्द कुणी आणला ? हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.                   .    .     

           तुकारामाच्या मारेकऱ्यांच्या पिलावळीने वर्षानुवर्षे बहुजनांना अंधश्रध्देच्या चुकीच्या मार्गाने नेवुन त्यांची प्रगती तर रोखलीच पण त्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार चालवली आहे . दाभोकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमामुळे बहुजन समाजात जागृती निर्माण व्हायला लागली. त्यात ते बरेच यशस्वीही झाले होते. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रे, मासिकांमधून त्यांचे लिखाणही चालूच होते . शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत . बालपणापासून आपण शिवाजीबद्दल वाचत, ऐकत आलो आहोंत.  पानसरे ह्यांनी बहुजनांना  शिवाजीबाबत ज्या गोष्टी आतापर्यंत माहीत नव्हत्या, त्या सांगायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कैक व्याख्याने दिली. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर होता, असा सगळीकडे उल्लेख आहे, पण त्यांचे असे म्हणणें आहे की, त्यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असे का सांगत  नाही ?  तुकाराम महाराजांप्रमाणे डॉ दाभोळकर, कॉम्रेड पानसरे , वगैरे लोकांनी  चौकट मोडून सत्य सांगण्याचे धाडस केले. त्यासाठी त्यांनी सामाजिक जागृती केली. आणि त्याची परिणीती त्यांचे खून करण्यात झाली. हेच लोक जर तुकारामांच्या काळात असते तर हे सुध्धा सदेह वैकुंठाला नेले असते.  डॉ. दाभोळकरांच्या हत्यानंतर त्यांचे कार्य थांबले आहे काय? उलट ते अधिक जोमाने सुरूच आहे . पानसरे ह्यांचे " शिवाजी कोण होता?  हे पुस्तक, त्यांच्या भाषणाच्या कॅसेट्स ह्यांचा खप दिवसेंदिवस कैक पटीने वाढत आहे. तसेच अशा धमक्या दिल्याने सर्व सामान्य  लोकांमध्ये औस्तुक्य वाढून, ते आतापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात वाचले जाईल. व त्याचा फायदा त्यांचे विचार अधिक जोमाने लोकांपर्यंत जाण्यासाठी होईल. हे निश्चित.          

व्यक्तीला संपवुन विचार मरत नाहीत. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. जसजसा समाज सुशिक्षित होत आहे, तसतशा अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा ह्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.  त्यामुळे शेवटी हेच सागु इच्छितो की, संत तुकाराम ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड  गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबर्गी पर्यंत आणि यापुढेही , जोपर्यंत समाजामध्ये अनिष्ट रूढी, परंपरा, माणसाची पिळवणूक ,धर्माच्या नावावर लूट होत राहील , तोपर्यंत तुकाराम, दाभोळकर, पानसरे वगैरे जन्म घेत राहतील, तुमच्या अनिष्ट प्रथास विरोध करीत राहणार,आणि आजही करतो आहोत.  तुम्हाला जे  काय करायचे आहे ते करा ?  त्यासाठी तुकाराम महाराजा पासून आतापर्यंत आणि यापुढेही या सगळ्या कुप्रथांविरोधात काम सुरूच राहणार आहे. व्यक्तींना संपवल्यामुळे त्यांचे विचार व कार्य संपत नाही, उलट त्यांच्या हत्येने ते कार्य अधिक जोमाने पुढे सुरूच राहते हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे.  म्हणूनच मी म्हणतोय की, तुकारामाचे खुनी आजही मोकाट फिरताहेत !

  • अरुण निकम,    ९३२३२४९४८७.
  • संदर्भ...शिवाजी कोण होता ?
  • लेखक . कॉ.गोविंद पानसरे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com